मुंबई: ’कालनिर्णय’ला ’ऑडिट ब्युरो ऑफ सर्युलेशन’ (एबीसी) या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन म्हणून बहूमान दिला आहे, अशी माहिती संपादक, प्रकाशक जयराज साळगावकर यांनी दिली आहे. कालनिर्णय यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असून आता सात विविध भाषांमध्येही हे प्रकाशित होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
"सुवर्णमहोत्सवी वर्षात एक कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर विराजमान असलेले ’कालनिर्णय’ हे सुमंगल प्रकाशनाद्वारे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या सात भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. पंचांग, भविष्य, सणवार, तिथी-नक्षत्रे, शास्त्रार्थ ही ’कालनिर्णय’ची प्रमुख अंगे असून पंचांग जनसामान्यांसाठी सोपे व सुलभ करण्याचा सांस्कृतिक ‘रिफॉर्म’ ’कालनिर्णय’ने पन्नास वर्षांपूर्वीच केला.", असे ते म्हणाले.
"समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून, वेगवेगळ्या धाटणीचा ग्राहकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून त्यानुसार नोटपॅड, श्री स्वामी समर्थ अवधूत पंचांग, स्वादिष्ट, आरोग्य, मोठे व छोटे ऑफिस, मीडिअम, थ्री इन वन क्युबिकल, कार, डेस्क, अॅकॉर्डियन, मायक्रो, वर्षचंद्रिका, विकली नोट प्लॅनर, पॉकेट डायरी, इयर प्लॅनर अशा विविध प्रकारांतील आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. तसेच देशातील पहिली वेबसाइट, अॅप अशा उपक्रमांद्वारे ’कालनिर्णय’ नेहमीच काळाबरोबर चालत आले आहे. सर्व ग्राहक, साहित्यिक तसेच लेखक यांनी दाखवलेल्या विश्वास व प्रेमामुळेच ’कालनिर्णय’ला हे सुवर्णमहोत्सवी यश लाभले", अशी भावना प्रकाशक तथा संपादक जयराज साळगावकर यांनी नुकतीच व्यक्त केली.
जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन
विविध उपक्रमांद्वारे ५० वर्षे ’कालनिर्णय’ने मराठी माणसावरच नव्हे, तर भारतीय मनावर आपला सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. ’कालनिर्णय’ला ’ऑडिट ब्युरो ऑफ सर्युलेशन’ (एबीसी) या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन म्हणून बहूमान दिला आहे. ’कालनिर्णय ने लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उपयुक्त प्रकाशने वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहेत व भविष्यातही असाच प्रयत्न राहील, असेही साळगावकर म्हणाले.