नकारात्मकतेचा पाडाव करता येण्यासाठी व सकारात्मकता आणि ठामपणाचे वर्धन करताना सहनशीलता आणि थंड डोक्याची गरज आहे. शेवटी आपण स्वतःलाच स्वतः प्रेरित करायला पाहिजे.
दम्य इच्छाशक्ती’ किंवा ‘नेव्हर से डाय’ वृत्ती ही आपली हाताबाहेर गेलेली अपयशाची माला पुन्हा आपल्या गळ्यात कशी सजते, याचा एक उत्तम आदर्श आहे. पुन्हा जरी यश कधी नाही मिळाले, तरी आपले चैतन्य कसे जागवते, याचेही उदाहरण ही अदम्य वृत्ती आहे. जग नेहमीच गोंधळलेले असते. काहीसे आक्रमक असते अन् गढूळलेलेही असते. पण, या सगळ्या पसार्यात आपण मात्र केंद्रित असणं, धैर्याने परिस्थितीला हाताळणं हेच सफलतेचे रहस्य आहे. खेळाडूंसाठी ही प्रगल्भ प्रवृत्ती प्राप्त करता येणे, हे एक प्रकारचे वरदान आहे. हे वरदान बॅगेतून मिळत नाही किंवा विकत घेता येत नाही, ते मेहनतीने मिळवायला लागतं. साधी परीक्षा असेल, ज्यातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा एखादा आयुष्याची दिशा बदलवणारा मोठा निर्णय असेल, तर लोकं आपला आत्मविश्वास गमावून बसतात आणि सगळं सोडून देतात. पण, अशा गमावण्यासाठी आपण थोडंचं जगत असतो? नक्कीच नाही!! आपलं धैर्य अंतिम क्षणापर्यंत राखून ठेवणं आणि अपयशाला भीक न घालता, आपलं १०० टक्के आपल्या कर्माला देणं एवढेच या जगात जर काही प्राप्त करायचे आहे, तर करणे आवश्यक आहे. तुमचं मन तुम्हाला प्रकट करायचं असेल, त्यासाठी लागणारं धैर्य तुमच्याकडे प्रकट करायचं असेल, त्यासाठी लागणारं धैर्य तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला कोण रोखणार या जगात! स्वामी विवेकानंद म्हणाले होते, "Work on! Hold on! Be brave! Dare anything and everything! काम करत राहा. धीर धरा. धीट व्हा आणि प्रत्येक गोष्टींचं आव्हान स्वीकारा, असाच त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ.
डेनिस लिली हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज. सगळ्यांना म्हणजे जगातील प्रगल्भ अशा उत्तम फलंदाजांना गॅरी सोबर्स, क्लाईव्ह लॉईड, रोहन कन्हाए आणि भारताचा लिटील मास्टर सुनील गावसकर या सगळ्यांना चक्क चिंतेत आणणारा. पाठीच्या कण्याच्या फ्रॅक्चरने त्याचे गोलंदाजीचे करिअर जवळजवळ संपले, असे सगळ्यांना १९७३ मध्ये वाटले. हा पठ्ठा दुर्दम्य इच्छाशक्तीला खतपाणी घालत राहिला. शिस्तबद्ध जीवनशैली आणि फिजीओथेरपीच्या बळावर त्याने पाठीच्या कण्याला त्याची कारकिर्द संपविण्यापासून मना केले. ’नेव्हर से डाय’ या जबरदस्त तत्त्वज्ञानाला आयुष्यात जागवत, त्याची भयानक जखम त्याच्या आयुष्यातील वेगवान गोलंदाजाचे स्वप्न अस्तित्वात आणण्यापासून त्याला थांबवू शकली नाही. त्याची ‘फ्रॅक्चर’नंतरची कारकिर्द ही सर्वात यशस्वी कारकिर्द ठरली, उत्कृष्ट ठरली. केवळ २१ ‘टेस्ट क्रिकेट’मध्ये गोलंदाजीत पुन्हा मागे परतलेल्या डेनिस लिलीने १२० विकेट्स घेतल्या. पुढे तो प्रशिक्षकही झाला आणि ब्रेट ली व शॉन टेटसारख्या सुप्रसिद्ध गोलंदाजांना त्याने गोलंदाजीच्या विशुद्ध तंत्राबरोबर दुर्दम्य प्रकृतीचे तंत्रही शिकवले. या लिलीच्या जीवनकथेचे सार काय आहे, तर आयुष्यातील कठीण प्रसंगांना साईबाबांच्या ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ने सामोरे जायचे. अगदी आयुष्य संपते, असे वाटतानाही हार मानण्यापेक्षा, निराश होण्यापेक्षा आत्महत्येचे विचार करण्यापेक्षा, आत्मविश्वास आणि निष्ठा यांच्या बळावर ‘झिरो टू हिरो’ बनता येण्याची शक्यता अधिक आहे, ही दिमाखदार ‘नेव्हर टू से डाय’ प्रकृती कठीण काळात राखेतून पुन्हा उडू शकणार्या ‘फिनिक्स’ पक्ष्याची आहे.
अशी ही ‘अदम्य इच्छाशक्ती’ विकसित करायची असेल, तर कठीण परिस्थितीत असताना लोकांच्या नकारात्मक अभिप्रायाकडे दुर्लक्ष करता आले पाहिजे. ही मते तुमच्या स्वप्नांना खतपाणी घालत नसतील, तर त्यावर फार वेळ घालवायचा प्रयत्नही आपण करू नये. स्वत:च्या मनाकडे वळून पाहणे अर्थात सिंहावलोकन करावे. आपल्या वृत्तीत आपण काय आहोत, याचे गमक आहे. जग हे सुखाचे, दिल्या-घेतल्याचे असल्याने आपण आपली मनस्थिती कशी स्थिरावतो, हे शेवटी मोलाचे आहे. याही पुढे जाऊन आपली चिकाटी आणि सहनशीलता आपली ताकद म्हणून कशी वापरतो, हे खूप महत्त्वाचे आहे. असे खेळाडूंच्या जगात आपल्या जखमा आपण गमावलेला स्टॅमिना, आपले औदासिन्य या गोष्टी एक-दोन दिवसांत जात नाहीत किंवा यावर मात करण्यासाठी कुठलेही ‘शॉर्टकट’ नसतात. यासाठीच हे सगळे बदलायला व्यक्तीला पुरेसा वेळ द्यायला लागतो. सराव करायला लागतो. चित्त थार्यावर ठेवावे लागते. बाळाला मातेच्या गर्भात विकसित होण्यास नऊ महिने लागतातच.
वॉरन बुफे म्हणतात, “धीर धरा आणि आपल्या मार्गावर निष्ठेने चालत राहा.” याशिवाय अत्यंत आनंददायी गोष्ट खेळाडूंनी आणि इतरांनीही करायची ती म्हणजे, अशा घायाळ परिस्थितीतून जाऊनही आपल्या स्वप्नांना वस्तुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करणार्या सुप्रसिद्ध लोकांच्या जीवनकथांचा परामर्श घ्यावा. डेनिस लिली, पी. टी. उषा, मिल्खा सिंग, सुनील क्षेत्री व युवराज सिंग यांच्या लढाऊ वृत्तीच्या सुंदर कथा वाचाव्यात. ‘पॅरालिम्पिक’मधील प्रत्येक खेळाडू अदम्य आणि अशक्यप्राय गोष्टी, लढाऊ तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. त्यांच्या शौर्यधैर्याच्या कथा वाचताना जो जोश मिळतो, तो तुम्हालाही भावेल. आपलं समस्यांनी जखडलेलं आयुष्य हे २० टक्के खरी समस्या आणि ८० टक्के आपल्या भावनिक प्रतिक्रियेने भरलेले असतं, हे वैश्विक सत्य आहे. म्हणून आपल्या हातात नसलेल्या परिस्थितीला काबूत आणण्यापेक्षा स्वतःला सकारात्मकदृष्ट्या उत्क्रांत करायचा प्रयत्न केला पाहिजे. मन धोनीसारखे शांत ठेवले पाहिजे. त्यामुळे आपल्या विचारांना दिशा मिळते. विचारांचे तारतम्य बाळगता येते. भावनिक खळबळीने कठीण परिस्थितीतून त्वरित सुटका करुन घ्यायला जीव धडपडतो आणि एखाद्या गोष्टीवर मात करता येण्याची ‘पॉवर’ आपण गमावतो. शांत मनात अशी खळबळ होत नसते, म्हणून माणूस समस्येला व्यवस्थित ओळखू शकतो आणि त्याचे निराकरण कसे करायचे, याचे योग्य नियोजन करू शकतो. म्हणजे नकारात्मकतेचा पाडाव करता येण्यासाठी व सकारात्मकता आणि ठामपणाचे वर्धन करताना सहनशीलता आणि थंड डोक्याची गरज आहे. शेवटी आपण स्वतःलाच स्वतः प्रेरित करायला पाहिजे.
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हा दुर्दम्य इच्छाशक्तीचा महत्त्वाचा दुवा आहे. (क्रमशः)
- डॉ. शुभांगी पारकर