छत्तीसगड - शुक्रवारी, १० डिसेंबर रोजी छत्तीसगडमधील कावर्धा येथील चौकात १०८ फूट उंचीचा भगवा ध्वज पुन्हा एकदा ऋषी-मुनींच्या नेतृत्वाखाली फडकवण्यात आला. हा भगवा ध्वज कट्टरपंथियांच्या जमावाने उखडून टाकला होता. यावेळी महामंडलेश्वर, महंत आणि १३ आखाड्यांचे सर्व शंकराचार्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत रामजानकी मंदिरापासून ५१०० कलशांसह भव्य धार्मिक मिरवणूक काढण्यात आली. दांडी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पदयात्रेत २० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. या वेळी लोक डीजेच्या तालावर 'जय श्री राम'च्या घोषणा देत होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “भगवा ध्वज हा आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा ध्वज आहे. आपल्या धर्मात आठ प्रकारच्या ध्वजांचे वर्णन केले आहे. कवर्धा येथे फडकलेल्या भगव्या ध्वजाचे नाव विशाला ध्वज आहे. भगव्या ध्वजाचा आदर सर्वोतोपरी आहे. कावर्धाच्या कपाळावर लावलेला हा भगवा ध्वज आनंदाने फडकणार आहे." ते पुढे म्हणाले, "ते लोक (मुस्लिम) फक्त १५ फूट उंच ध्वजासाठी लढले आणि आम्ही १०८ फूट उंच ध्वज लावला." त्यांनी कावर्धा ही छत्तीसगड राज्याची धार्मिक राजधानी म्हणून घोषित केली.
यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कावर्धाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, कट्टरपंथीय जमावाने हिंदू ध्वज उखडला आणि नंतर त्याचा अपमान केला. यावेळी दोन्ही गटांमध्ये हाणामारीही झाली. हिंदू राष्ट्रध्वज उखडून जमाव त्याचा अपमान करत असताना काही पोलीस प्रेक्षक म्हणून उभे राहून हा प्रसंग पाहत होते. ज्या ठिकाणी हिंदूंचा ध्वज लावला होता, तिथे मुस्लिमांनीही त्यांच्या कार्यक्रमासाठी ध्वज लावला होता. त्यानंतर ध्वज तोडण्यात आला आणि दगडफेक सुरू झाली. दोन्ही बाजूंमधील तणाव इतका वाढला होता की, शहरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवाव्या लागल्या होत्या.