मुंबई 'साफ करण्यावरून' ठाकरे बंधूत चढाओढ

12 Dec 2021 01:01:18
 
aditya thackeray-vs-amit-
 
 
 
मुंबई : येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या मैदानात उतरलेल्या मनसे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या ठाकरे बंधूंमध्ये आता मुंबई साफ करण्यावरून चढाओढ निर्माण झाली आहे. मुंबई साफ करणे म्हणजे मुंबईला लाभलेल्या सागरी किनाऱ्यांची साफसफाई करण्यावरून आता या भावंडांमध्ये युद्ध रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नुकतीच महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांची सफाई करण्यासाठी एका मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. त्यात ते म्हणाले की, 'आपले समुद्र किनारे स्वच्छ आणि सुरक्षित करणे आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे 720 किलोमीटर लांबी असलेल्या समुद्र किनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय. आपल्या सर्वांनाच वाटत असेल, परदेशात असलेली समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर का असतात? आणि आपल्या राज्यात ते का असू शकत नाही? आपले समुद्र किनारे अस्वच्छ आणि भकास का दिसतात? त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. फक्त सरकारवर अवलंबून न राहता, आपल्याला जबाबदारी घेणं गरजेचं आहे.' असे आवाहन अमित राज ठाकरे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले होते.
 
 
सफाई बहाणा आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा ?
अमित ठाकरे यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेमुळे अनेक राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहेत. अमित यांनी हाती घेतलेली मोहीम ही पर्यावरणाशी संबंधित आहे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अमित यांचे चुलत बंधू आहेत. त्यामुळे कदाचित या मोहिमेतून अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेही यापूर्वी महाराष्ट्राने राज आणि उद्धव या दोन ठाकरे बंधूंमध्ये झालेल्या राजकीय वारसाहक्काच्या लढाई पाहिलेली आहे. त्यामुळे राज विरुद्ध उद्धव वादाचा पुढचा अंक अमित विरुद्ध आदित्य या रूपात सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0