मुंबईत ओमायक्रॉनची दहशत

12 Dec 2021 01:06:45

Dharavi slum_1  
 
मुंबई : जगभरात नव्याने प्रसारित होंत असलेल्या ओमायक्रॉन विषाणूने मुंबईतही आपला चंचू प्रवेश केला आहे. धारावीत सापडलेल्या बाधित रुग्णानंतर आता महापालिका प्रशासन आणि पोलीस सक्रिय झाले आहेत. नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवार, दि. ११ डिसेंबर आणि आणि रविवार, दि. १२ डिसेंबर या दोन दिवसांकरिता कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या दरम्यान लोकांच्या रॅली, मोर्चे, मिरवणुका आणि वाहनांना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 17 जणांना ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झाली आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी रात्री मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत कलम १४४ लागू केल्याने या दोन दिवसांत कुठल्याही सामाजिक अथवा राजकीय कार्यक्रमांना मुंबईत मज्जाव करण्यात आला आहे.
 
 
मुंबई पोलिसांतर्फे लागू करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरात लागू करण्यात आलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 17 रुग्ण आढळले असून त्यात मुंबईच्या धारावीमध्ये सापडलेल्या एकाच ओमाक्रॉनचा रुग्णाचाही समावेश आहे.
 
 
टांझानियातून मुंबईत आलेला धारावीतील रहिवासी कोरोनाबाधित
टांझानिया येथून 4 डिसेंबरला मुंबईत आलेला धारावीतील रहिवासी कोरोनाबाधित असल्याने त्याचा नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. त्याच्या संपर्कातील दोघांची चाचणी करण्यात आली, यांपैकी कोणीही कोरोनाबाधित नाही.
Powered By Sangraha 9.0