‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’त ९९ कोटींचा निधी शिल्लक

10 Dec 2021 18:49:04

cmo _1  H x W:

मुंबई : ‘मुख्यमंत्री साहाय्यता मुख्य निधी’तून वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मदत केली जाते. गेल्या दोन वर्षांत या निधीतील केवळ ३१ कोटी रुपयेच खर्च करण्यात आले आहेत. म्हणजे १३० कोटी रुपयांपैकी ३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अजूनही या निधीत ९९ कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती उघड झाली आहे.


‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही बाब माहितीच्या अधिकारातून उघड केली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’च्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या साहाय्यता निधी कक्षाने याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या मुख्य निधीत दि. २८ नोव्हेंबर, २०१९ पासून आजपर्यंत १३० कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे. गेल्या २२ महिन्यांत यापैकी फक्त ३१ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिल्याचे गलगली यांनी सांगितले.


ते म्हणाले की, “जर आपण सर्व खर्च केलेल्या रक्कमेचा गोषवारा केला, तर मागील २२ महिन्यांत जवळपास ४,९३२ नागरिकांना २२ कोटी इतकी मदत केली आहे. तसेच २३ प्रकरणात नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना नऊ कोटींचे अर्थसाहाय्य केले आहे.
आमची मुख्यमंत्र्यांना एवढीच मागणी आहे की, मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील जो मुख्य निधी आहे तो खासकरून वैद्यकीय कामासाठी देण्यासाठी त्याची तजवीज केलेली असते. त्यामुळे जास्तीत जास्त पैसे खर्च करण्यात यावे जेणेकरून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. जर आपण ४,९३२ नागरिकांना जे २२ कोटींचा गोषवारा केला, तर प्रत्येक दिवशी आठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून मदत दिल्याचे दिसून येते,” अशी माहितीही अनिल गलगली यांनी दिली आहे.


Powered By Sangraha 9.0