‘साहित्यलक्ष्मी’ म्हणून सन्मानित नाशिकमधील महत्त्वाच्या लेखिका म्हणजे लक्ष्मीबाई टिळक. ‘स्मृतिचित्रे’ नावाचे त्यांचे प्रांजळ मनोगतात्मक आत्मचरित्र साहित्य प्रवाहातील मानदंड मानले जाते. ‘भरली घागर’ हा लक्षणीय कवितासंग्रह, आधुनिक मराठीतील दीर्घ आख्यानक ‘ख्रिस्तायन’ या ओवीरूप संग्रहातही त्यांचे ठळक योगदान आहे. आगामी साहित्य संमेलनानिमित्ताने नाशिकमधील या ‘साहित्यलक्ष्मी’च्या साहित्यिक कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत...
१ जून, १८६८ रोजी मनुताई गोखले यांचा जन्म झाला. आपल्या आत्याकडे नाशिकमध्ये वाढलेल्या या मुलीचे असामान्य तत्त्व तिचा नारायण वामन टिळकांशी विवाह होऊन ती ’लक्ष्मीबाई टिळक’ झाली नसती, तर इतके उमटून आले असते का, असं क्षणभर वाटून जावं, असा विलक्षण थक्क करून टाकणारा त्यांचा टिळकांसोबतीने झालेला जीवनप्रवास. सामाजिक रूढी-परंपरांच्या त्या काळातील लक्ष्मीबाईंचे आत्मचरित्रपर पुस्तक ’स्मृतिचित्रे’ आजही साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळवून आहे. घरातील एखाद्या आजीने सहजपणे एखादी कथा उलगडून सांगावी, असं त्या अलवार लिहितात. ’भरली घागर’ हा त्यांचा कवितासंग्रहदेखील आपल्या मनोज्ञ रचनांसाठी, महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह म्हणून ओळखला जातो.
लक्ष्मीबाईंच्या लग्नानंतरचा काळ पती नेईल तसे त्याच्याबरोबरीने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, कर्मठ सासर्यांच्या कडक शिस्तीत दिवस पार पाडणे व महादेव नावाच्या बंधुवत दिराची साथ मिळणे, असा गेला. एका ठिकाणी नोकरी न करणारे टिळक, अपुर्या साधनांमध्ये ओढग्रस्तीने होणारा बेताच्या परिस्थितीचा अस्थिर संसार त्यांच्या वाटेला आला. मात्र, त्यातही टिळकांनी घरी आणलेल्या अनाथ विद्यार्थ्यांची आपुलकीने काळजी लक्ष्मीबाई कायम घेत असत. टिळकांच्या आग्रहानुसार आणि रेट्यानुसार त्यांच्या शिक्षणाची सुरूवात झाली. आपल्या शिक्षणाच्या पहिल्या दिवसाचे त्या ’स्मृतिचित्रे’ मध्येे फार गमतीशीर वर्णन करतात. शिक्षणाच्या आरंभी ’शब्द म्हणजे काय?’ या टिळकांनी विचारलेल्या प्रश्नाने आपल्याला कसे सपाटून हसू लोटले, “हा कसला बाई चमत्कारिक प्रश्न? शब्द म्हणजे शब्द,” या आपल्या उत्तराने टिळक कसे संतापले, हे त्या अगदी सहज लिहितात. त्यांची लेखनशैली ही कायमच अशी सहज साधी, कुठलाही अभिनिवेश नसणारी सोपी; पण आपलेपणाने ओतप्रोत गोडवा असलेली आणि अकृत्रिम होती. टिळकांनी आपल्याकडून अक्षरं गिरवून घेतली तरी जोडाक्षरांनी मात्र आपल्याला जरा त्रासच दिला, हे ही त्या त्यांच्या नर्मविनोदी शैलीत सांगतात. अर्थात मुळातच असणारी अफाट ग्रहणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि तीक्ष्ण आत्मभानाच्या साथीने नव्यानेच झालेली ही साहित्याची ओळख त्यांच्या बुद्धिमान अस्तित्वाला पूरकच ठरली. ’मी ‘अज्ञ’ आहे. ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत जिला लिहिता येते अशी’ किंवा लिहिताना त्या पेपरवर मार्जिनही सोडत नसत. त्यामुळे ‘त्या पानभर लिहितात,’ असं म्हटल्यावर त्यांनी दिलेलं ‘मी पानभरून जेवते, पानभरून लिहिते आणि तोंडभरून बोलते,’ हे खुसखुशीत उत्तर त्यांच्यातल्या सकारात्मक विनोदक्षमतेचं दर्शन घडवतात.
‘स्मृतिचित्रे’मधील आठवणींच्या मालिकेसाठी त्या टिळकांच्या ओळी म्हणतात,
रंग नभाचे कसे तरी, कसे तरी, ही मजा खरी,
फुले आपुली, किती उमलली, कुठे लटकली,
चिंता नच ही वेलीला, सुंदरतेची ही लीला
लक्ष्मीबाईंमधली कवयित्री लिहू लागण्यासाठी मात्र ,वेगळाच प्रसंग कारण ठरला. आयुष्यात आलेल्या संकटांना तोंड देणे नित्याचेच झाले होते. मुरबाडला झालेला सासुरवास, मुलांचा, दिराचा मृत्यू...सारं सोसून झालं... पण, टिळक ख्रिस्ती व्हायला गेले आहेत, या माहितीने त्या खचून गेल्या. हा धक्का सहन करणे त्यांना अगदी कठीण गेले आणि त्यातूनच मनात उमटलेल्या भावना त्यांच्या पहिल्या कवितेत व्यक्त झाल्या,
म्हणे जातो सोडून नाथ माझा
अता कवणाला बाहुं देवराजा,
सर्व व्यापी सर्वज्ञ तूच आहे
सांग कोणाचे धरू तरी पाये...
पुढील साधारण साडेपाच वर्षर्ं त्या टिळकांपासून दूर नगर व जलालपूर येथे राहिल्या. पुढे मात्रआपल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्या टिळकांकडे पुन्हा राहू लागल्या आणि त्यादरम्यान घडलेल्या काही घटनांमधून, ही समस्त सृष्टी देवाने निर्मिलेली असून जातीपाती, धर्म मानवनिर्मित आहेत, तेव्हा आपण त्याचा त्याग करावा, असे त्यांना वाटले. मूलत: वैचारिक बैठक असलेल्या लक्ष्मीबाईंच्या हातून समाजासाठी मोठ्या प्रमाणावर विधायक कार्य घडले. नगरमधल्या त्यांच्या वास्तूत बालकवींचेही वास्तव्य होते. रेव्ह टिळक, लक्ष्मीबाई आणि बालकवींच्या काव्यप्रवाहाची ती वास्तू साक्ष ठरली. लक्ष्मीबाई व टिळकांच्या नात्याचे अनेक पदर होते. मात्र, ते नातं खरेपणाचं होतं, नितळ पारदर्शी होतं. टिळकांची आईदेखील कविता करत असे. पण, त्यांच्या वडिलांनी त्या जाळून टाकल्याची खंत टिळकांना कायम होती. ’तू मात्र माझ्यानंतरही भरपूर जग आणि खूप कविता लिही,’ असं ते लक्ष्मीबाईंना आवर्जून सांगत व त्याप्रमाणे त्यांनी अत्यंत भावसंपन्न असे लेखन केलेही.
’धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे’ या टिळकांच्या भूमिकेचे त्यांनी ठाम समर्थन केले. रेव्ह टिळकांनी हाती घेतलेल्या ’ख्रिस्तायन’ या महाकाव्याचे काम त्यांनी नेटाने पूर्ण केले. एकूण ७६ अध्यायांपैकी दहा टिळकांचे व उर्वरित लक्ष्मीबाईंनी लिहिलेले आहेत. पुढे त्या इंग्रजीही शिकल्या. टिळकांच्या निधनानंतर, ’श्रीमती नाव मज आले, सौभाग्य लयाला गेले’ असं त्यांनी लिहिलं. त्यांच्यातली काव्यप्रतिभा, त्यांच्या व्याख्यानांतून ठळकपणे उमटणारा व्यासंग सगळ्यांना थक्क करून टाकणारा होता.
नाशिकमध्ये त्यांच्या सन्मानार्थ आयोजित भव्य सत्कारात प्र. के. अत्रे यांनी त्यांना ’साहित्यलक्ष्मी’ असे मानाने संबोधले. “आजीबाई आता आराम करा,” असं अत्रेंनी गमतीने म्हटल्यावर, ’‘असा कसा आराम करू... अजून माझा फुलस्टॉप आलेला नाही,” असं मिश्किल उत्तर देणारी ही ‘साहित्यलक्ष्मी’ काळाच्या पडद्यावर सुंदर अक्षरांत आपलं जीवन काव्य लिहून दि. २४ फेब्रुवारी, १९३६ साली मात्र, एका लिहित्या सुरेख हाताला ‘फुलस्टॉप’ देत काळाच्या पडद्याआड गेली.
- तन्वी अमित