मुंबईच्या मारेकऱ्यांशी आर्थिक व्यवहार का? : देवेंद्र फडणवीस

09 Nov 2021 23:53:20

devendra fadnvis_1 &


मुंबई, 9 नोव्हेंबर :
ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल या दोघांशी केलेले आर्थिक व्यवहार आणि त्यांच्याकडून कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावात कशी खरेदी केली, याचे पुरावेच त्यांनी सादर केले.



महाराष्ट्र भाजपा कार्यालयात ही पत्रपरिषद आज झाली, त्यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर, सदाभाऊ खोत, किसन कथोरे, केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.



सरदार शहा वली खान हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार आहे. याला जन्मठेप झाली आणि ती सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. सध्या तो कारागृहागृत आहे. टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायरआर्म ट्रेनिंगमध्ये हा सहभागी झाला होता. मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा, याचा सर्वे त्याने केला होता. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे कारस्थान शिजले. त्या सर्व मिटिंगला हा उपस्थित होता. त्याला काय होणार आहे, याची संपूर्ण माहिती होती. अल हुसैनी बिल्डींग माहीममध्ये टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स याने भरले. माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी याबाबत प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला, त्यामुळे त्याला जन्मठेप झाली. दुसरी व्यक्ती ही मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल हा आहे. तो हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमॅन. तिच्यासोबत याला २००७मध्ये पकडले होते. त्याला समोर करून संपत्ती बळकाविण्याचे काम ती करायची. या दोघांकडून नवाब मलिक यांच्या कंपनीने जागा खरेदी केली आहे.



ही सलीम-जावेदची गोष्ट नाही, ना कोणत्या इंटरव्हलनंतरचा सिनेमा आहे. हा अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडित मुद्दा आहे. हसीना पारकरला जेव्हा अटक झाली तेव्हा सलीम खानला देखील अटक झाली. मुंबई पोलिसांचं रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर दाऊद फरार झाल्यानंतर त्यांची बहीण हसीना पारकर यांच्या नावाने वसुली करणारा सलीम पटेल होता. कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास ३ एकर जागा आहे. शाहवली आणि सलीम पटेल या आरोपींनी ही जागा सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली. सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. यांच्या वतीने फराज मलिकांनी यावर सही केली. काही काळ स्वतः मंत्री नवाब मलिक हे सुद्धा संचालक होते. शाहवली आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा ३० लाखांमध्ये विकली आणि त्यातील २० लाख रुपये दिले गेले. या जागेचे १ कोटी रुपये महिना सॉलिडसला भाडं मिळतंय. प्रश्न हा निर्माण होतो की मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी जमीन का खरेदी केली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

मुंबई बॉम्बस्फोटावेळी माणसांची वेदना आपण बघितल्या. भारताचा शत्रू म्हणून आपण ज्याला ओळखतो तो दाऊद, त्याची बहीण आणि तिचा फ्रंटमॅन असलेला सलीम पटेल. या दोघांनी कोट्यवधींची जमीन केवळ ३० लाखात का विकली? पटेलबद्दल मलिकांना माहिती नव्हती का? टाडा कायद्याअंतर्गत हे आरोपी होते. आपली जमीन सरकारजमा होऊ नये, म्हणून विकली गेली आहे का? ही खरंच २० लाखांना विकली गेली की या लोकांच्या काळ्या कामांकरिता मोठ्या प्रमाणात काळा पैसा दिला गेला? काळा पैसा देऊन ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आलीय का? हे माझे सवाल आहेत. माझ्याकडे आता ५ प्रॉपर्टीची माहिती आहे. त्यातील एका प्रॉपर्टीचे कागदपत्रं मी दिले आहेत. ४ प्रॉपर्टीच्या बाबतीत मी खात्रीनं सांगू शकतो की त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. यात मलिकांचा फक्त एकाच नाही तर थेट संबंध ४ मालमत्तांमध्ये अंडरवर्ल्डच्या लोकांशी आहे. ही सर्व कागदपत्र सुयोग्य प्राधिकरणाकडे मी सोपविणार आहे आणि यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या कागदांची एक प्रत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेबांना पण देणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0