मुंबई महापालिकेच्या छठ पूजा नियमावलीत बदल

09 Nov 2021 23:32:44
 
chat pooja_1  H
 
 
 
मुंबई : उत्तर भारतीय नागरिकांसाठी अत्यंत पूजनीय समजल्या जाणाऱ्या छठ पूजेवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या नियमांमध्ये प्रशासनातर्फे बदल करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार पालिका आता छठ पूजेच्या दरम्यान आवश्यक असलेल्या कृत्रिम तलावांचा खर्च उचलण्यासह प्रभागनिहाय त्या तलावांबाबत निर्णय घेईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
 
 
पालिकेने या आधी जाहीर केलेल्या आदेशावरून प्रशासन दोन पावले माग जात वरील अटी मान्य करण्यास तयार झाले आहे. या आधी लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पालिकेला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. विरोधी पक्षाची भूमिका बजावत असलेल्या भाजपसह काँग्रेसनेही या निर्बंधांवर कडाडून टीका केली होती.
 
 
महापालिका प्रशासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या निर्णयावर टीका करताना भाजप नेते आमदार राम कदम म्हणाले होते की, " मागील अनेक वर्षांपासुन मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणारी आणि राज्य सरकारमधील महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी असलेलया शिवसेनेला केव्हाच हिंदुत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळे शिवसेनेला आता हिंदू सणांविषयी अडचण निर्माण झाली आहे. मात्र आमच्य विरोधामुळे संबंधितांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला, असे आ.राम कदम यांनी म्हटले आहे.
 
 
तर दुसरीकडे यापूर्वीच्याच निर्णयावर टीका करताना भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी म्हटले होते की, “छट पूजेच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्यांवर जाऊन पूजा करण्यास महापालिकेने परवानगी दिली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. पूजेदरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी काही ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले पाहिजेत. महापालिकेने या जबाबदाऱ्या आयोजकांवर टाकू नये. गणपती विसर्जनाला मर्यादित पद्धतीने परवानगी देण्यात आली होती, मात्र आता निर्बंध लादले जात असतील तर हे केवळ अन्यायकारक आहे,' असे भाजप नेते आणि नगरसेवक विनोद मिश्रा यांनी म्हटले होते. त्यामुळे भाजप आणि विरोधी पक्षाच्या वतीने होणाऱ्या विरोधाला बळी पडूनच प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0