थंड डोक्याने काहीप्रभावी शिकण्यासारखे...!

09 Nov 2021 13:18:23

sports 2_1  H x



Attentional control theory
म्हणजे ‘एकाग्रता नियोजन सिद्धांत’ असे वर्तवतो की, तणाव, तणावजन्य स्थितीकडे आपले लक्ष केंद्रित करू शकतो. याचा अर्थ असा होतो का, ज्या व्यक्तीला अधिक तणावजन्यता असते अशी व्यक्ती ही जिची तणावजन्यता कमी असते अशा व्यक्तीपेक्षा तणावाचा सामना करण्यास अधिक तत्पर असते? कठीण प्रश्न आहे. अशा तणावजन्य स्थितीत तीक्ष्ण बनलेल्या एकाग्रतेने एखाद्याची कार्यक्षमता वर्धित होते, असे ठामपणे मानसशास्त्राला सांगत येणे कठीण आहे.




मानसशास्त्रानुसार खेळाच्या स्पर्धेतील तणाव, खेळाडू आव्हानाला किती कठीण समजतात, त्या आव्हानांना पेलवण्याची क्षमता किंवा आत्मविश्वास त्यांच्यात किती आहे आणि त्या आव्हानाला सामोेरे जाणे त्यांना किती मोलाचे वाटते, यावर अवलंबून आहे. मानसिक पातळीवर तणावाचे प्रकटीकरण अनेक प्रकारांनी होत असते.ज्या वेगाने आणि काटेकोरपणे खेळाची कामगिरी बदलत जाते ते आपल्या मेंदूच्या विश्लेषण आणि निर्णयक्षमतेवर अवलंबून असते. अर्थात, ही विश्लेषणक्षमता आणि निर्णयक्षमता आपल्या कार्यरत कामकाज स्मृतीवर (वर्किंग मेमरी) अवलंबून असते. कामकाजाची स्मृती आपला मेंदू ज्या पद्धतीने अल्पमुदतीत मिळणारी माहिती साठवून ठेवतो वा रचवून ठेवतो आणि त्यानुसार सद्यपरिस्थितीतील संवेदना आणि आधीच्या अल्प वा दीर्घ स्मृतीमध्ये एक दुवा जोडतो, त्यावर कार्यरत राहते. म्हणजे एखादा खेळाडू काही ठराविक खेळतंत्रात कुशल असला, तरी वास्तविक मैदानात त्याला एकंदरीत परिस्थितीकडेे वर्तमान स्थितीतून पाहत गरजेप्रमाणे आपल्या फार पूर्वी शिकलेल्या कौशल्यात वा तांत्रिक खेळात थोडाफार बदल करायला लागतो आणि त्यासाठी कार्यरत स्मृतीचा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो. अर्थात, खेळाडू जर अतिचिंतीत झाला आणि त्याला आपल्या वैयक्तिक खेळाबद्दल शंका वाटत असली, ती ही जी कार्यरत स्मृती असते ती त्याला ऐनवेळी निकडीचे बदल घडवायची सूचना देण्यास कमी पडते. ‘वेळ पाहून खेळ करा’ हे खरेतर शारीरिक क्षमतेच्या पलीकडे मानसिक क्षमतेवर अवलंबून आहे. यासाठी कार्यरत स्मृती ही शिथिल, शांत आणि कार्यतत्पर असणं आवश्यक आहे. आपण कितीवेळा विराट कोहलीवर आणि ‘कॅप्टन कूल’ धोनीवर चिडलो आहोत. ते एवढे अनुभवी असून त्यांनी असे चुकार क्षेत्ररक्षण कसे लावले? पलीकडचा फलंदाज मध्यम गोलंदाजीला फटके ठोकतो, हे माहीत असूनही मध्यमगती गोलंदाजांना त्यांच्यासमोर का आणले? असे अनेक प्रश्न विचारत शेवटी ‘त्यांचे डोके ठिकाणावर आहे का’ असा खोचक शेलक्या शब्दांतला सवाल करतो. अर्थात, अनुभवी खेळाडू विशेषतः कर्णधार प्रचंड मानसिक दबावाखाली असतील, तर त्यांचे मेंदू थार्‍यावर नसतात. कार्यरत स्मृती परिस्थितीचे व्यवस्थित आकलन करण्यास चुकते आणि चुकीचे निर्णय अनाहूतपणे घेतले जातात. अनेक वेळा कार्यरत स्मृतीची क्षमता तणाव नियंत्रित करण्यास खर्ची पडते आणि मैदानावरील तांत्रिक खेळातील निर्णय चुकतात. काही खेळाडू ज्यांना मैदानावरील तणावाची सवय नसेल, तर ते शांतपणे उत्स्फूर्त निर्णय घेतात, जिथे कार्यरत स्मृती कमी वापरावी लागते. कधीकधी तो एक उत्तम योगायोग ठरतो. हे अंतर्ज्ञानी निर्णय शहाणपणाचे असतीलच असे नाही, पण एखादा कर्णधार यामुळे आपले डोके शांत ठेवू शकतो.



दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मानवाची उत्क्रांती जर व्यवस्थित लक्षात घेतली, तर आपल्या लक्षात येईल की, एखाद्या धोक्याच्या स्थितीत आपल्याला गरज असते, ती एकाग्रतेची व पूर्ण ध्यान देऊन निर्णय घेण्याची. आपल्या जीवाला धोकादायक गोष्टींची जाणीव वा संवेदना पटकन कळायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला जीव वाचविण्यासाठी एक जलद निर्णय घेता येईल. कारण, अशावेळी हातात वेळ खूप कमी असतो. याचा अर्थ असा होतो की, कधी कधी गंभीर प्रकारचा तणाव आपली एकाग्रता तीक्ष्ण झाल्यामुळे आपली कार्यक्षमता वाढविते. Attentional control theory म्हणजे ‘एकाग्रता नियोजन सिद्धांत’ असे वर्तवतो की, तणाव, तणावजन्य स्थितीकडे आपले लक्ष केंद्रित करू शकतो. याचा अर्थ असा होतो का, ज्या व्यक्तीला अधिक तणावजन्यता असते अशी व्यक्ती ही जिची तणावजन्यता कमी असते अशा व्यक्तीपेक्षा तणावाचा सामना करण्यास अधिक तत्पर असते? कठीण प्रश्न आहे. अशा तणावजन्य स्थितीत तीक्ष्ण बनलेल्या एकाग्रतेने एखाद्याची कार्यक्षमता वर्धित होते, असे ठामपणे मानसशास्त्राला सांगत येणे कठीण आहे. जंगलातून अचानक दिसणारा सिंह हा जीवाला भयभीत करतो, त्यासाठी आपण तयार असायला पाहिजे यात वादच नाही. पण, प्रत्येक झुडुपामागेच सिंह बसलेला आहे, असे गृहित धरणे चक्क वेडेपणा आहे. सिंहच आहे, तो कुठेही दबा धरून असणारच नाही का? तसेच झुडुपामागेच सिंह असेल, हे गृहित धरणे जसे शहाणपणाचे लक्षण नाही, तसेच खेळाडूंनीही एखाद्या खेळाडूची वा टीमची क्षमता अमुकच आहे आणि तेवढेच आव्हान गृहित धरणे चुकीचे आहे. कुठल्याक्षणी कुठला गोलंदाज कधी गुगली टाकेल, याचा कुणाला अंदाज येत नाही. यशस्वी खेळाडूंची कार्यक्षमता त्याच्या थंड डोक्यात असते.


असलेल्या माहितीचा उपयोग करावा, पण माहीत नसलेली खेळी कुणी खेळला तर ऐनवेळी नवीन तंत्रयोजना करण्यासाठी गरज असते, ती एकचित्त मनाची आणि बर्फाळलेल्या डोक्याची. म्हणून तर खूप अभ्यास करुन कमी गुण मिळालेले आणि शांत डोक्याच्या बळावर कमी अभ्यास करून ‘विजयी भव’ झालेले विद्यार्थी याचे उत्तम उदाहरण आहे. आहे की नाही, थंड डोक्याने काही प्रभावी शिकण्यासारखे...!
 
- डॉ. शुभांगी पारकर







Powered By Sangraha 9.0