गोवा आणि शिव-शंभू छत्रपती : भाग-३

06 Nov 2021 20:58:38

हातकातरो खांब 2_1 &n



रुपेरी अन् चंदेरी वाळूच्या समुद्रकिनार्‍यासह ‘फेणी, फेस्त, फुटबॉल, फॉरेस्ट, फूड अन् फिश’ यासाठी जगभर प्रख्यात असलेल्या ‘फॅन्टास्टिक गोव्या’त आपण जातो. मौज, मज्जा, मस्ती अन् धिंगाणाही करतो, पण एक इतिहासप्रेमी म्हणून कधीतरी एक आगळ्या-वेगळ्या दृष्टिकोनातून या कदंबांच्या गोमंतकाची सफर करायला पाहिजे. शिव-शंभू छत्रपती आणि मराठ्यांच्या पराक्रमाशी, हालचालींशी निगडित असलेल्या इथल्या खाणाखुणा अनुभवल्या पाहिजेत. त्या खुणांवरील इतिहास नकलून घेतला पाहिजे.
गोव्यात श्रमपरिहार करावयास गेल्यानंतर या पराक्रमी ठिकाणाला भेट न देणे म्हणजेच इतिहासप्रेमींनी जणूकाही गुन्हा करणेच होय. येथील चराचरात त्या रौद्र संभाजी महाराजांचे शौर्य भरले आहे. येथल्या मातीला कान लावले की, ती बर्‍याच शौर्याच्या गोष्टी कथन करते.गोवा म्हणजे फक्त बेधुंद जलयात्रा नव्हे, तर गोवा म्हणजे अतिधुंद मराठ्यांचा पराक्रम होय. कधीतरी हे सारे पाहा. डोळ्यांत साठवा अन् आपल्या पुढील पिढीकडे सुपूर्द करा...धर्मांध फिरंग्यांच्या गोव्याच्या सीमेवरील ‘सांतइस्टेव्ह’ किल्ला मराठ्यांच्याच हाती राहिला. तो विजरईच्या हातचा गेला, ही हुरहूर मात्र सार्‍यांच्याच मनाला चटका लावून गेली. या किल्ल्यातील चर्च, किल्ल्याचे प्रवेशद्वार, त्यावरील पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आजही अस्तित्वात आहेत. कुंभारजुवेच्या संग्रामाच्या खुणा त्या मांडवी किनारी डोळे मिटल्यास समोर येतात फक्त आपल्या नेत्रकमलांमध्ये तो प्रसंग चितारण्याची हिंमत पाहिजे. जर का विजरई त्या हल्ल्यात ठार झाला असता, तर तो इतिहासातील सुवर्णक्षण ठरला असता, गोव्याच्या स्वातंत्र्याची किल्ली ठरला असता. पण, नियतीला हे ‘जर-तर’ मान्य नसावेत.


बचावलेला विजरई कोंदीद-द-आलव्होर हा मांडवी नदी पार करून बॉ जिझस चर्चमध्ये आश्रयार्थ गेला. त्याने सेंट झेविअरची प्रार्थना हाकायला सुरुवात केली. आपला राजदंड झेविअरच्या प्रेताच्या हातात दिला. राजचिन्ह व स्वलिखित अर्ज त्याच्या पायाशी ठेऊन प्रार्थना केली. कारण, त्याच दरम्यान संभाजी महाराज २० हजार पायदळ, चार ते पाच हजार घोडदळ व दहा हत्ती घेऊन साष्टी व बार्देश प्रांतात धुमाकूळ घालत होते.त्या फिरंग्यांनी प्रेताला केलेली प्रार्थना फळाला आली, पण लोकगंगा मांडवी मात्र आपल्याच लेकरावर, आपल्या राजावर रुसून बसली. इतिहासातील हा एक दुर्दैवी योगायोग झाला. शहाआलमचं सैन्य रामदरा घाट उतरून गोव्याकडे येऊ लागल्याचे समजताच संभाजी महाराज रायगडी परतले. गोवा स्वराज्यात घ्यायचा राहूनच गेला.आपण ‘पिकनिक’ला गोव्याला गेल्यानंतर ‘ओल्ड गोव्या’च्या चर्चमध्ये जातो. हाच प्रदेश फिरंग्यांच्या राजधानीचा. हाच तो गोवा प्रांत. या परिसराच्या उत्तर बाजूस म्हणजेच मांडवी नदीच्या बाजूस याचे प्रवेशद्वार आहे. जणूकाही ‘गेट वे ऑफ गोवा’ असाच याचा पूर्वी तोरा असावा. या प्रवेशद्वारावर वास्को-द-गामा याचा नातू फ्रान्सिस्को-द-गामा याचे शिल्प व पोर्तुगीज शिलालेख आहे. आता या गामा याचे कर्तृत्व आपल्या हिंदुस्थानच्या काही कामा आले की नाही, ही बाब अलहिदा; पण या वास्तू मात्र आपण नजरेत साठवून ठेवल्या पाहिजेत.




या गोवा शहराच्या म्हणजेच आताच्या ‘ओल्ड गोव्या’च्या परिसरातच क्रूरतेचा कळस असणारा हातकातरो खांब आहे. जुलूम, अन्याय अन् पाशवी अत्याचार हे शब्द जणू काही इथल्या ख्रिस्ती सोडून इतर धर्मीयांच्या पाचवीलाच पुजलेले होते. ख्रिस्ती धर्म न स्वीकारणार्‍या कित्येक धर्मप्रेमींचे हात, शीर याच खांबाला बांधून कलम केले असतील. कलम म्हटले की त्यातील दाहकता समजत नाही, त्यासाठी ’कापून टाकले’ असतील हाच शब्दप्रयोग योग्य ठरतो.बॉ जिझस चर्चमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला थोड्याच उंचीवर सेंट झेविअरची शवपेटी ठेवली आहे. दर दहा वर्षांनी ती खाली काढून लोकदर्शनार्थ ठेवतात. या संतांचे स्वधर्मासाठी कार्यकर्तृत्व, परधर्मीयांवर केलेले आघात, अन्याय यावर सविस्तर लेखमालाच होईल.हे चर्च आहे की, अगोदरचे शिवालय हा वादही आहेच. काही इतिहास संशोधक, इतिहासतज्ज्ञ यावर भाष्य करतीलच. गोवा फिरायला जाणारे भोळे लोक या चर्चमध्ये आजही नारळ आणि अगरबत्ती घेऊन जाताना दिसले की, मोठे अजब वाटते. काही महाभागांना त्या जिझसच्या मूर्तीसमोरून (अर्थातच दूरवरून) नारळ उतरताना मी पाहिले आहे.




आपले देवभोळे हिंदू लोक सर्वधर्मसमभाव किती प्राणपणाने जपतात, याचेच हे उदाहरण आहे. गोव्यातील फिरंगी बांडगुळ कायमचे नेस्तनाबूत करण्याची मराठ्यांच्या दोन्ही छत्रपतींच्या मनातील मनीषा पूर्ण होऊ शकली नाही.शिव-शंभू छत्रपतींचे या गोमंतकावर विशेष प्रेम होते. स्वधर्मीय रयतेची परवड त्यांना सहनच होत नव्हती. त्या पावन, पवित्र श्री सप्तकोटीश्वराचे स्थान असलेल्या गोमंतकाला पूर्णतः स्वतंत्र करण्याची इच्छा मराठ्यांच्या दोन्ही छत्रपतींची अपूर्णच राहिली. या भूमीला परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी अक्षरशः जीवाचा आटापिटाही केला. स्वतःचा जीवही धोक्यात टाकला. राजकारण अन् समाजकारणानेही खूपच खेळली पण, शेवटी दुर्दैव...अखेरीस दि. १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय संघराज्यात बळजबरीने सामावून घेईपर्यंत या भूमीचा अन् येथील हिंदूधर्मीयांचा वनवास चालूच होता. धर्मपिपासू लोकांचा हैदोस दिवसेंदिवस चढ्या क्रमाने होता होता. आजही १९६१ च्या म्हणजेच गोवा स्वतंत्र होण्याच्या अगोदर जन्म झालेले ‘गोवन नागरिक’ हे ‘पोर्तुगाली नागरिक’ म्हणूनही गणले जातात. त्यांना कायद्याने दोन देशांचे नागरिकत्व दिले आहे. हिंदुस्थान/भारत/इंडिया आणि पोर्तुगाल. पोर्तुगाल फुटबॉल संघ हा इथल्या बर्‍याच लोकांना आपल्या देशाचा संघ वाटतो. त्यांचा विजय मोठ्या जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला जातो.रुपेरी अन् चंदेरी वाळूच्या समुद्रकिनार्‍यासह ‘फेणी, फेस्त, फुटबॉल, फॉरेस्ट, फूड अन् फिश’ यासाठी जगभर प्रख्यात असलेल्या ‘फॅन्टास्टिक गोव्या’त आपण जातो. मौज, मज्जा, मस्ती अन् धिंगाणाही करतो, पण एक इतिहासप्रेमी म्हणून कधीतरी एक आगळ्या-वेगळ्या दृष्टिकोनातून या कदंबांच्या गोमंतकाची सफर करायला पाहिजे. शिव-शंभू छत्रपती आणि मराठ्यांच्या पराक्रमाशी, हालचालींशी निगडित असलेल्या इथल्या खाणाखुणा अनुभवल्या पाहिजेत. त्या खुणांवरील इतिहास नकलून घेतला पाहिजे.




राजधानीपासून कोसो दूर असलेल्या आपल्या धर्मबंधू-भगिनींसाठी तळमळीने तलवार उचललेले छत्रपती त्या भूमीत स्मरले पाहिजेत. आपल्या अशा कृतीनेच या पवित्रभूमीच्या काही प्रमाणात अंधारात राहिलेल्या बाजूस खरा न्याय मिळेल.इतिहासप्रेमींनो जा, गोव्यात जा! अनेक मराठ्यांच्या रक्ताने अभिषेक केलेली ती भूमी आपणासोबत नवीन गुजगोष्टी जरूर करेल.
सर्व ज्ञात- अज्ञात वीरांना शतशः नमन.


संदर्भ सूची

१) राजा शिवछत्रपती
२) रणपति शिवाजीमहाराज
३) दंडाराजपुरी दुर्ग
४) श्री सप्तकोटीश्वर देवस्थान
समग्र इतिहास
५) इतिहासाच्या पाऊलखुणा
६) शिवपुत्र छत्रपती संभाजी
७) शिवपुत्र संभाजी
८) छत्रपती संभाजी स्मारकग्रंथ




- मोहन फराडे












Powered By Sangraha 9.0