याआधी ’आसाम रायफल्स’चा वापर केवळ ईशान्य भारतातील बंडखोरी आणि भारत- म्यानमार सीमा यांच्या संरक्षणाकरिता व्हायचा. आता चीनच्या वाढत्या आव्हानामुळे त्यांच्या कार्यशैलीमध्येही कालानुरुप बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी ’आसाम रायफल्स’ बंडखोर विरोधी अभियानातून काढून भारत-चीन सीमेवरती तैनात केले जाईल. याशिवाय पारंपरिक युद्धात लढण्याकरिता त्यांना मोठी शस्त्रे म्हणजे ‘मोटर्स’, ‘ग्रेनेड लॉन्चर’, ‘मिसाईल’, १०५ मिलिमीटर जुन्या तोफा दिला जाईल.
‘आसाम रायफल्स’ने (Sentinels Of North East) दि. ३१ ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करताना, ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रतिज्ञा समारंभ, वादविवाद आणि चित्रकला स्पर्धा, ‘रन फॉर युनिटी कॅम्पेन’ आणि वृक्षारोपण मोहीम अशा असंख्य कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामुळे ईशान्येकडील राज्यांना बाकी देशवासीयांच्या बरोबर जोडण्यात निश्चितच मदत मिळेल.‘आसाम रायफल्स’ हे भारतातील सगळ्यात जुने निमलष्करी दल आहे. ’Para Military Force’ या दलास १९१३ साली ‘आसाम रायफल्स’ हे नाव देण्यात आले. १९४७ पासून या दलाने अनेक सुरक्षा कारवायांमध्ये भाग घेतला आहे. या दलाने दहशतवादविरोधी कारवाया, तसेच सीमा सुरक्षा कार्यात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरी दलांना मदत केली आहे. याशिवाय ‘आसाम रायफल्स’ दुर्गम भागात दळणवळणाची, वैद्यकीय व शैक्षणिक मदतदेखील करते. युद्धकालीन परिस्थितीमध्ये देशाच्या सीमेच्या आतल्या भागांत सुरक्षा पुरविण्यासाठी या दलाचा उपयोग होतो.
म्यानमार सीमेवर तैनात
२००२ सालापासून ‘आसाम रायफल्स’ म्यानमार सीमेवर तैनात आहे. या दलात ४६ बटालियन असून त्यांत एकूण ६६,४११ सैनिक आहेत. हे दल गृहमंत्रालयाच्या अखत्यारित आहे. मात्र, लढाईकरिता हे दल भारतीय सैन्याखाली काम करते.’आसाम रायफल्स’चे जवान याआधी ईशान्य भारतातून भरती केले जायचे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून भारतातल्या सगळ्या सीमावर्ती जिल्ह्यातील युवकांना ’आसाम रायफल्स’मध्ये भरती होता येते. यामुळे ‘आसाम रायफल’मध्ये भारतातल्या प्रत्येक राज्यातील सैनिक आहेत. ‘आसाम रायफल’चे अधिकारी मात्र भारतीय सैन्यातून येतात.आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, मेघालय व त्रिपुरा या सात राज्यांत ‘आसाम रायफल्स’ला भूसेनेकडूनच दारूगोळा, हत्यारे, इतर युद्धोपयोगी सामग्री आणि प्रसंगी विमानाद्वारे अन्नपुरवठाही करण्यात येतो.
अनेक सुरक्षा पुरस्कार
’आसाम रायफल्स’ने १९४७ नंतर विविध मोहिमांमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांना त्याकरिता अनेक शूरता पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये चार ‘अशोकचक्र’, पाच ‘वीरचक्र’, ४१ ‘कीर्तिचक्र’, १४४ ‘शौर्यचक्र’, ११ ‘परमविशिष्ट सेवा पदक’, १७ ‘अतिविशिष्ट सेवा पदक’, ३६९ सेनापदक, ८१ विशिष्ट सेवा पदक, पाच युद्धसेवा पदकांनी गौरवण्यात आले आहे. ‘आसाम रायफल’चे डायरेक्टर जनरल ‘राजपूत रेजिमेंट’चे लेफ्टनंट जनरल प्रदीपचंद्रन नायर, ‘एव्हीएसएम’, ‘व्हाईएसएम’ आहेत. ‘डीजीएआर’चे कार्यालय शिलाँग येथे आहे.याआधी ’आसाम रायफल्स’चा वापर केवळ ईशान्य भारतातील बंडखोरी आणि भारत- म्यानमार सीमा यांच्या संरक्षणाकरिता व्हायचा. आता चीनच्या वाढत्या आव्हानामुळे त्यांच्या कार्यशैलीमध्येही कालानुरुप बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी ’आसाम रायफल्स’ बंडखोर विरोधी अभियानातून काढून भारत-चीन सीमेवरती तैनात केले जाईल. याशिवाय पारंपरिक युद्धात लढण्याकरिता त्यांना मोठी शस्त्रे म्हणजे ‘मोटर्स’, ‘ग्रेनेड लॉन्चर’, ‘मिसाईल’, १०५ मिलिमीटर जुन्या तोफा दिला जाईल. काही महिन्यात ‘आसाम रायफल’ला आसाममधून अरुणाचल प्रदेशच्या सीमावर पाठवण्यात येईल. अर्थात, ते भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशनल कंट्रोल’ खालती असतील. म्हणजेच अरुणाचल प्रदेशची सीमांवर आता भारतीय सैन्य आणि ‘आसाम रायफल’ दोन्ही मिळून लक्ष ठेवतील. महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय सैन्य तैनात असेल व इतर ठिकाणी ’आसाम रायफल्स’ला तैनात केले जाईल.सध्या ’आसाम रायफल्स’च्या ४६ बटालियनपैकी २० या भारत-म्यानमार सीमेवर तैनात आहेत. अजून नऊ बटालियन या सीमेवर येणार्या काळामध्ये वाढवल्या जातील. बाकीच्या भारत चीन सीमेवर तैनात होतील.
सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे बंडखोरांचे कंबरडे मोडले
भारतीय सैन्याच्या १४ बटालियन म्हणजे दोन डिव्हिजन बंडखोरांविरुद्ध अभियानाकरिता तैनात केल्या होत्या. त्यांना आता भारत-चीन सीमेकडे नेले जात आहे. कारण, भारतीय सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे बंडखोरांचे आता कंबरडे मोडले आहे. सध्या ईशान्य भारतात या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खास तर नागालँड, मणिपूर आणि आसाममध्ये १८ ‘इंडिया रिझल्ट बटालियन’ उभ्या केल्या जात आहे, याशिवाय अजून चार ‘सीआरपीएफ’च्या चार बटालियन तयार केल्या जात आहेत. बंडखोरांच्या विरुद्ध गरज पडली, तर ‘इंडिया रिझल्ट बटालियन’ आणि ‘सीआरपीएफ’चा वापर केला जाईल. ’आसाम रायफल्स’ भारत-चीन सीमेकडे लक्ष ठेवेल. यामुळे ईशान्य भारत चित्र सीमेचे ‘डिफेन्स’, आक्रमक कारवाई मजबूत होतील.
अरुणाचल प्रदेश खोर्याच्या मध्यभागी एक रस्ता
चीन, अरुणाचल प्रदेशच्या समोरील भागात आपले रस्ते, रेल्वेलाईन, पाईपलाईन अजून जास्त मजबूत करत आहे. म्हणून या भागात असलेले रस्ते आता चीन सीमेपर्यंत पोहोचवले जातील.अरुणाचल प्रदेशमध्ये भूरचना अशी आहे की, तिथे वेगवेगळ्या नद्यांच्या खोर्यामुळे, अरुणाचल प्रदेश वेगवेगळ्या भागात विभागला गेला आहे. जसे की, लोहित नदी, सियांग नदी, सियोम नदी, सुबानसरी नदी, सरली, हुरी नद्या यांच्या खोर्यामध्ये अरुणाचल प्रदेश विभाजित आहे. एका खोर्यातून दुसर्या खोर्यात जायचे असेल, तर अरुणाचल प्रदेशमधून जाता येत नाही. पहिले त्या खोर्यातून आसाममध्ये यावे लागते आणि आसाममधून सपाट भूभागातून मग दुसर्या खोर्यामध्ये प्रवेश करावा लागतो.म्हणूनच आता सगळ्या खोर्यांच्या मध्यभागी जाणारा एक रस्ता बांधला जात आहे, ज्यामुळे ‘आसाम रायफल’ आणि सैन्याची तैनाती किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल एका खोर्यातून दुसर्या खोर्यात करणे अधिक सोईस्कर ठरेल. याशिवाय या भागात उत्तम दर्जाचे रस्तेबांधणीचे काम सुरु असून, हे नवीन रस्ते सैन्याच्या हालचालीकरिता फारच उपयुक्त ठरतील.
’आसाम रायफल्स’चे नियंत्रण गृहमंत्रालयाच्या अखत्यारित आणण्याच्या मंत्रालयाच्या प्रस्तावाला लष्कराने विरोध दर्शविला आहे. असे केल्याने भारत-चीन संवेदनशील सीमेवरील टेहळणीवर परिणाम होऊ शकतो. चीन सीमा भागात सैन्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करीत असल्याच्या व आक्रमक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हे धोकादायक ठरू शकते. सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमा बळकट करण्याकरिता ‘आसाम रायफल्स’वर लष्कराचे नियंत्रण जरुरी आहे.
’आसाम रायफल्स’ महिला कॉन्स्टेबलचा उपयोग
या भागामध्ये त्या-त्या राज्यांतील महिलाही आपल्या कुटुंबांबरोबर सीमावर्ती भागात राहत असतात. यामुळे या महिला नागरिकांची तपासणी करण्याकरिता महिला कॉन्स्टेबलचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो.’आसाम रायफल्स’ दलातील महिला कॉन्स्टेबलची प्रामुख्याने ऑफिसेस, सिग्नल यंत्रणा, ‘रिपेअर’ करणार्या यंत्रणा, दारूगोळा पुरविणार्या यंत्रणा या ‘सपोर्टिंग ब्रँचेस’पुरती नियुक्ती करण्यात येते. ’आसाम रायफल्स’मध्ये पुरुषांना आठ तास काम करावे लागते. मात्र, महिलांची ड्यूटी सहा तासांची असते. ती पण फक्त दिवसाच्या वेळेला. कारण, रात्रीच्या वेळेला त्यांना सीमेवर पहारा करण्यासाठी तैनात ठेवणे तितकेसे सुरक्षित नाही. आज ज्या ठिकाणी शत्रूपासून धोका कमी आहे. या ठिकाणी त्यांना ठेवले जाते.
भारत-म्यानमार, भारत-चीन सीमेकडे, बंडखोरीकडे लक्ष देणे गरजेचे
भारत-म्यानमार सीमा पुरेशी सुरक्षित नाही. कारण, या भागात सीमेजवळ राहणार्या दोन्ही देशांच्या जाती आणि जमातींना एक दुसर्या देशात जाण्यास परवानगी आहे. याला ‘फ्री मूव्हमेंट रिजिम’ असे म्हटले जाते. यामुळे भारत-म्यानमार सीमा ‘स्मगलिंग’ होणारी सीमा बनली आहे. म्हणून या सीमेवरसुद्धा लक्ष ठेवले जात आहे. मागच्या काही वर्षांमध्ये ’आसाम रायफल्स’ने या सीमेवर ९०० कोटींहून जास्त रुपयाचे ‘स्मगलिंग’ माल आणि ड्रग्ज पकडले आहे. म्हणूनच एकाच वेळेला आपल्याला भारत-म्यानमार आणि भारत-चीन सीमेकडे लक्ष द्यावे लागेल. आज बंडखोरी थोड्या प्रमाणामध्ये मणिपूरमध्ये सुरू आहे, त्यावर लक्ष ठेवावे लागेल आणि चिनी सैन्याचे आव्हान ईशान्य भारताच्या सीमेवरती येऊ शकते. या सगळ्या आव्हानांना लगेच उत्तर देण्याकरिता तयार राहावे लागेल. ’आसाम रायफल्स’ भारतीय सैन्याच्या मदतीला दिल्यामुळे ही आव्हाने स्वीकारणे जास्त सोपे झाले आहे.’आसाम रायफल्स’चे जवान वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त होतात. जर त्यांना सैन्याला मदत करण्याकरिता अतिउंच भागात जावे लागले तर मोठी अडचण होऊ शकते म्हणून त्यांचे निवृत्तीचे वय कमी करावे. निवृत्तीनंतर ‘आसाम रायफल्स’च्या सैनिकांना सीमावर्ती भागात वसवण्यात आले, तर भारत-चीन सीमा मजबूत होऊ शकते.
- (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन