महती केदारनाथची...

04 Nov 2021 23:50:02

Kedarnath_1  H
 
 
 
आज शुक्रवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ दौर्‍यावर असून ते येथील आद्य शंकराचार्य समाधी आणि त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्याचप्रमाणे विविध विकासप्रकल्पांचेही लोकार्पण-भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न होईल. त्यानिमित्ताने केदारनाथ या तीर्थक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
 
 
मंदाकिनी नदीच्या तीरावर, चोरबाडी तलावाच्या खाली स्थापन केलेल्या केदारनाथ मंदिराचे वर्णन (३,५८३ मीटर उंचीवर असलेले) स्कंद पुराणात आढळते. या पुराणात या मंदिराची स्तुती करण्यात आली आहे. एकेकाळी मंदाकिनी नदीच्या खोर्‍यात विराट ग्लेशियर म्हणजेच हिमनद्या होत्या, आता मात्र त्या सर्व आक्रसल्या आहेत. मंदाकिनी नदी अनेक तीर्थस्थळांच्या काठाने वाहते, जसे की केदारनाथ, गुप्तकाशी, चंद्रपुरी, तीलवाडा आणि रुद्रप्रयाग. रुद्रप्रयागला ती अलकनंदा नदीला जाऊन मिळते. हिंदू धर्मग्रंथातील मान्यतेनुसार, भगवान शिवशंकराने कैलास परिसर सोडून, केदारनाथच्या गुहेत आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. या मंदिरात, सदाशिव म्हणजेच, शिवाच्या अदृश्य स्वरूपाची आराधना केली जाते. शिवाने पांडवांपासून सुटका मिळवण्यासाठी, इथे बैलाच्या स्वरूपात आश्रय घेतला. मात्र, पांडवांसमोर प्रकट होण्याची इच्छा नसलेल्या शिवाने स्वतःला उलट्या बाजूने भूमीत गाडून घेतले आणि त्याच्या शरीराचा खालचा भाग, पृष्ठभागावरच राहिला, अशी आख्यायिका आहे. शिवाच्या शरीराच्या इतर चार भागांची पूजा हिमालय पर्वतशिखरांवर असलेल्याच इतर चार तीर्थक्षेत्रांवर केली जाते. यात, शिवाचे बाहू तुंगनाथ इथे, मुख रुद्रनाथ इथे, नाभी मधमेश्वर इथे आणि जटा व मस्तक कलपेश्वर इथे आहेत, अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच या पाच तीर्थक्षेत्रांना मिळून, ‘पंचकेदार’ असे म्हटले जाते. अनुक्रमे या सर्व तीर्थस्थळांचे दर्शन करण्याची प्रत्येक हिंदू भाविकांची आकांक्षा असते. भगवान शिवाच्या शरीराचा ऊर्ध्व भाग नेपाळच्या मुखरबिंद इथे पृष्ठभागावर आला आहे, अशी मान्यता आहे, त्याला तिथे ‘पशुपतिनाथ‘ म्हणून पूजले जाते.
 
 
पांडवांनी केलेल्या महापापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या श्रद्धा-भक्तीचे प्रतीक म्हणून, पांडवांनी पाच शिवतीर्थाची स्थापना केली. हे पंचकेदार म्हणजे- केदारनाथ, मध्यमेश्वर, रुद्रनाथ, तुंगनाथ आणि कलपेश्वर. त्याशिवायही इथे इतर अनेक तीर्थस्थळे आहेत.
 
 
पांडवांशी संबंधितही अनेक जागा इथे आहेत- जसे की रेतकुंड, हंसकुंड, सिंधुसागर, त्रिवेणी तीर्थ, गांधी सागर आणि महापंथ इत्यादी. महापंथावर एके ठिकाणी, भैरव उडी नावाचा एक उंच कडा आहे, जिथून भाविक पूर्वी भगवान शिवाला आपले आयुष्य समर्पित करण्याच्या भावनेतून उडी मारून आयुष्य संपवत असत. १९व्या शतकात ही प्रथा कायमची बंद करण्यात आली. त्याशिवाय अशाही काही आख्यायिका आहेत की, महर्षी व्यासांच्या आज्ञेनुसार, पांडवांनी हिमालयातील गढवाल भागाचा त्याग केला आणि भगवान शिवाची आराधना करण्यासाठी ते मंदाकिनी नदीत लीन झाले. व्याकरणकार वररुचीनेही गढवाल प्रांताला भेट दिली आणि तिथे भगवान शिवाच्या पायथ्याशी प्रायश्चित घेतल्यानंतरच त्यांना त्यांच्या पाणिणीय व्याकरणासाठीचे ज्ञान प्राप्त झाले. अशा आख्यायिकांमुळेच, हिमालयातील ही पर्वत शिखरे आपल्या सर्व लौकिक इच्छा समर्पित करण्याचे आणि मोक्ष मिळवण्याचा मार्ग दाखवणारी तीर्थक्षेत्र आहेत, अशी बहुतांश हिंदूंची समजूत आहे, यात काही आश्चर्य नाही.
 
 
हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करणारे केरळचे आदिगुरू शंकराचार्य यांनी आठव्या शतकात, गढवालपर्यंत पदयात्रा केली (हा काळ, हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात मोठ्या संख्येने होत असलेल्या धर्मपरिवर्तनाचा होता), त्यांनी उत्तर भागात, वासुदेवाची म्हणजेच विष्णूच्या एका स्वरूपाची पूजा करण्याची शिकवण लोकांना दिली. त्यांनीच हिमालयाच्या तीर्थस्थळांवर तीर्थयात्रा करण्यावर भर दिला. एवढेच नाही, तर त्यांनी जोशीमठाची स्थापना केली, बद्रिनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर ते केदारनाथला गेले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
 
 
केदारनाथ तीर्थक्षेत्र हिंदूंच्या मान्यतेनुसार, १२ ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पवित्र, शुद्ध आणि महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग स्वयंभू असून, इथे असलेला विशाल शिलाखंड हा नैसर्गिकरीत्याच, पृथ्वीच्या पोटातून बाहेर निघाल्यासारखा वाटतो. पांडवांनी इथे केदारनाथ मंदिराची स्थापना केली आणि हे मंदिर बांधले, अशीही पारंपरिक मान्यता आहे. तसेच, श्रीशंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि दक्षिणेतील शैव पुजार्‍यांना इथे पूजा करण्यासाठी नियुक्त केले. काही जाणकार असेही सांगतात की, श्री शंकराचार्य, जे शिवाचे अवतार मानले जात, त्यांनी आपल्या देहाचा लवकर त्याग करून कैलास पर्वतावर प्रयाण केले.
 
 
या मंदिरात असलेल्या जुन्या शिलालेखावरून असेही कळते की, माळव्याचा राजा भोज त्रिभुवन (आधुनिक दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश) याने हे मंदिर बांधले आणि त्यांनी आपल्या आयुष्यात सात वेळा केदारनाथाची यात्रा केली होती. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम नमुना आहे. मंदिर प्रचंड म्हणजे सुमारे ७६ फूट उंच आहे. आत सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत. गाभारा म्हणजेच गर्भगृहात, खडकांची पिंडीच्या आकाराची रचना आहे, जी शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखली जाते. केदार, गुप्तकाशी, उखीमठ आणि मधमेश्वर इथे पूजा करणारे पुजारी, उखीमठात राहणारे असतात. ते विश्रब पंथाचे जंगम साधू असतात. इतर मंदिरात, तुंगनाथ, त्रिजुगीनारायण आणि कालीमठ इथले रहिवासी असतात. हे सर्व पुजारी रवळ (रावल)च्या डोंगराळ भागातले स्थानिक रहिवासी असतात. हा समुदाय, शैव पंथातीलच, जंगम गोसावी समुदाय मानला जातो. त्यांचे महंत, ज्यांना रावळ मानले जाते आणि त्यांचे शिष्यदेखील मलबार इथले मानले जातात. जंगम शिवाची, म्हणजेच महादेवाची, लिंगस्वरूपात आराधना करतात. या संपूर्ण पर्वतरांगामध्ये महादेव हा सर्व भयानक आणि विध्वंसक शक्तींचा देव मानला जातो. उत्पत्ती-लय-स्थिती या तत्त्वानुसार, लय म्हणजे विध्वंसाचे प्रतीक असलेला शिव, ऊर्जास्वरूपात पुन्हा सर्व जगाची निर्मिती करणारा म्हणजेच, ‘काहीही नष्ट होत नाही’ या शास्त्रीय विश्वासाचे प्रतीक मानला जातो.
 
 
केदारनाथ खोर्‍यात, तसेच उत्तराखंडच्या इतर राज्यांत, १६ आणि १७ जून, २०१३ रोजी भयंकर पूर आणि प्रलय आला. १६ जून रोजी महाभयंकर दरड कोसळून केदारनाथ मंदिर परिसर उद्ध्वस्त झाला. या नैसर्गिक आपत्तीनंतर, नवीन केदारपुरी विकसित करण्यात आली. भाविकांना सुरक्षित ठेवण्यासाठी, नवा मार्ग विकसित करण्यात आला.
 
- प्रा. एस. सी. बागडी
 
(लेखक हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ, श्रीनगर, उत्तराखंड येथील माजी अधिष्ठाता आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0