न्यायालयात पुरावे देण्यात मंत्री नवाब मलिक अपयशी भाजप नेते मोहित भारतीय यांचा दावा

30 Nov 2021 12:54:49

NAWAB MALIK23.jpg_1 




मुंबई :
राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक हे न्यायालयात पुरावे देण्यात अपयशी ठरल्याचा दावा भाजप नेते मोहित भारतीय यांनी सोमवारी केला.मोहित भारतीय यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी माझगाव न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान नवाब मलिक यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माझगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. शिवाय मलिक यांना पाच हजार रुपये अनामत जमा करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी दि. ३० डिसेंबरला होणार आहे.




 
दि.३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणासंदर्भात नवाब मलिक सातत्याने अनेक खुलासे करताना दिसलेे होते. यादरम्यान मलिकांनी आर्यन खानला अटक झाली नाही, तर त्यांचे अपहरण करून खंडणी मागण्यात आली आणि या कटकारस्थानाचा मुख्य सूत्रधार मोहित भारतीय असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे याप्रकरणी मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. मोहित भारतीय यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर न्यायालयाने नवाब मलिक यांना नोटीस बजावली होती.माझ्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न



आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करायचे होते. मात्र, नवाब मलिक यांचे आरोप जसे खोटे होते त्यानुसार कोणतेही पुरावे मलिक न्यायालयासमोर सादर करू शकले नाहीत. याउलट माझ्यावर आणि न्यायालयावर दबाव निर्माण करण्यासाठी हजारो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोरोना नियमांचे उल्लंघन करून न्यायालयाबाहेर एकत्र जमले. मात्र, देशातील नागरिक म्हणून मला न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयात कोणतेही पुरावे नसल्याने एकाही आरोपांवर ते आणि त्यांचे वकील उत्तर देऊ शकले नाही.




- मोहित भारतीय, भाजप नेते





 


Powered By Sangraha 9.0