प्रभाग सीमा पुनर्रचनेचा वाद चिघळला

03 Nov 2021 16:48:53
 
satam_1  H x W:
 
 
 
मुंबई : "मुंबई महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासनाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदेशीररीत्या केलेल्या प्रभाग सीमांच्या पुनर्रचनेचा मसुदा निवडणुक आयोगाकडे पाठवला आहे. त्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना मी पात्र लिहिणार आहे. कारण प्रभाग सीमांच्या पुनर्रचनेसाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बनविलेला मसुदा आणि महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेला मसुदा वेगळा आहे. त्यामुळे बदलण्यात आलेल्या प्रभाग सीमा पुनर्रचनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपचे नेते आणि आमदार अमित साटम यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. बुधवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी आ. अमित साटम यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
 
 
मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये छेडछाड
पुढे बोलताना आ.अमित साटम म्हणाले की, प्रभाग सीमा पुनर्रचनेचा मुद्द्दा ज्वलंत असतानाच शहरात आणखी एक कट शिजतो आहे. मुंबईतील काही विभागांमधील मतदारांची नावे ही मतदारयादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार काही लोकांच्या माध्यामातून घडवला जात आहे. हे एक षडयंत्र आहे. काही लोकांतर्फे रचण्यात आलेल्या या षड्यंत्रामुळे मुंबईतील असंख्य मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. अशा हीन प्रकारांवर भाजप लक्ष ठेवून आहे. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांना मी पत्र लिहून मागणी केलेली आहे.
 
 
महापालिका आयुक्त चहल यांच्यावर कारवाई करा
प्रभाग सीमांच्या पुनर्रचनेच्या वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल हे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता निर्मण झाली आहे. दरम्यान, प्रभाग सीमा पुनर्रचना प्रकरणात जर महापालिका आयुक्त दोषी आढळत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील आमदार अमित साटम यांच्याकडे केली आहे.
 
 
मतदारांची गैरसोय होणार
मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आली आहे. ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. तसंच पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भाजपनं केलाय.
 
 
फॉरेन्सिक ऑडिटची मागणी
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मूल्यांकन(Assessment), निवडणुक(Election) आणि माहिती तंत्रज्ञान(IT) या तीन विभागांच्या अधिकाऱ्यांचे लॅपटॉप, संगणके आणि ई मेल आयडी या गोष्टींचे फॉरेन्सिक ऑडिट करून त्याची चौकशी करण्यात यावी. जेणेकरून पालिका अधिकाऱ्यांनी बनविलेला मसुदा आणि पालिका आयुक्तांनी दाखल केलेला मसुदा हा पूर्णतः वेगळा आहे हे उघड होईल, अशी मागणी देखील आ.साटम यांनी यावेळी केली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0