लसीचा अग्रमान, तरी ‘कोरोना’चे थैमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2021   
Total Views |

Russia_1  H x W
एखादा विद्यार्थी परीक्षेपूर्वी जशी पोपटासारखी घोकमपट्टी करण्यात पटाईत असतो, आपला अभ्यास झाला म्हणून तो निर्धास्तही होऊन जातो. मात्र, जेव्हा प्रश्नपत्रिकेत उत्तरं लिहिण्याची वेळ येते, तेव्हा मात्र तो पुरता बिथरतो. काही सूचत नाही अन् शब्द लेखणीतून फुटत नाहीत. सध्या रशियाचीही अवस्था अशीच काहीशी. कारण, कोरोना नावाच्या अशाच जगासाठीच्या आजवर सर्वात अवघड ठरलेल्या प्रश्नपत्रिकेत सर्वप्रथम लसनिर्मिती आम्हीच केली म्हणून, प्रथम क्रमांक आमचाच म्हणून रशियाने पुरता बडेजाव मिरवला. आपणच कसे जगाच्या तुलनेत विज्ञान-तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात पुढारलेले आहोत, प्रतिस्पर्धी अमेरिकेपेक्षा रशियाच कसा अधिक विकसित आहे वगैरेच्या आविर्भावात रशिया आणि या देशाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन अगदी अभिमानाने मिरवत होते. पण, सध्या रशियात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून लसीकरणाचाही पुरता फज्जा उडालेला दिसतो. तेव्हा, लसीचा अग्रमान घेण्यासाठी अग्रेसर रशियामध्ये आज कोरोनाने पुन्हा थैमान का घातले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
खरंतर कोरोना प्रतिबंधक लसनिर्मिती आणि प्रत्यक्ष होणारे लसीकरण याचे प्रमाण समसमान असेलच असे नाही. कारण, एखादा देश लसनिर्मितीत जरी अग्रेसर असला, तरी तो लसीकरणाची प्रक्रिया कशी राबवितो, जनतेला त्यासंबंधी कसे प्रोत्साहित करतो अशा बऱ्याच घटकांवर लसीकरणाचे यशापयश अवलंबून असते. रशिया असेल किंवा अमेरिकेसारखा महासत्ता असलेला विकसित देश असेल, तिथे लसींचा पुरवठा तुलनेने सुरळीत होता. भारतासारखी लसटंचाई, लसीकरण केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा वगैरे चित्र या देशांत दिसले ते अभावानेच. पण, लसींचा पुरेसा साठा असूनही या देशांतील नागरिकांनी मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवलेली दिसते. आता रशियाचेच पाहा. ‘स्पुटनिक-व्ही’ ही लस रशियाने ऑगस्ट २०२० मध्येच बाजारात आणली. म्हणजेच कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर अवघ्या सहा-सात महिन्यांत रशियामध्ये कोरोनावर लसही उपलब्ध होती. परंतु, प्राप्त आकडेवारीनुसार रशियात केवळ एक तृतीयांशपेक्षा थोड्याशा अधिक नागरिकांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यातच जिथे जगभरात लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे, तिथे ‘स्पुटनिक लाईट’ या लसीचा केवळ एकच डोस परिणामकारक असल्याचेही संशोधनाअंती सिद्ध झाले. तसेच ‘स्पुटनिक’ लस ही रशियामध्ये लसीकरणासाठी मोफतही उपलब्ध होती. म्हणजेच लसीकरणाशी निगडित अशा विविध बाबतीत प्रचंड अनुकूलता असूनही रशियाच्या नागरिकांनी मात्र लसीकरणाला हरताळच फासला. आता त्यामागेही विविध कारणे समोर आलेली दिसतात. त्यापैकी सांगितले जाणारे एक प्रमुख कारण म्हणजे रशियाच्या लसीवर त्यांच्याच देशाच्या नागरिकांचा विश्वास नाही. परिणामी, रशियन नागरिक लस घेण्यासाठी टाळाटाळ करतात. तसेच लस आणि लसीकरणाची एकूणच प्रक्रिया याविषयी जनतेच्या मनात सकारात्मकता आणि विश्वासनिर्मितीत पुतिन सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. असेही काही रशियन नागरिक आहेत, जे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही लस घेण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. एकूणच काय तर लसीकरणाबाबतची निष्क्रियताच आता रशियन नागरिकांच्या जीवावर बेतलेली दिसते. कारण, रशियामध्ये दररोज कोरोनाची आकडेवारी वाढत असून मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही भर पडताना दिसते. दि. ३१ ऑक्टोबरच्या रविवारी रशियामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे तब्बल ४१ हजार रुग्ण आढळले. त्यामुळे सरकारने दि. ७ नोव्हेंबरपर्यंत देशभरात कडक ‘लॉकडाऊन’ जारी केला असून नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
याचाच अर्थ असा की, जोपर्यंत लसनिर्मितीला सकारात्मक सार्वत्रिक लसीकरणाच्या प्रक्रियेची जोड मिळत नाही, त्याविषयी जनजागृती, विश्वासनिर्मितीचे वातावरण तयार होत नाही, तोवर लसीकरणाची प्रक्रिया यशस्वी होणे तसे आव्हानात्मकच! भारतातही प्रारंभीच्या काळात लसीकरणासंबंधी अपप्रचाराचा असाच धुरळा उडवला गेला. पण, केंद्र सरकारने राज्य सरकारांना वेळोवेळी विश्वासात घेऊन, जनतेला आश्वस्त करत लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पाही ओलांडला. त्यामुळे कुठल्या देशाने सर्वात आधी लसनिर्मिती केली, यापेक्षा कुठल्या देशाने लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया लोककेंद्रित, व्यापक आणि पारदर्शक पद्धतीने राबविली, त्याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरावे.
@@AUTHORINFO_V1@@