हस्तनिर्मित बांबू आकाशकंदील लावू दारी,उजळवू आशेची ज्योत वनवासी महिलांच्या घरी!

03 Nov 2021 12:33:49

parc_1  H x W:



दि. १४ ऑक्टोबर रोजी ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘सखी सह्याद्री’ कार्यक्रमात प्रगती भोईर यांची मुलाखत पाहण्याचा योग आला. विषय होता, ‘कलेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती.’ भालिवली परिसरातील, बांबूपासून गृहोपयोगी हस्तकलेच्या वस्तू बनविणार्‍या वनवासी महिलांचे कौशल्य आणि मेहनतीचे कौतुक करताना प्रगती भोईर यांनी अनेक महिलांच्या अडचणी, अनुभव सांगितले. त्यांचे कार्य प्रत्यक्ष पाहावे, या उद्देशाने मी ‘सेवा विवेक बांबू प्रकल्पा’ला भेट दिली.त्यासंदर्भातला अनुभव इथे शब्दरूपात मांडला आहे.




विरारवरून रिक्षाने मी ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’ येथे पोहोचले. प्रकल्पाला पोहोचताक्षणी माझे स्वागत झाले, ते त्यांच्याच ‘काठीयावाडी’ ढाब्यातील थंडगार मठ्ठ्याने. गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणार्‍या ‘एनएच ४८’ महामार्गाला लागून हा ढाबा असल्याने तेथे पांथस्थांना एकाच टप्प्यात सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक औषधे व सौंदर्यप्रसाधने आणि त्याचबरोबर महिलांनी बनविलेल्या बांबूच्या २१ प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू आणि आकाशकंदिलांचे स्टॉल मांडले आहेत.तेथील व्यवस्थापक लुकेश बंड यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगितली. भालिवली परिसरातील आरोग्य सुविधांचा अभाव लक्षात घेऊन ‘विवेक व्यासपीठा’अंतर्गत २०१० साली नालासोपार्‍यापासून फिरत्या दवाखान्याची सुरुवात झाली. परंतु, तेवढे पुरेसे नव्हते. तिथे शिक्षणाचा अभाव होता. कुटुंबांना रोजगाराची गरज होती आणि म्हणूनच ‘शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार’ या उद्दिष्टाने ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’ची स्थापना झाली. वनवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अभ्यासिका लुकेश सरांनी दाखविली आणि त्याचबरोबर त्यांना घोडेस्वारी, धनुर्विद्या व नेमबाजी यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते, असे आवर्जून नमूद केले. महिलांना प्रशिक्षण देणार्‍या व संपूर्ण बांबू उद्योगाची देखरेख करणार्‍या प्रगती भोईर यांची भेट झाली. प्रगती मॅडमबरोबर बोट आणि गांजे येथील वनवासी पाड्यांवर गेले. संपूर्ण परिसरात फक्त एक किराणा मालाचे दुकान होते. काही वस्तू हवी असल्यास विरार नाहीतर जवळच्या गावातील आठवडी बाजाराची वाट पाहावी लागते. मुंबईच्या इतक्या जवळ असूनसुद्धा अशी परिस्थिती असावी, यावर माझा विश्वास बसत नव्हता. हा भालिवली परिसर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असल्यामुळे दुर्लक्षित असावा आणि हेच प्रदीप गुप्ता व सहकार्‍यांच्या लक्षात आले.




येथील महिला सुरुवातीपासून बांबूच्या टोपल्या, धान्य पाखडायला सुपं बनवत असत. त्यांचे हे कौशल्य ओळखून बांबूपासूनच शहरात मागणी आहे अशा वस्तू बनवण्याची कल्पना समितीला सुचली. त्यातून स्थानिक महिला या उपक्रमाला जोडल्या गेल्या. महिलांची कमाई ३०० रुपयांपासून सुरू झाली होती ती आता सरासरी नऊ हजार प्रतिमहा झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत या महिलांचा आत्मविश्वास दृढावला आहे. या महिलांना त्यांच्या घरी भेटून त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मला मिळाली. बांबू प्रकल्पाला जोडल्या गेलेल्या कुटुंबांची भरभराट झाली आहे, हे मी प्रत्यक्ष पाहिले. घरांमध्ये गरजेच्या वस्तू आल्या आहेत, काहींनी दुचाकी घेतल्या, टीव्ही, फ्रिज, मिक्सर घेतले. एकीने महामार्गावर उसाची गाडी टाकली. सुरुवातीला आपल्याला हे जमेल की नाही, विचार करणार्‍या आता अभिमानाने ‘आम्ही हे केले आहे,’ सांगत होत्या. गावकर्‍यांचा दृष्टिकोन बदलला आहे. नातेवाईकांमध्ये त्यांना मान मिळत आहे. एवढेच नाही, तर ‘कोविड-१९’ चा फटका सर्वांनाच बसला आहे परंतु, त्या काळातसुद्धा या महिलांची घरं त्यांच्या कष्टाच्या कमाईवर खंबीर उभी होती. या महिला बांबूच्या पात्या काढण्यापासून त्याला ‘व्हर्निश’चा शेवटचा थर देईपर्यंत सर्व स्वतः करतात. पर्यावरणपूरक अशा या हस्तकलेच्या वस्तू टिकाव्यात म्हणून बांबूला तुरटीच्या पाण्यात उकळवले जाते. यात कुठेही रासायनिक प्रक्रिया होत नाही. साधारण ४० दिवसांत १०० कंदील एक महिला आता बनवू लागली आहे. विशेष म्हणजे, यात कुठल्याही धातूच्या खिळ्यांचा वापर होत नाही. सर्व जोडणी ही बांबूचाच वापर करुन होते. या वस्तू ग्राहकांना विरार-नालासोपारा येथे दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, त्याचबरोबर नुकतेच ‘सेवा विवेक’ नावाने ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळ त्यांनी सुरू केले आहे. महिलांना मदतीबरोबरच पर्यावरणपूरक वस्तूंवर भर दिला जावा, या निखळ उद्देशाने या वस्तूंच्या प्रसारासाठी अनेक दिग्गज कलाकारांनी स्वेच्छेने सहकार्य केले आहे. प्रगती भोईर या आता महिलांच्या कुटुंबाचा एक भाग झाल्या आहेत. त्या‘हॉर्टिकल्चर’ पदवीधर असल्याने बांबूवर त्यांचा उत्तम अभ्यास आहे. बायकांना बांबू घरीच मिळावा म्हणून त्यांनी प्रत्येकीला अंगणात बांबूचे बन उभे करून दिले आहे. साधारण आसपासच्या आठ गावांतील १४५ कुटुंबे या प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. आपणही या प्रकल्पाला भेट देऊ शकता. तेथील परिसर पाहू शकता. वनवासी पाड्यांमध्ये जाऊ शकता. त्यांच्याच घरचे एक सदस्य असल्यासारखी वागणूक आपल्याला मिळेल. तसेच महिलांनी बनविलेल्या हस्तकलेच्या गृहोपयोगी वस्तू, नावीन्यपूर्ण कंदीलसेवा ‘विवेक’ या ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळावर आपल्याला पाहायला मिळतील. महिलांना रोजगार आणि त्यांच्या कलेला मान मिळावा, हीच इच्छा.





- रसिका गोगटे
( लेखिका ‘पार्क’मध्ये रिसर्च डेटा अ‍ॅनालिस्ट आहेत.)











Powered By Sangraha 9.0