ठाण्यातही कोरोनाच्या नविन व्हेरियंटचा शिरकाव ?

दक्षिण आफ्रिकेतुन आलेल्या ७ प्रवाश्यांचा छडा लावण्यासाठी पालिकेची शोध मोहिम

    29-Nov-2021
Total Views |

thane_1  H x W:
ठाणे : दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व ठाणे मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार दक्षिण आफ्रीकेतुन ठाण्यात आलेल्या ७ प्रवाश्यांचा शोध घेण्याची मोहिम ठाणे महापालिकेने राबवण्यास सुरुवात केली आहे. या सातही जणांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार असुन यात पॉजिटीव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेसींगसाठी पाठवण्यात येणार असल्याचे ठामपा आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सांगितले.
 
 
 
भारतात कोरोनाचा भार एकीकडे ओसरत असताना दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत.ओमायक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य सरकार कामाला लागले आहे.राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दक्षता घेण्यासाठी विदेशातुन येणाऱ्या प्रवाश्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान जवळपास सात जण दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आल्याची धक्कादायक माहिती ठाणे महापालिका आयुक डॉ.शर्मा यांनी सोमवारी दिली.या सात प्रवाश्यांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली असून ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहे. डोंबिवलीची घटना ताजी असतानाच ठाण्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रवासी पालिकेला कधीपर्यंत सापडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.