समर्थ भारताची युवा ओळख

29 Nov 2021 21:19:42

Priyanka Shejwal_1 &
 
 
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणेचा तीन पिढ्यांचा वारसा, त्या वारशाच्या स्वप्नांची पूर्तता करणारी डॉ. प्रियांका मिलिंद शेजवळ. तिच्या संघर्षाची आणि स्वप्नांची कहाणी...
 
 
मुंबईतली प्रियांका शेजवळ २०१९ मध्ये ‘मास्टर्स इन सायन्स’चे (पब्लिक अ‍ॅडमिनीस्ट्रेशन) शिक्षण घेण्यास अमेरिकेतल्या बोस्टन येथे गेली. अडीच वर्षांचा कोर्स. पण सहसा कुणीही त्या ठराविक कालमर्यादेत तो कोर्स पूर्ण करू शकत नाही. त्यात २०२० साली कोरोना आला. त्यामुळे तर अनेकांनी या काळात शिक्षण सोडले आणि कित्येक जण कोरोनाच्या भीतीने मायदेशी परतले. त्यावेळी अमेरिकाही बंदच, पण कोरोना ‘लॉकडाऊन’, ती भीती, ते दु:ख आणि निराशाजनक वातावरण या सगळ्यांना तोंड देत प्रियांकाने बोस्टनमधील शिक्षण पूर्ण केले आणि तिथे प्रतिष्ठित कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत. अर्थात, आपल्या देशात कितीतरी जण परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेतात आणि तिथेच चांगल्या कंपनीत उच्चपदावर कार्यरतही आहेत. पण प्रियांकाच्या परदेश शिक्षणाला तीन पिढ्यांचा वारसा आहे आणि प्रेरणा आहे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची.
 
प्रियांकाचे पणजोबा किसनराव १९३७ साली नाशिकच्या प्रेसमध्ये कामाला होते. तिथे त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला होता. त्या सत्कार कार्यक्रमात किसनराव उपस्थित होते. बाबासाहेबांचे वागणे, बोलणे त्यांना इतके भावले की, त्यांच्या मनात आले आपल्या लेकरांनीसुद्धा बाबासाहेबांसारखे शिकावे, परदेशात जावे, शिक्षण घ्यावे, देशात परत येऊन समाजात काम करावे. त्यांनी त्यांचे पुत्र शंकरराव यांना उच्चशिक्षण दिले. पण शंकरराव काही परदेशात जाऊन शिकू शकले नाहीत. शंकररावांच्या मनातही हा विचार होताच की, बाबा किसनराव यांचे स्वप्न होते, आपल्या लेकरांनी परदेशात शिक्षण घ्यावे. शंकरराव यांचे पुत्र प्रसिद्ध समाजसेवक आणि लेखक डॉ. मिलिंद शेजवळ. डॉ. मिलिंद हे उच्चशिक्षित डॉक्टर आहेत. मात्र, परदेशात जाऊन शिक्षण घेणे त्यांनाही परिस्थितीअभावी जमले नाही. आता चौथी पिढी होती प्रियांकाची. प्रियांकाही उच्च शिक्षितच! तिने बी.डीएस (डेंटल सर्जन) शिक्षण पूर्ण केलेले. ‘हेल्थ अ‍ॅण्ड हॉस्पिटल मॅनेजमेंट’मध्ये तिने एमबीए केलेले. प्रियांकाने परदेशात जाऊन ‘मास्टर्स इन सायन्स’ करण्याचे ठरवले. तिने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन पणजोबा किसनराव यांनी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्याचे ध्येय प्रियांकाने निश्चित केले. ती बोस्टनला गेली. पहिल्या सहा महिन्यांच्या खर्चासाठी तिच्या बाबांनी असलेली सगळी जमापुंजी खर्च केली. मात्र, सहा महिन्यानंतर कळले, अनाकलनीय कारणामुळे प्रियांकाची शिष्यवृत्ती अचानक नामंजूर झाली आहे. आयुष्यभर सचोटीने, प्रामाणिकपणे वागलेले पापभिरू वडील डॉ. मिलिंद यांनी प्रियांकाला सांगितले, ”बेटा हार मानायची नाही. तुझ्या पणजोबांनी पाहिलेले स्वप्न असे पूर्ण होणार असताना ते मी ढासळू देणार नाही.” मिलिंद यांनी शब्द पूर्ण केला. त्यांनी काही स्थावर मालमत्ता गहाण ठेवून पैसा उभा केला आणि प्रियांकाचे शिक्षण सुरू झाले.
 
 
अमेरिकेत राहून शिक्षण घेणे आजही सोपे नाही. नुसत्या राहत्या घराचे भाडे महिना ९० हजार. त्यामुळे प्रियांका तिकडे ‘पार्ट टाईम’ नोकरी करायची. ‘पार्ट टाईम’ म्हणजे सकाळी १० ते रात्री ९ बरं का! मधल्या वेळेत ‘ऑनलाईन’ लेक्चरना उपस्थित राहायची. २०२०मध्ये कोरोनाने जगाला हादरवले. अशातच प्रियांकाला कळले की, भारतात असलेल्या तिच्या बाबांना कोरोना झाला. बहीण श्वेताही ‘क्वारंटाईन.’ प्रियांकाची आई कोकिळादेवी यांचे २०१५ साली निधन झालेले. या सगळ्या काळात प्रियांकाची बहीण डॉ. श्वेता हिने वैद्यकीय पेशा सांभाळत, सामाजिक कार्य करत घराची धुरा अत्यंत मेहनतीने सांभाळलेली. घरी श्वेता आहे, ती बाबांची काळजी घेईल, या विश्वासावर तर प्रियांका परदेशात गेलेली. पण आता भारतात दोघांचीही स्थिती ऐकून प्रियांकाची मन:स्थिती दोलायमान झाली. शिक्षण सोडून भारतात परतावे, असे तिचे मन म्हणू लागले. ते दिवस तिच्यासाठी खूप कठीण होते. या काळात कुणाशी बोलावे? कोण मार्गदर्शन करणार? पण तिला नेहमीच मार्गदर्शन करणारे तिचे मानलेले काका रा. स्व. संघाचे सुनील देशपांडे मदतीला आले. ते प्रियांकाचेच नव्हे, तर डॉ. मिलिंद आणि श्वेता यांचेही चांगले सहृदय स्नेही मार्गदर्शक. ते म्हणाले, ”भावनेच्या भरात निर्णय घेऊ नकोस. हेसुद्धा दिवस जातील. बाबांची काळजी करू नकोस. आम्ही आहोत. तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे.” परदेशात काळजीने आणि चिंतेने अर्ध्या झालेल्या प्रियांकाला देशपांडेकाकांच्या बोलण्याने केवढा धीर आला! इथे पुढे भारतात सगळे आलबेल झाले आणि प्रियांकाचे शिक्षणही सुरूच राहिले.
 
 
प्रियांका तशी नशीबवान. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्यही प्रियांका आणि संपूर्ण शेजवळ कुटुंबाला लाभलेले. प्रत्येक कृती समाज आणि देशाच्या हिताची करा, हा मंत्र प्रियांकाने त्यांच्याकडूनच घेतलेला. प्रियांका म्हणते, ”कोरोना काळता परदेशातील स्थिती मी पाहिली. आपल्या देशात पंतप्रधान मोदींनी ज्या प्रचंड ताकदीने आणि आत्मीयतेने परिस्थिती हाताळली त्याला तोड नाही. इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोरोनाला परतावणे, हे आपले मोठे यश आहे. मी या देशाची मुलगी आहे याचा मला अभिमान आहे. भारतात परतल्यावर देशाच्या आरोग्यव्यवस्थेसंदर्भात मला काम करायचे आहे. आरोग्यव्यवस्था पूर्णत: सरकारी नियंत्रणात आली, तर खर्‍या अर्थाने भारत आरोग्यक्षेत्रात खूप काही साध्य करू शकेल.” काही कालावधीनंतर प्रियांका मायदेशी परत येणार आहे. सोबत असणार आहे तिचा ठाम निश्चय. तो निश्चय म्हणजे डॉ. बाबासाहेबांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य; समर्थ भारताच्या विकासामध्ये योगदान असेल. प्रियांकासारख्या समाजशील देशनिष्ठ युवक हीच देशाची आणि समाजाची संपत्ती आहे. समर्थ भारताची युवा ओळख आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0