पुढील महिन्यात नाशिक शहरामध्ये ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरात आयोजित होत असलेले यंदाचे तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असून याआधी नाशिकमध्ये दोन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया नाशिक शहरातील साहित्यिक व साहित्यिकांचा वारसा...
दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी नाशिक शहरात मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. ही सर्व नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच वर्षांनी नाशिकनगरीची साहित्य संमेलन भरवण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी १९४२ व २००५ या वर्षी नाशिक शहरात मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते आणि या वर्षी पुन्हा हा मान नाशिक शहराला मिळत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक शहराला लाभलेला समृद्ध साहित्यिक वारसा आणि नाशिककर साहित्यिकांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान या दोन्ही गोष्टींचा आढावा घेणे, समर्पक ठरेल.
नाशिक शहराला प्राचीन काळापासून साहित्याची परंपरा लाभलेली आहे. ‘कथा कल्पतरू ही साहित्य कृती कृष्णयाज्ञवल्क्य’ यांनी निर्माण केलेली आपल्याला आढळून येते. याच प्राचीन परंपरेचे प्रतिनिधी म्हणून मध्वमूनी आणि रंगनाथ यांची नावे आपल्याला घेता येतील. त्यानंतरच्या काळात म्हणजे १८५३ ते १८८८ या कालावधीमध्ये नाशिकच्या गणेशशास्त्री लेले यानी रघुवंशाचे भाषांतर करून आणि ‘कृष्णकुमारी’ ही काव्यरचना करुन साहित्य क्षेत्राला मोलाचे योगदान दिलेले आपल्या दिसून येते.
स्वातंत्र्यवीर सावरकर व शाहीर कवी गोविंद
नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्म झालेले भारताचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या असिम त्यागाबरोबच त्यांनी निर्माण केलेल्या थोर साहित्यकृती नाशिकच्या साहित्यविश्वाला त्यांनी दिलेले अमोघ असे वरदानच मानले पाहिजे. त्यांनी लिहिलेले ‘माझी जन्मठेप’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक मराठी साहित्यात एक मानाचे पान ठरले आहे व या पुस्तकाचे पुढे अनेक भाषांमध्ये रुपांतरदेखील झाले आहे. ‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या जन्मठेपेच्या काळात जे विदारक अनुभव सोसले त्याचे वर्णन अत्यंत विलक्षण आहे.
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला
यासारख्या ऐतिहासिक कवितांची निर्मिती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली आपल्याला दिसून येते. ते अंदमानात कारागृहात असताना त्यांना कोणत्याही प्रकारचे कागद अथवा पेन यासारख्या वस्तू इंग्रजांनी उपलब्ध करुन दिलेल्या नव्हत्या.
मात्र, तरीदेखील डगमगून न जाता कारागृहाच्या भिंतीवर त्यांना मिळालेल्या कोळशाच्या तुकड्याने त्यांनी आपल्या कविता लिहून काढल्या व पुढे त्या पाठदेखील केल्या. अशा प्रकारचे काव्यलेखन केलेले कवी इतिहासात क्वचितच सापडतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला ‘कमला’ हा काव्यसंग्रह त्यांच्यातील कवित्वाची महत्त्वपूर्ण साक्ष देतो. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने नाशिकच्या शाहीर कवी गोविंद यांनी नाशिकच्या साहित्यकृतींमध्ये मोलाची भर घातलेली आपल्याला दिसून येते.
नंतरच्या काळामध्ये रेव्हरंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांनी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली. नाशिकच्या शाहीर परशुराम तसेच शाहीर प्रभाकर यांनी आपल्या शाहिरी काव्यप्रतिभेतून वेळोवेळी बहुमोल अशी साहित्यकृती निर्माण केली. प्रसिद्ध अशा ‘तरखडकर’ भाषांतर पाठमालेचे लेखक तरखडकर हेदेखील नाशिकचेच साहित्यिक आहेत. नंतरच्या काळातील वि. वा. हडप, ल. ला. पांगारकर, सोपानदेव चौधरी तसेच माधव मनोहर या साहित्यिकांनीदेखील आपापल्या परीने नाशिकच्या साहित्यक्षेत्रात मोलाची कामगिरी केली.
नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ
नाशिक शहराच्या आजपर्यंतच्या साहित्यिक इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी नोंदवता येईल, असा काळ म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर व सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या साहित्यकृतींचा काळ म्हटला पाहिजे. १९४० ते १९९० हे अर्धशतक या दोन्ही साहित्यिकांनी आपल्या अजरअमर साहित्यकृतींनी सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवले आहे.
कुसुमाग्रजांच्या साहित्यकृती
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रातील नाशिककरांचे दैवत ठरले आहे, ज्यांचा प्रत्येक नाशिककर अभिमानाने उल्लेख करतो, अशा कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ अशा काव्यपंक्तींनी स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. ‘विशाखा’ हा त्यांचा काव्यसंग्रह जागतिक दर्जाची काव्यरचना ठरला आणि तो अनेक भाषांत प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहासाठीच पुढे कुसुमाग्रजांना ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च सन्मान मिळाला. कुसुमाग्रजांनी लिहिलेले ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी साहित्य क्षेत्रातील मानांकनाचे बिंदू शिखर ठरले.
प्रा. वसंत कानेटकरांची साहित्यनिर्मिती
कुसुमाग्रजांप्रमाणेच नाशिकचे भूषण ठरलेले प्रा. वसंत कानेटकर यांनी आपल्या ऐतिहासिक नाटकांनी संपूर्ण महाराष्ट्राला भारुन टाकलेले होते. त्यांनी लिहिलेले, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘ इथे ओशाळला मृत्यू’, ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकांनी नाट्यक्षेत्रात अनेक मान-सन्मान मिळविले. कुसुमाग्रज व वसंत कानेटर यांच्याशिवाय अन्य साहित्यिक डॉ. अ. वा. वर्टी, प्रा. डॉ. म. बा. कुलकर्णी, प्रा. योगेश्वर अभ्यंकर, बाबुराव बागुल, वामनराव पुरोहित या साहित्यिकांनीदेखील नाशिकच्या साहित्य इतिहासामध्ये मोलाची भर घातली आहे. प्रा. डॉ. म. बा. कुलकर्णी यांनी मराठी प्रमाणेच संस्कृत साहित्यामध्येदेखील आपला ठसा उमटवला आहे. त्यांची ‘सोन्याचा पाऊस’, ‘भासांची जळालेली नाटके’, ‘पुनर्जन्म’, ‘नव्याने रामकथा गाऊ’ इत्यादी पुस्तके मराठी साहित्यात खूप लोकप्रिय ठरली आहेत. याशिवाय कवी किशोर पाठक, कवी आनंद जोर्वेकर, अरुणा कुलकर्णी, वृंदा भार्गवे, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनीही आपापल्या परीने साहित्यक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावलेली आपल्याला दिसून येते. नाशिक शहराला साहित्यिकांचा वारसा लाभल्यामुळे नाशिक नगरीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिककर या साहित्य संमेलनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
- प्रा. डॉ. राम कुलकर्णी
(लेखक नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव आहेत.)