बीजिंग हिवाळी ‘ऑलिम्पिक’वर बहिष्काराचे सावट?

28 Nov 2021 21:53:50

Beijing _1  H x
 
बीजिंग ‘ऑलिम्पिक्स’च्या स्पर्धेतील सहभागाबाबत अमेरिकेतील जो बायडन सरकारने जी पुचाट भूमिका घेतलेली आहे, त्यानुसार अमेरिकन खेळाडू स्पर्धेत भाग घेतील, पण बायडन सरकारमधील कोणीही राजकीय व्यक्ती अथवा अधिकारी या स्पर्धेला जाणार नाहीत. या भूमिकेला जे गोंडस नाव अमेरिकन सरकारने दिले आहे आणि त्याला ‘डिप्लोमॅटिक बहिष्कार’ असल्याचे संबोधन केले आहे. ते सूचक आहे. ‘जीत भी मेरी आणि पट भी मेरी’ अशी ही भूमिका आहे.
बीजिंग २०२२ या हिवाळी ‘ऑलिम्पिक’च्या स्पर्धेची तारीख जसजशी जवळ येत आहे त्यानुसार त्याच्या विरोधातील अनेक देश, त्यामधील खेळाडू, मानवाधिकार संघटना यांच्या स्पर्धाविरोधाच्या आवाजाला धार चढत असल्याचे दिसून येत आहे. या बहिष्काराच्या अनुषंगाने अनेक मुद्दे, घटना पुढे आणल्या जात आहेत. त्यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे...
 
चीनमधील आंतरराष्ट्रीय टेनिस महिला खेळाडूकडून (पेंग शुई) लैंगिक छळाचा ‘टीम लीडर’वर (जोंग काव ली) आरोप
 
पेंग शुई या प्रसिद्ध टेनिस महिला खेळाडूने तिच्या चीनमधील ‘विबो’ या ट्विटरसदृश समाज माध्यमातील अकाऊंटवर यासंदर्भात आरोप केले होते. चीनमध्ये समाजमाध्यमांवर चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून किती बारकाईने लक्ष ठेवले जाते, याची अनेक उदाहरणे समोर येतातच. त्याप्रमाणे पेंग शुईने आरोप केलेला मजकूर सरकारकडून ‘विबो’मार्फत काढून टाकण्यात आला. पण चीनमधील समाजमाध्यमी याबाबतीत हुशार झाल्याने अशा वादग्रस्त ‘पोस्ट’ समाजमाध्यमांवर झळकू लागल्या लागल्या लगेच त्याचे ’स्क्रीन शॉट्स’ काढून ठेवतात. त्यामुळे ही बाब जगासमोर आली. ज्या व्यक्तीवर आरोप झाला ती व्यक्ती चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या ‘पॉलिट ब्युरो’तील एक वरिष्ठ सभासद असल्याने त्यानंतरच्या काळात पेंग शुई अचानक सार्वजनिक जीवनातून दिसेनाशी झाली. ती कुठे गेली याचा पत्ता लागत नव्हता. यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना, अनेक देशातील वरिष्ठ टेनिस खेळाडू ज्यामध्ये मार्टिना नवरातिलोव्हा, ख्रिस एव्हर्ट, जोकोविच यांनी जाहीरपणे पेंग शुईबद्दल चिंता व्यक्त केली.
चीनमधील कम्युनिस्ट सरकारची चलाखी एवढी की, पेंग शुई हिचे काही जुने फोटो कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणातील ‘सीजीटीएन’ या वृत्तसंस्थेतर्फे प्रसिद्ध करून ती सुखरूप असल्याचे समाजमाध्यमांवर जाहीर केले. संयुक्त राष्ट्रांच्या मानव अधिकार समितीने पेंग शुई या खेळाडूच्या ठावठिकाणांची माहिती मागवली असल्याचे जाहीर केले. युरोपियन संघटनेतर्फेही या खेळाडूच्या सुरक्षेबद्दल आणि ठावठिकाणांबद्दल विचारणा करण्यात आली.
 
चीनमध्ये जोरात चालू असलेला अवयव प्रत्यारोपणाचा धंदा
 
गेली अनेक वर्षे चीनमध्ये तेथील उघूर मुस्लिमांना सुरक्षित कॅम्पमध्ये डांबून ठेवले जात असल्याचा अमेरिका आणि युरोपकडून चीनवर वारंवार आरोप होत आहेत. या उघूर व्यक्तींचे अवयव काढून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली जात असल्याचा आरोप चीनवर केला जात आहे. या अवयव प्रत्यारोपण व्यवसायात चीनकडून एवढी व्यावसायिकता आणली जात आहे की, किडनी, लिव्हर अशा अवयवांच्या उपलब्धतेचे आणि किमतीचे दरपत्रकच काही अमेरिकन पत्रकारांनी डमी गरजूंच्या मार्फत चौकशी करून जाहीर केलेले आहे. अमेरिका आणि युरोपातील गरजूंना ‘सूट’ होईल, अशा पद्धतीने उघूर व्यक्ती शोधली जाते आणि मग पुढील प्रक्रिया सुरू केली जाते, असे सांगतात. अमेरिका आणि युरोपमधून अशा अवयवांच्या गरजूंचा चीनमध्ये लोंढा वाढतच चालला असल्याचे सांगितले जाते. हे सर्व भयानक आहे. चीनमध्ये ’फालुन गँग’ नावाचा तेथील साधकांचा समूह आहे. हे साधकही चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या निशाण्यावर आहेत. या ‘फालुन गँग’च्या व्यक्तींच्या अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त मागणी आहे आणि त्याची किंमतही जास्त असल्याचे सांगितले जाते. याबद्दल अमेरिकेच्या ’व्हाईट हाऊस’च्या वार्तालापात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता.
 
अमेरिका आणि युरोपीय महासंघाची भूमिका
 
बीजिंग ‘ऑलिम्पिक्स’च्या स्पर्धेतील सहभागाबाबत अमेरिकेतील जो बायडन सरकारने जी पुचाट भूमिका घेतलेली आहे, त्यानुसार अमेरिकन खेळाडू स्पर्धेत भाग घेतील, पण बायडन सरकारमधील कोणीही राजकीय व्यक्ती अथवा अधिकारी या स्पर्धेला जाणार नाहीत. या भूमिकेला जे गोंडस नाव अमेरिकन सरकारने दिले आहे आणि त्याला ‘डिप्लोमॅटिक बहिष्कार’ असल्याचे संबोधन केले आहे. ते सूचक आहे. ‘जीत भी मेरी आणि पट भी मेरी’ अशी ही भूमिका आहे. वर बायडन यांची मखलाशी अशी की, चीनने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मान्य केले आहे, हे सारखे उद्धृत करणे. त्यामुळे चीनच्या बाकीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करावे, असे तर बायडन सुचवत नाहीत ना, अशी शंका येते. युरोपियन महासंघाची ही चीनच्या नेतृत्वाला न दुखविता ‘मिळमिळीत’ भूमिका घेण्याकडेच कल दिसतो आहे.
अमेरिकेतील ’कँटर’ या (बोस्टन) मधील प्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडूने जाहीरपणे चीनच्या शी जिनपिंग यांच्यावर टीका आणि आरोप केले आहेत. त्याच्या याबद्दलच्या चीनविरोधी भूमिका आणि त्या संदर्भातील ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. त्याने तिबेट, तैवान, हाँगकाँगमध्ये चीनकडून जी काही दडपशाही चाललेली आहे आणि उघूर मुस्लिमांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत चीनवर जोरदार टीका केली आहे. या खेळाडूने तो वापरत असलेल्या ’शूज’वर मोठ्या अक्षरात ‘फ्री तिबेट’, ‘नो बीजिंग ऑलिम्पिक्स २०२२’ असा लक्षवेधी मजकूर लिहिलेला आहे. बास्केट बॉल हा चीनमध्येही लोकप्रिय खेळ असल्याचे सांगितले जाते. यामुळे चीनमधील कम्युनिस्ट सरकारकडून ‘कँटर’ या खेळाडूंबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशा वातावरणात चीनकडून ’तैवान’च्या विलिनीकरणाबाबत जी वक्तव्ये केली जात आहेत, ती चीनच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकेत अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी चीनचा धसका कशा पद्धतीने घेतला आहे, ते बघावयाचे असेल तर ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ या प्रसिद्ध रेसलिंग स्पर्धेतील ‘जानसेना’ या प्रसिद्ध खेळाडूची समाजमाध्यमांवरील ध्वनिचित्रफीत जरूर पाहावी. त्याने काही महिन्यांपूर्वी चीनवर तिबेट या विषयावर चीनवर नुसती टीका केली नव्हती, तर चीनची खिल्लीही उडविण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्याला काय उपरती झाली माहिती नाही, पण त्याने जाहीरपणे चीनची माफी मागितली होती. ज्या पद्धतीने त्याने ही माफी मागितली ती ज्याला उत्सुकता असेल त्यांनी ‘युट्यूब’वर जाऊन हा माफी व्हिडिओ जरूर पाहावा. अमेरिकेतील करमणूक क्षेत्र, चित्रपट क्षेत्र आणि इतर अनेक क्षेत्रांत चीनची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे चीनने जर ठरविले तर ‘जानसेना’ला कायमचे ‘बेरोजगार’ केले जाईल, या भीतीतून त्याने ही माफी मागितली असावी. गेल्या दोन दशकात चीनकडून हॉलिवूडमध्ये कशा प्रकारे प्रचंड गुंतवणूक करण्यात आली आणि कशा प्रकारे चित्रपटाच्या कथेमध्ये ढवळाढवळ केली जाते, याचा ऊहापोह मी माझ्या पूर्वीच्या लेखात केला होता. बीजिंग ‘ऑलिम्पिक्स २०२२’ पार पडेपर्यंत काय घटना घडतात, याकडे आणि चीनमध्ये सध्या उसळलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या वाटेकडे जगाचे बारीक लक्ष आहे.
 
- सनत्कुमार कोल्हटकर
 
Powered By Sangraha 9.0