कष्टकरी प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2021   
Total Views |

vivek sagar _1  


क्रीडा क्षेत्रातील सन्मानार्थ अर्जुन पुरस्कार नुकताच पटकावणार्‍या हॉकीपटू विवेक सागर प्रसाद याच्या कामगिरीचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...


कोरोनाचे संकट पार करून जागतिक क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो येथे नुकतीच पार पडली. अनेक कारणांनी ही स्पर्धा भारतीयांसाठी खास ठरली. गेल्या ४० वर्षांमधील भारतीय खेळाडूंची ही सर्वोत्त्म कामगिरी ठरली. गेल्या चार दशकांत ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारत ५० देशांमध्ये अव्वल आला. यावेळी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदक पटकावले. भारताने हॉकीमध्ये तब्बल ४१ वर्षांनी पदक मिळवले. याआधी भारतीय हॉकी संघाने १९८० मध्ये मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. मात्र, त्यानंतर तब्बल ४० वर्षं भारतीय हॉकी संघाची झोळी पदकांच्या मानाने रिकामीच राहिली. अखेर २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीचा पराभव करत कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय हॉकी संघाने सांघिक कामगिरी करत ऐतिहासिक कामगिरी केली. यामध्ये एक नाव चांगलेच गाजले, ते विवेक सागर प्रसाद याचे. एक ‘मिड फिल्डर’ म्हणून खेळताना भारताच्या विजयात त्याचे मोलाचे योगदान आहे. तेव्हा, जाणून घेऊया त्याच्या संघर्षाबद्दल...



विवेक सागर प्रसाद याचा जन्म दि. २५ फेब्रुवारी, २००० रोजी मध्य प्रदेशच्या चांदौन या छोट्या खेड्यात झाला. गरीब घरातून आलेल्या विवेकची स्वप्न मात्र, लहानपणापासूनच मोठी होती. बालपणीच त्याला या खेळाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्याचे कुटुंब हे अनेक टीनपासून बनलेल्या घरात राहत होते. पावसाळ्यात नेहमी त्याच्या घरी पाण्याची गळती होत असे. त्याचे वडील सरकारी शाळेत शिक्षक असले तरी त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हा दरदिवशी आ वासून उभा ठाकायचा. हॉकीचे वेड हे लहानपणापासूनच असल्यामुळे तो नेहमी सरावासाठी उत्सुक असे. परंतु, घरातील बिकट परिस्थिती पाहता, बूट आणि हॉकीस्टिक मित्रांकडून मागून तो सराव करत होता. पण, त्याच्या वडिलांना विवेकचे हॉकी खेळणे मात्र पसंत नव्हते. कारण, आपल्या मुलाने इंजिनिअर व्हावे असे विवेकच्या वडिलांचे स्वप्न होते. मात्र, विवेकला हॉकीमध्येच आपली कारकीर्द घडवायची होती. त्यासाठी प्रसंगी त्याने वडिलांचा मारदेखील खाल्ला. परंतु, त्याच्या आईने आणि मित्रांनी नेहमीच विवेकची साथ दिली. एवढेच नव्हे, तर विवेकचा मार वाचवण्यासाठी कधीकधी आईला त्याच्या वडिलांना खोटेही सांगावे लागले. पण, विवेकने स्थानिक हॉकीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि त्याचा खेळ पाहिल्यानंतर वडिलांनीदेखील त्याचे समर्थन करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतरही त्याचा संघर्ष सुरूच राहिला.


अकोल्यातील एका स्पर्धेदरम्यान प्रसिद्ध हॉकीपटू अशोक ध्यानचंद यांची विवेकवर नजर पडली. ध्यानचंद यांनी त्याची संपूर्ण माहिती काढली आणि त्याला बोलावून घेतले. अवघ्या १३ वर्षांचा विवेक अत्यंत चपळ होता. त्याच्या पायांमध्ये उत्तम समन्वय असून त्याच्या शैलीतही एक बेधडकपणा होता. अशोक ध्यानचंद यांनी त्याच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. विवेकची ध्यानचंद यांच्याच घरी भोपाळला राहण्याची सोय केली आणि काही महिने त्याच्याकडून खेळातील बारकाव्यांचा अभ्यास करून घेतला. नीडर असलेल्या विवेकला एका सामन्यात मोठ्या दुखापातीलाही सामोरे जावे लागले. एका सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूला जबर टक्कर बसली. यामध्ये त्याच्या हाताच्या हाडाला चांगलाच मार लागला होता. एवढेच नव्हे तर त्याच्या फुफ्फुसात पोहोचलेल्या खराब रक्तामुळे त्याचा जीवही गेला असता. मात्र, सुदैवाने तो या अपघातातून बचावला आणि स्वतःलात्याने लवकरच सावरले. यानंतर विवेकने एका हातानेच सराव करण्यास सुरुवात केली. त्याची हीच इच्छाशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा त्याच्या खेळामध्येही दिसून येत होती.


पुढे त्याने स्थानिक आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खासकरून मध्य प्रदेशकडून खेळताना ‘मिड फिल्डर’ म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. यानंतर २०१८ मध्ये त्याला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने २०१८ च्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मधील अंतिम सामन्यात ४२ व्या मिनिटाला भारतासाठी बरोबरीचा गोल केला. यानंतर भारताने पेनल्टीमध्ये सामना जरी गमावला आसला तरीही तो एक गोल विवेकचा आत्मविश्वास वृद्घिंगत करण्यासाठी पुरेसा होता. तसेच तो भारतासाठी पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. २०१९ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ’ (एफआयएच) आयोजित स्पर्धेत विवेकला स्पर्धेतील ‘सर्वोत्तम युवा खेळाडू’ म्हणून पुरस्कार देण्यात आला. यानंतर ऑलिम्पिकसाठी त्याची निवड करण्यात आली आणि त्याने इतिहास रचला. संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत, त्याने भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावली. यानंतर मध्य प्रदेश सरकारने त्याची पोलीस उपायुक्त म्हणून निवड केली. एवढच नव्हे, तर त्याच्यावर करोडो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. मात्र, जी परिस्थिती स्वतःवर किंवा त्याच्या कुटुंबावर ओढावली ती इतरांवर येऊ नये, म्हणून तो त्याच्या गावामध्ये जमेल ती सेवा करतो. जेव्हा गावी जाईल, तेव्हा इच्छुकांना तो हॉकीस्टिक किंवा इतर सामग्रीचेदेखील वाटप करतो. यापुढेही त्याची कामगिरी अशीच उत्तमोत्तम होत राहो, यासाठी त्याला ’दै. मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा....


@@AUTHORINFO_V1@@