एक अंतर्मुख चित्रकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2021
Total Views |
paint _1  H x W




मनोज सकळे हे सांगली जिल्ह्यातील नांद्रे या गावातील चित्रकार. “कलाध्यापक होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं,” अशी खंत व्यक्त करूनच आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. सांगलीच्या ‘कलाविश्व’चे ज्येष्ठ कलाध्यापक प्रा. बाळासाहेब पाटील आणि त्यांचे सहाध्यायी यांनी सुरू केलेल्या ‘कलामंथन’ नावाच्या कार्यक्रमात चित्रकार मनोज सकळे यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले.


तशी कलाविषयक अनेक प्रात्यक्षिके देणारी कलाकार मंडळी आहेत. ‘प्रात्यक्षिके’ म्हणजे समोर एखादे व्यक्तिमत्त्व बसवून त्याचे हुबेहूब व्यक्तिचित्रण करणे किंवा निसर्गाच्या वातावरणात जाऊन समोर दिसणारा निसर्ग, आपल्या ‘कॅनव्हॅस’वर किंवा ‘ड्रॉईंग पेपर’वर चितारणे. सर्वसाधारण हे दोन प्रकार प्रात्यक्षिकांमध्ये पाडले गेलेले आहेत. तथापि आणखीही एक प्रकार यात असतो. कलाकाराच्या अंतर्मनात, प्रतिभेत किंवा कल्पनेत असलेलं तो समोरच्या ‘कॅनव्हास’वर उतरवतो. यात त्या कलाकाराच्या समोर काहीही नसतं. त्याच्या मनात ‘जे’ असतं ‘ते’ तो दृश्यस्वरूपात आणतो.



सर्वसामान्य कलारसिकांना अगोदरच्या दोन प्रकारच्या प्रात्यक्षिकांबद्दल अधिक रूची असते. कारण, त्यांना समोरच आणि ‘कॅनव्हास’वरच एकत्रित पाहताना एक वेगळा आनंद मिळतो. हा आनंद देणारे फार निवडक कलाकार प्रात्यक्षिके देताना सुचविता येतील की, ज्यांच्या प्रात्यक्षिकांमध्ये नैसर्गिक, अकृत्रिम आणि प्रामाणिक साधनेतून प्राप्त झालेली मेहनत पाहायला मिळते. चित्रकार मनोजकुमार महावीर सकळे यांच्या बाबतीत प्रात्यक्षिक पाहताना असेच निरीक्षणात आले. त्यांच्या ब्रशच्या फटकार्‍यांमध्ये कुणाचं अनुकरण नव्हतं. त्यांच्या रंगलेपनातदेखील नक्कल नव्हती.मात्र, त्यांच्या रंगपॅलेटवर पाश्चात्य कलाकारांच्या रंगयोजनांचा प्रभाव जरी वाटत नसला, तरी त्यांचं व्यक्तिचित्रण पाहताना काही पाश्चात्य कलाकारांच्या व्यक्तिचित्रणाची आठवण येते. यावर मी त्यांना विचारलेही. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ते मला फार महत्त्वाचं वाटतं. ते म्हणाले, “मला विविध आणि वैविध्यपूर्ण शैली व तंत्रांनी युक्त काम करायला फार आवडतं. सतत प्रयोग करत राहिलं की, काम करतानाही आनंद मिळतो.” म्हणजे आत्मानंदासाठी काम करणार्‍या मोजक्या कलाकारांमध्ये मनोज सकळे यांचं नाव घ्यावं लागेल.



चित्रकार मनोज सकळे यांचं कलाशिक्षण हे सांगलीच्या ‘कलाविश्व’ मध्ये झाले, तर पुढील कलाशिक्षण पुण्याच्या ‘अभिनव कला’मध्ये झाले. रंगलेपनातील वेगळेपण, चित्र विषयातील अचूकता व्यक्तिचित्रणातील भाव आणि आशयगर्भता या चतुर्गणावर सकळे यांच्या कलाकृती सजलेल्या दिसतात. त्यांनी त्यांच्या विविध शृंखला चितारलेल्या. त्यांचं बरंचसं काम हे त्यांनी लहान मुलांच्या दैनंदिनीवर केलेले आहे. मग लहान मुलांची निरीक्षणे त्यांच्या भाव-भावना,त्यांच्या हालचाली, त्यांची पार्श्वभूमी अशा विविधांगांनी प्रथम त्यांचं निरीक्षण करून नंतर अत्यंत बोलक्या हावभावांमध्ये आशयगर्भता आणून त्यांनी त्यांच्या ‘कॅनव्हास’ला बोलतं केलेलं आहे. "व्हावे लहानांहूनही लहान’ या उक्तीप्रमाणे मग त्यांचा कुंचलादेखील निरागस बनतो. मुलांच्या विषयावरील त्यांच्या कलाकृती या रसिकमनाचा ठाव घेणार्‍या स्मृतिप्रवण ठरलेल्या आहेत. बालवयातील म्हणजे खेळण्याच्या वयातील मुलांवर अचानक पौगंडावस्था येते. मोठ्यांची कामे मुलांना करावी लागतात. ही निरीक्षणे चित्रकार मनोज सकळे यांच्या नजरेतून सुटली नाहीत. त्यांनी अशा निरीक्षणांना चित्रबद्ध करून एकाप्रकारे अशा घटनांना वाचाच फोडलेली आहे. याशिवायही खेळण्यात कार्यमग्न असलेली, काहीतरी कृती करीत असलेली, अशी विविध स्तरांवरील वयोगटातील मुले आणि त्यांच्या निरीक्षणांवर आधारित कलाकृती या विविध संग्रहकांच्या संग्रहाचा महत्त्वाचा भाग ठरल्या आहेत.



मनोज सकळे यांच्या कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर ध्यानात येते की, साधारण १९९७ च्या दरम्यान त्यांनी कलाशिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या काळात ‘अ‍ॅकॅडमिक स्टाईल’ अर्थात शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला ज्या शैलीत वा तंत्रात काम असते, त्या शैलीत काम केले. त्याचबरोबर ‘लॅण्डस्केप-क्रिएटेड लॅण्डस्केप’, ‘स्टील लाईफ’ अर्थात स्थिर चित्रण आणि व्यक्तिचित्रणे या कलाशैली प्रकारात काम केले. असे काम करता करता स्वतःचा सूर गवसणे, स्वतःची शैली विकसित होणे,स्वत:चे तंत्र विकसित होणे आणि एकवेळ अशी येते की, त्या तंत्राने वा शैलीने त्यांच्या कलाकारांना जी ओळख मिळते, ती त्या कलाकारांच्याकलाप्रवासातील फार महत्त्वाची घटना वा ‘बदल’ ठरते. चित्रकार मनोज सकळे यांच्या कलाप्रवासात हा टप्पा त्यांनी फार लवकर गाठला आणि स्वत:ची ओळखही निर्माण केली. परंतु, ते केवळ या ‘ओळखी’वर थांबले नाहीत, तर त्यांनी या टप्प्याच्या पुढेही आणखी काहीतरी विश्व असते, हे शोधत राहिले. भगवान ओशोंनी सांगितले आहे की, “कलाकार हा प्रयोगशील तर असावाच, पण तो सतत अनाहताच्या, अदृश्याच्या शोधात असायला हवा.” मनोज सकळे यांच्याबाबतीत हे विधान फार लागू पडते. याचं कारण, त्यांची चित्रविषयांची भूक कधी संपत नाही. ते सतत नावीन्यशोधतच असतात. ‘नवे ते मज नित्य हवे’ या मानवी स्वभावाला त्यांनी त्यांच्या सवयीत परावर्तित केलेले आहे, असेच वाटते.



वास्तविक ‘व्यक्तिचित्रण’ हा त्यांचा आवडता विषय. या विषयाला त्यांनी त्यांच्या कलाकृतीद्वारे इतके बहुविध बनविले आहे की, त्यांची अशाप्रकारातील प्रत्येक कलाकृती म्हणजे एखादी कादंबरी वा एखादी साहित्यकृती बनेल, अशा तोलमोलाची ठरते. त्यांच्या या शोधक वृत्तीमुळेच त्यांना त्यांच्या विद्यार्थी दशेपासून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विविध कलासंस्था, कला सोसायट्यांनी त्यांच्या कलाकृतींना भरभरून दाद देऊन सन्मानित केलेले आहे. त्यांची ग्रामीण दृश्यातील जलरंग व तैलरंगांतील पेंटिंग्ज, त्यांच्या विषय सादरीकरण आणि मांडणीमुळे ‘युनिक’ झाली. उपलब्ध जागा, त्या जागेची यथोचित मांडणी, सादरीकरणातील वेगळेपण आणि आकर्षक आशयबद्ध रचना यावर भर देऊन पुढे-पुढे त्यांच्या कलाकृती अधिक प्रगल्भ बनत गेल्या. विविध प्रयोगांद्वारे हे सारे साध्य करताना कलाकाराला मिळणारा आनंद व शब्दातीत असतो.


२००५ च्या जहांगीर कलादालनातील मनोज सकळेंच्या ‘सोलो शो’ने त्यांच्या कलासाधनेवर शिक्कामोर्तब केले. त्यांनी फोटोग्राफ्स, दैनिकांचे ‘लोगोेज्’ वा आकर्षक भाग आदींचा उपयोग करुन काही ‘कोलाज’सुद्धा केलेत, ज्यांचा त्यांना ‘सिम्बॉल’ वा प्रतीक म्हणून उपयोग करून घेता आला. त्यांच्या या प्रयोगामुळे त्यांना ‘कॅम्लिन’ कंपनीने ‘युरोटूर’ला ‘प्रतिष्ठित कलाकार’ म्हणून आमंत्रित केले. त्यामुळे त्यांना पाश्चात्य युरोपियन कलाकारांच्या पेंटिंग्जसह विविध तंत्र व शैली जवळून पाहता आल्या. त्यांच्या कलाप्रवासात त्यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या (मुंबई आर्ट सोसायटी) ‘बेंद्रे हुसेन स्कॉलरशिप’चा मान मिळाला.



अनेक कला महाविद्यालयांमध्ये त्यांची कलाप्रात्याक्षिके झालेलीआहेत. आजही होतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही बर्‍याच ठिकाणी त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने झालेली आहेत. प्रचंड काम करणारा हा कलावंत विचारानेही प्रगल्भ आहे, असे त्यांच्याशी बोलताना अनुभवायला मिळेल. त्यांना मात्र मनापासूनशिकवायची म्हणजे कलाशिक्षक व्हायची इच्छा होती. ती मात्र पूर्ण झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खरंतर प्रत्यक्ष काम करणार्‍या कलाध्यापकांची कलाध्यापनात गरज असते. मनोज सकळे यांच्यासारख्या कलाशिक्षकाला कलाशिक्षण मुकले, असं न म्हणता त्यांच्या कलाप्रात्यक्षिकांमुळे अनेक कलाविद्यार्थ्यांना कलाशिक्षणातील पारदर्शी बारकावे पाहायला-अनुभवायला मिळतात, हीच खरंतर मोठी आणि सन्मानपूर्वक बाब आहे.

मनोज सकळे यांच्या कलाप्रवासाला आणि नवनवीन कलाप्रयोगांना दिवसेंदिवस बहर येतच राहणार, यात संदेह नाही. त्यांच्या कलासाधनेस मन:पूर्वक शुभेच्छा...!
प्रा. डॉ. गजानन शेपाळ
 
 
@@AUTHORINFO_V1@@