‘बाबासाहेब’ चितारताना...

26 Nov 2021 22:17:18

 

babasaheb purandare _1&nb


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जीवंत चित्र साकारणार्‍या चित्रकार गणेश कळसकर यांचे अनुभवचित्रण...


थोरांपासून ते लहानांपर्यंत छत्रपती शिवरायांना घराघरापर्यंत पोहोचवणारे व गेली अनेक वर्षं छत्रपतींचा इतिहास सोप्या भाषेमध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पोहोचवण्याचे श्रेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाच जाते. बाबासाहेबांच्या याच कार्यामुळे बाबासाहेबांना शिवभक्तांनी ‘शिवशाहीर’ ही पदवी दिली. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून बाबासाहेबांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. वयाच्या शंभराव्या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोटतिडकीने मांडणार्‍या, ‘शिवचरित्र’ उत्साहाने सांगणार्‍या अशा शिवशाहिरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या तोंडून ‘शिवचरित्र’ ऐकणं हा एक अविस्मरणीय क्षण होता.



यापूर्वीही एकदा बाबासाहेबांना प्रत्यक्ष भेटलो होतो. दरवेळी तितक्याच आदराची वागणूक आणि आपुलकीने गप्पा मारणारे बाबासाहेब समोरच्या व्यक्तीशी कसं वागलं पाहिजे, याची शिकवण त्यांच्या वागणुकीतून देत असत. मागील काही वर्षांत मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारी काही चित्रे चितारली होती. ते चित्र पाहत असताना, बाबासाहेब तो प्रसंग सांगताना, असं वाटत होतं की, ते साक्षात् त्या प्रसंगाचे साक्षीदार आहेत आणि ते वर्णनातून आम्हाला त्या चित्राबद्दल मार्गदर्शन करत आहेत. चित्र बघत असताना शिवशाहीर बाबासाहेबांनी त्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान घडलेला एक प्रसंग सांगितला. बाबासाहेब म्हणतात, प्रेक्षकांमधून एक व्यक्ती उठली आणि मला विचारलं की, “शिवचरित्र तुम्ही तीन शब्दांत सांगू शकता का?”मी सांगितले, “जरूर, का नाही! सावधान-दक्ष-सम्यक्! छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर सावध राहिले, दक्ष राहून त्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला व त्याच्यासारख्या इतर शत्रूंचा नायनाट केला आणि आयुष्यभर सगळ्यांना समान वागणूक दिली!”



पुढे बाबासाहेबांनी त्यांची एक इच्छा माझ्यापाशी मांडली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर बरीच चित्रे, शिल्प पाहिली आणि बनवलीसुद्धा! नेहमी अश्वारूढ सिंहासनावर बसलेले किंवा काही पराक्रम करत असताना अशी चित्रे, शिल्पे साकारली जातात. महाराजांच्या सामान्य जीवनावर कधी तितकासा प्रकाश टाकला गेला नाही. ते काम चित्रांच्या माध्यमातून येणार्‍या चित्रकारांनी करावे, अशी इच्छा त्यांनी माझ्यापाशी मांडली. बाबासाहेबांची ही इच्छा ऐकून मी नव्या दृष्टिकोनातून ‘शिवचरित्र’ अभ्यासण्यास आणि चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. एक व्यक्ती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहकार्‍यांशी, वडीलधार्‍यांशी, लहानग्यांशी, सामान्य जनतेशी तसेच पर्यावरण याविषयी महाराजांच्या धोरणांचा विचारांचा व वागणुकीचा विचार करू लागलो. त्यावेळी बाबासाहेबांनी काही विषयसुद्धा सुचवले. यातूनच आपल्याला असे लक्षात येते की, शिवशाहीर बाबासाहेब हे इतिहासकार तर होतेच, पण त्यासोबत ते कलेचे उत्तम जाणकार होते.



एके दिवशी चित्रकार कुडलय्या हिरेमठ, विनायक माने यांनी मला सांगितलं, “तुम्हाला बाबासाहेबांचे चित्र काढायचे आहे आणि तेसुद्धा जन्मशताब्दीनिमित्त!” त्या क्षणी मी विचार केला की, आपण एक चित्रकार म्हणून काय करू शकतो? त्यावेळी मला आठवलं की, बाबासाहेबांची माझी पहिली ओळख कधी झाली, नक्कीच मी शाळेत असताना! बाबासाहेबांनी लहानग्यांसाठी लिहिलेले ‘शिवचरित्र’ वाचत असताना ते ‘शिवचरित्र’ वाचून मी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र माझ्या इतिहासाच्या वहीच्या पानावर काढले होते, हीच प्रेरणा घेऊन बाबासाहेबांचेसुद्धा चित्र परत लहान होऊन वहीच्या पानावरती काढायची इच्छा झाली, पण ते पानसुद्धा शंभरावे! कॅनव्हासवरच हुबेहूब वहीचे पान तयार करून निळ्या परमनंट मार्कर पेनने बाबासाहेबांचे चित्र रेखाटले.



मला आठवते, त्यावेळेस शाळेमध्ये माझ्याकडे ब्रश नव्हता म्हणून मी माझ्या राजाचे चित्र माझ्या हाताच्या बोटाने रंगवले होते म्हणून मी बाबासाहेबांचेसुद्धा चित्र हाताच्या बोटाच्या साहाय्याने रंगवले. खूप खूप सुख मिळालं चित्र पूर्ण झाल्यावर! बाबासाहेबांनी ते चित्र पाहून दिलेली प्रतिक्रिया अकल्पनीय व आयुष्यभर लक्षात राहणारी अशी आहे. भरभरून कौतुक करत असताना बाबासाहेब विनोद करत म्हणाले, “या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय!”
पृष्ठ क्र. १०० हे चित्र आणि ते बाबासाहेबांसोबत घालवलेले क्षण मला आयुष्यभर ऊर्जा देत राहतील!
मला ही संधी दिली, यासाठी मी ‘संस्कार भारती’चा कायम ऋणी राहीन !


गणेश कळसकर


 

Powered By Sangraha 9.0