भारतीय व्यवस्थापकांची यशस्वी विदेशवारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2021
Total Views |

india_1  H x W:
 
 
मूळ भारतीय अथवा अमेरिकेसह प्रगत देशांमध्ये स्थानिक होऊन अत्यंत तीव्र स्पर्धेवर मात करत तेथील व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांचे यशस्वी नेतृत्व करण्याचे यश आज या मंडळींनी प्राप्त केले आहे. भारत आणि भारतीयांच्या क्षमता-बुद्धिमतेच्या परिचय नव्या संदर्भासह आज उभ्या जगाला झाला आहे, ही बाब भारतीयांना पण प्रेरणादायी ठरली आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या महिन्यातील अमेरिकेसह विदेशवारी गाजली, ती त्यांच्या तेथील प्रमुख उद्योगांच्या मुख्याधिकाऱ्यांसह केलेल्या चर्चेने. या बैठक आणि चर्चेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेतील हे प्रमुख व यशस्वी मुख्याधिकारी मूलत: भारतीय आहेत व अमेरिकेत भारताच्या पंतप्रधानांशी प्रथमच त्यांची अशा प्रकारची व महत्त्वपूर्ण चर्चा झाली, ज्याची जागतिक स्तरावर व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात नोंद घेतली गेली.
 
 
यामध्ये प्रामुख्याने नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, या प्रमुख पाच यशस्वी मुख्याधिकाऱ्यांपैकी ‘अ‍ॅडॉब’ कंपनीचे शंतनू नारायण व ‘जनरल अ‍ॅटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल हे तर मूळ व जन्मत: भारतीयच आहेत. त्यांच्या मते, एक मूळ भारतीय म्हणून भारताच्या पंतप्रधानांशी चर्चा करण्याचा प्रसंग त्यांच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण व अभिमानास्पद बाब होती.
 
 
हीच बाब ‘गुगल’चे जागतिक प्रमुख सुंदर पिचाई व ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यासंदर्भात पण, तेवढीच लागू होती. या दोन्ही कंपन्यांमध्ये विविध व्यवस्थापकीय व महत्त्वाच्या पदांवर भारतीय तंत्रज्ञ व तज्ज्ञ व्यवस्थापक यशस्वीपणे कार्यरत आहेत, ही पार्श्वभूमीपण महत्त्वाची आहे. हीच बाब अमेरिकेच्या इतर काही प्रमुख व प्रथितयश कंपन्यांच्या संदर्भात नमूद करण्यासाठी आहे.
 
 
पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीपूर्वी दि. १ ऑक्टोबरला मूळ भारतीय असणाऱ्या शैलेश जेजुरीकर यांनी ‘प्रॉक्टर अ‍ॅड गँबल’ या जागतिक स्तरावरील ग्राहकोपयोगी उत्पादनाचे उत्पादन करणाऱ्या अमेरिकन कंपनीचे मुख्य म्हणून सूत्र हाती घेतली. शैलेश जेजुरीकर हे जन्माने मुंबईकर व लखनौच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’चे पदव्युत्तर पात्रताधारक आहेत. योगायोग म्हणजे शैलेश जेजुरीकर यांच्या जागी नेमणूक करण्यात आलेले सुंदर रमण हेसुद्धा भारतीयच आहेत, हे विशेष.
 
 
एका सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावरील निवडक ५०० कंपन्यांमध्ये सध्या ३० टक्के मुख्य कार्यकारी अधिकारी हे भारतीय अथवा मूळ भारतीय वंशाचे आहेत. संगणक क्षेत्रातील वैश्विक राजधानी असणाऱ्या ‘सिलिकॉन व्हॅली’तील एकूण संगणक तज्ज्ञ वा इंजिनिअर्समध्ये तर दर दहा तज्ज्ञांपैकी एक तज्ज्ञ भारतीय आहे, ही बाब भारत आणि भारतीय या उभयतांसाठी अभिमानास्पद आहे.
 
 
विदेशातील भारतीयांमध्ये काम करणाऱ्या ‘इंडियाअ‍ॅस्पोरा’ या स्वयंसेवी संस्थेचा अभ्यासानुसार सद्य:स्थितीत जागतिक स्तरावर ११ देशांतील ५८ प्रमुख व प्रथितयश कंपन्यांचे नेतृत्व भारतीय व्यवस्थापक यशस्वीपणे करत आहेत. या कंपन्यांचा व्याप म्हणजे त्यामध्ये सुमारे ३६ लाख कर्मचारी कार्यरत असून कंपन्यांची व्यावसायिक उलाढाल भारतीय रुपयांमध्ये सुमारो ६४ लाख कोटी आहे., याच अभ्यासानुसार भारतीय वा मूळ भारतीय असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांपैकी बहुतांश अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यानंतर क्रम लागतो तो कॅनडा व सिंगापूरमधील कंपन्यांचा. याशिवाय ब्रिटन, युगांडा व इथिओपिया यांसारख्या देशांमधील प्रमुख व निवडक कंपन्यांची व्यवस्थापनसूत्र आज भारतीय तंत्रज्ञ वा व्यवस्थापन तज्ज्ञ सांभाळत आहेत, हे उल्लेखनीय आहे.
 
 
जागतिक स्तरावर एक प्रमुख कंपनीचे प्रमुखपद सांभाळलेले राज गुप्ता हे विदेशी कंपनीचे व्यवस्थापन प्रमुखपद सांभाळणारे पहिले भारतीय ठरतात. त्यांच्या मते, आज विविध क्षेत्रातील तज्ज्ञ भारतीय ज्याप्रकारे आणि ज्या प्रमाणात विदेशात राहून अथवा तेथे जाऊन तेथील कंपन्यांचे नेतृत्व यशस्वीपणे करीत आहेत, त्याला खरोखर तोड नाही. राज गुप्ता १९९९ मध्ये ‘होम अ‍ॅण्ड हास’ या विदेशी केमिकल कंपनीचे प्रमुख बनणारे प्रथम भारतीय ठरले होते.
 
 
त्यांचाच कित्ता नंतरच्या काळात इंद्रा नूयी या महिला व्यवस्थापकाने गिरविला. २००१ मध्ये इंद्रा नूयी या ‘पेप्सीको’ कंपनीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. मूळ भारतीय असणाऱ्या इंद्रा नूयी यांनी त्यानंतर पाच वर्षांच्या काळात ‘पेप्सीको’च्या मुख्यधिकारीपदाची सूत्रे सांभाळली. इंद्रा नूयी या भारतातून वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी अमेरिकेत गेल्या व ‘पेप्सी’ या अमेरिकन कंपनीत रुजू झाल्या. त्यावेळी अमेरिकन कंपन्या व व्यवस्थापन क्षेत्रात भारतीय नाममात्र होते. तरीसुद्धा इंद्रा नूयी यांनी आपला नवा मार्ग तर चोखाळलाच, तसेच त्यात अल्पावधीत यश पण प्राप्त केले.
 
 
संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषज्ञ म्हणून पण भारतीय उद्योजकांनी आपली विशेष छाप विशेषतः अमेरिकेत सदोदित पाडली आहे. यासंदर्भात प्रमुख आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणारे म्हणून मूळ भारतीय असणाऱ्या सत्या नाडेला यांचे नाव नेहमीच घेतले जाते. ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये गरजेनुरुप व्यावसायिक बदल घडवून संगणक क्षेत्रात जागतिक स्तरावर ‘मायक्रोसॉफ्ट’ला आजचे स्वरुप देण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे, हीच बाब बऱ्याच प्रमाणात ‘आयबीएम’च्या संदर्भात पण लागू आहे. ‘आयबीएम’मध्ये मुळातून बदल घडवून ‘आयबीएम’ला त्याच्या मूलभूत व्यवसाय-सुविधा क्षेत्राचा पाया सुधरविण्यासाठी ‘आयबीएम’च्या अरविंद कृष्ण यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली.
 
 
जागतिक स्तरावर आज यशस्वीपणे ‘गुगल’चे व्यावसायिक नेतृत्व करणारे सुंदर पिचाई हे पण मूळ भारतीय. त्यांनी ‘ई-मेल’ इंटरनेटचा व्यवसाय जगभर वाढविण्यात व त्यामध्ये ‘गुगल’चे प्रस्थ आणि दबदबा कायम राखण्यात सुंदर पिचाई यांनी विशेष नावलौकिक मिळविला असून, त्यांची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. २०१५ मध्ये ‘गुगल’चे जागतिक मुख्याधिकारी म्हणून सूत्र सांभाळणाऱ्या सुंदर पिचाई यांचा काम आणि सेवेच्या सक्षमतेहस दर्जावर नेहमीच भर राहिला असून हीच बाब आज जगमान्य झाली आहे.
 
 
वरील काही बाबी उदारणादाखल नमूद केल्या आहेत. अशांची संख्या आणि त्यांच्या यशोगाथांची उदाहरणे वाढत्या स्वरूप आणि संख्येत पाहावयास मिळतात. मूळ भारतीय अथवा अमेरिकेसह प्रगत देशांमध्ये स्थानिक होऊन अत्यंत तीव्र स्पर्धेवर मात करत तेथील व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांचे यशस्वी नेतृत्व करण्याचे यश आज या मंडळींनी प्राप्त केले आहे. भारत आणि भारतीयांच्या क्षमता-बुद्धिमतेच्या परिचय नव्या संदर्भासह आज उभ्या जगाला झाला आहे, ही बाब भारतीयांना पण प्रेरणादायी ठरली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये हुशार आणि कर्तबगार भारतीयांना या निमित्ताने एक नवे दालन उपलब्ध झाले आहे.
 
 
भारतीयांच्या या व्यवस्थापनशैलीच्या यशामध्ये त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण व अनुभव या साऱ्यांचा आज प्रामुख्याने समावेश केला जातो. जागतिक स्तरावरील विख्यात व्यवस्थापक तज्ज्ञांच्या मते व प्रतिकूल परिस्थितीत काम करुन त्यावर मात करण्याची क्षमता या दोन मुख्य बाबी प्रामुख्याने दिसून येतात. प्रतिकूल परिस्थितीत केवळ काम करणेच नव्हे, तर आव्हानांचा यशस्वी सामना करण्याची क्षमता भारतीय व्यवस्थापकांची मोठीच जमेची बाजू असल्याचे सिद्ध झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधील व्यापारी भारतात आले. आज भारतीय व्यवस्थापक जगाचे यशस्वी दिशादर्शन करीत असून हे परिवर्तन विधितच प्रेरणादायी ठरले आहे.
 
 
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६
 
 
@@AUTHORINFO_V1@@