‘२६/११’ मुंबई हल्ला व्हाया अफ-पाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2021
Total Views |
Mumbai Attack_1 &nbs
 
 
आजच्या तारखेला ठीक १३ वर्षांपूर्वी दहा दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरुन १६६ जणांचे निष्पाप बळी घेतले आणि शेकडो नागरिक जखमी झाले. अशा या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेली पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’, त्याचे अफगाणिस्तान कनेक्शन आणि एकूणच या हल्ल्यामागील असेच काही धागेदोरे उलगडणारा करणारा हा विशेष लेख...
 
 
तेल अवीव ते मुंबई
 
 
रात्रीच्या काळोखात एका मोठ्या जहाजावरून लहान जहाजात उतरून दहशतवाद्यांचा गट किनाऱ्याला आला. गोळीबार करत आणि ‘हॅण्ड ग्रॅनेड’ वापरत ते पळत सुटले. पुढे त्यांना दिसलेल्या झगमगत्या हॉटेलमध्ये शिरून तेथे त्यांनी लोकांना ओलीस धरले. हॉटेलचा काही भाग आग लावून आणि ‘हॅण्ड ग्रेनेड’ने उद्ध्वस्त केला. अगदी ओळखीचे वर्णन असले, तरी हे केवळ मुंबईच्या ‘ताज’ हॉटेलवर झालेल्या २६ नोव्हेंबर, २००८च्या कुप्रसिद्ध हल्ल्याचे नाही. हे वर्णन आहे दि. ४-५ मार्च, १९७५ या दिवशी इस्रायलच्या ‘हॉटेल सव्हॉय’वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे! तेल अवीव आणि मुंबई या हल्ल्यांमध्ये खूप साम्य आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार होता, हाफिज सईद आणि तेल अवीववरच्या हल्ल्याचा सूत्रधार होता अबू जिहाद. मात्र, यात फरक असा की, इस्रायलने नंतर अबू जिहादला पार त्याच्या शयनकक्षात घुसून ठार मारले. पण, इकडे पाकिस्तानात हाफिज सईद अजूनही जीवंत आहे. अमेरिका, इस्रायल आणि भारत यात एक महत्त्वाचे साम्य आहे. इस्लामिक मूलतत्त्ववाद जोपासणाऱ्या संघटना या तिन्हींना आपले शत्रू मानतात. विशेषतः ‘लष्कर-ए-तोयबा’ने कायमच हिंसक मार्गाचे समर्थन केलेले असून वॉशिंग्टन, तेल अवीव आणि नवी दिल्ली यांच्यावर इस्लामचा झेंडा फडकवण्याची शपथ त्यांनी घेतलेली आहे. (संदर्भ- साऊथ एशिया टेररिझम पोर्टल)
 
 
दहशतवादाचे ‘मुंबई मॉडेल’
 
 
मुंबईवरचा हल्ला जगातील सगळ्यात भयंकर दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता. त्यात जमीन, पाणी आणि आकाश या तिन्ही मार्गांचा खुबीने वापर केला गेला. त्यात दहशतवादी ‘एक युनिट’ बनून हल्ला चढवत असतानासुद्धा एकमेकांशी सांकेतिक खुणा करून बोलत होते. त्याचवेळी थेट कराचीतून सूचना मिळत होत्या. हा रूढ अर्थाने ‘आत्मघातकी’ दहशतवादी हल्ला नव्हता, पण त्यात ठार मारले जात नाही तोपर्यंत ते हल्ला चढवत राहिले. आपले मरण अटळ आहे, हे गृहीत धरून आलेले ते ‘फिदायीन हल्लेखोर’ होते. नियोजन, प्रशिक्षण, शिस्त, परस्पर समन्वय, कंट्रोल रूमशी समन्वय तसेच, वाटाघाटी हे सगळे समाविष्ट असणारे हे दहशतवादाचे नवे प्रमेय मानले जाते.
 
 
दहा दहशतवाद्यांनी ‘दोन-दोन’च्या गटाने १) लिओपोल्ड कॅफे २) ‘ताज’ हॉटेल ३) नरिमन हाऊस ४) हॉटेल ओबेरॉय-ट्रायडंट ५) छत्रपती शिवाजी टर्मिनस या दहशतवाद्यांनी जाताना शक्य तिथे ‘आयईडी- एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ पेरले. ‘आरडीएस्क’, ‘एके-४७’ आणि ‘हॅण्ड ग्रेनेड’ वापरले. बेछूट गोळीबार केला. शेकडो जण ठार झाले. नरिमनच्या ‘छाबडा हाऊस’मध्ये नागरिकांना ओलीस धरून इस्रायलच्या राजदूत कार्यालयाशी बोलायला भाग पाडले. तेथे ज्यू रबाय आणि त्यांची सहा महिन्यांची गर्भवती पत्नीसह आणखीन चार ओलिसांना ज्यू असल्यामुळे ठार केले गेले. याच प्रकारचे ‘टार्गेटेड किलिंग’ नुकतेच काश्मीरच्या शाळेत झाले. ऑक्टोबर २०२१ मध्ये हिंदू आणि शीख शिक्षकांना ‘ओळखपत्र’ पाहून ठार केले गेले आहे. याची गंभीर नोंद घेतली पाहिजे. म्हणजेच दहशतवाद पुन्हा प्रभाव दाखवत आहे.
 
 
न्यूयॉर्क पोलिसांनी ‘फॉरेन्सिक’ अहवालात नमूद केले आहे की, हॉटेलमध्ये आणि छशिमट रेल्वे स्थानक या ठिकाणच्या गोळ्या व्यक्तीच्या डोक्याला लागतील, अशा पद्धतीने मारलेल्या होत्या. म्हणजेच हे दहशतवादी प्रशिक्षित होते.नवशिक्या व्यक्तीकडून मारलेल्या गोळ्या छताला किंवा जमिनीतसुद्धा सापडल्या असत्या. हल्ल्यात जीवंत सापडलेल्या अजमल कसाबने मुंबई पोलीस आणि अमेरिकेच्या ‘एफबीआय’च्या अधिकाऱ्यांना कबूल केले होते की, तो पाकिस्तानी नागरिक असून ‘लष्कर-ए-तोयबा’चा सदस्य आहे. हल्ला चालू असतानासुद्धा कराचीतून त्यांना मोबाईल आणि इंटरनेट टेलिफोनीद्वारे सूचना दिल्या जात होत्या. (संदर्भ- ‘ए डिकेड ऑन फ्रॉम द २००८ मुंबई अटॅक-रिव्हीव्हिंग द क्वेश्चन ऑफ स्टेट स्पॉन्सरशिप, प्रेम माधवन, २७ जून, २०१९, आयसीसीटी’ )
 
अफगाणिस्तान महत्त्वाचा, तेव्हा आणि आजही
 
 
अमेरिकेने २००१ साली अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानवर जे नियंत्रण आले होते, ते २०२१च्या सैन्य माघारीनंतर संपुष्टात आले. पुन्हा तालिबान मुक्तपणे राज्य करत असून पाकिस्तानचा सीमेजवळचा भाग आणि  अफगाणिस्तान इस्लामिक मूलतत्त्ववाद जोपासणारे केंद्र बनलेला आहे. मुंबईवरील हल्ल्यात जी ‘लष्कर-ए-तोयबा’ सहभागी होते, ती दहशतवादी संघटनाच मुळात १९८९ मध्ये अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेन याच्या आर्थिक प्रोत्साहनातून उभी राहिली होती. हाफिज सईद हा ‘जमात-उद-दावा’ याचा प्रमुख होता. त्यानेच अब्दुलाह युसुफ अझाम आणि झफर इकबाल यांच्यासह इस्लामी मुजाहिद्दीनांच्या बरोबर ‘लष्कर-ए-तोयबा’ची स्थापना केली. जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तानात विलीन करणे आणि संपूर्ण भारतातीय उपखंडाला इस्लामिक राजवटीत खलिफतमध्ये रुपांतरित करणे, हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे. ‘दि ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ने ‘लष्कर-ए-तोयबा’ला २०२० मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील सर्वाधिक सक्रिय संघटना ठरवले आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये जास्तीत जास्त जण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे नागरिक असून हजार जण अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या मे २०२०च्या अहवालात म्हटले आहे. त्यांचे १६ ‘ट्रेनिंग कॅम्प’ पाकव्याप्त काश्मीर आणि काही पाकिस्तानच्या खैबरपख्तुनख्वा आणि पंजाब येथे आहेत. त्यांना सौदी अरेबिया आणि आखाती देशातून अर्थसाहाय्यदेखील मिळते.
 
 
‘लष्कर-ए-तोयबा’चे संबंध तालिबान, ‘हरकत-उल-जिहाद अल इस्लामी’, ‘हक्कानी नेटवर्क’, ‘जैश-ए-मोहम्मद’, ‘अल कायदा’, ‘इंडियन मुजाहिद्दीन’ तसेच ‘सिमी’ यांच्याशी आणि काश्मीरमधील फुटीरतावादी गटांशीसुद्धा आहेत. बोस्निया, चेचन्या आणि कोसोवो तेथील इस्लामी गटांशीसुद्धा आहेत.(संदर्भ- ऑस्ट्रेलियन नॅशनल सिक्युरिटी वेबसाईट.) यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानची राजवट आल्यामुळे ‘लष्कर-ए-तोयबा’ला वावरणे अगदी सोपे झाले आहे, यात शंका नाही. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ ही हातातील बाहुले म्हणून १९९० पासून ही संघटना वाढली आहेच.
 
 
दहशतवाद जगात पसरवला आहे, तो अफगाणिस्तानच्या भूमीवरून आणि आजही पुन्हा अफगाणिस्तानवर राजकीय पकड प्रभावी नाही. सरकार हे निर्वाचित नाही आणि इस्लाम हा त्यांचा धर्म असल्यामुळे कुराण आणि हदीसमधील कायद्यांप्रमाणे तेथे राज्यकारभार सुरू झाला आहे. इस्लाम धर्मात म्हटलेले आहे की, “हे श्रद्धावंतांनो, यहुदी आणि ख्रिस्तींना आपले जीवलग बनवू नका, हे आपापसातच एक दुसऱ्याचे मित्र आहेत आणि जर तुमच्यापैकी कोणी त्यांना आपला मित्र बनवत असेल, तर त्याची गणना त्यांच्यातच होईल. नि:संशय अल्लाह अत्याचाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो.” (संदर्भ- ५.५१ सूरह अलमाइदा, पारा -६, पृष्ठ क्रमांक-२३८, दिव्य कुरआन-अटीप मराठी भाषांतर, सय्यद अबुल आला मौदूदी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई.) आता अस्थैर्यामुळे तेथे दहशतवादाची पुन्हा निर्मिती होणार, हे निश्चित आहे.
 
 
भारत पुन्हा एकदा ‘टार्गेट’
 
 
दहशतवाद्यांच्या यादीवर भारताचे नाव अतिशय ठळक आहे. कारण -
 
१. भारताचे भौगोलिक स्थान.
२. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान सत्तेवर आणि तेथील धर्मांधता.
३. पाकिस्तान आणि चीनचा तालिबानला पाठिंबा.
४. भारतात महत्त्वाचे निर्णय - अ) तिहेरी तलाक रद्द. ब) राम मंदिराचे बांधकाम. क) ‘कलम ३७०’ रद्द. ड) समान नागरी कायद्याकडे वाटचाल.
५. अमेरिकेची अफगाणिस्तानमधून माघार
६. महाराष्ट्र विशेषतः मुंबईचे आर्थिक महत्त्व.
 
 
 
भारतात मोदी सरकारने ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये असंतोष होता, त्याचा फायदा घेऊन ही संघटना पुन्हा दहशतवादी हल्ला करू शकते. कारण, ही मुळातच ‘जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तानमध्ये विलीन करणे’ या ध्येयासाठीच निर्माण झालेली आहे. ‘कलम ३७०’ रद्द केल्यामुळे कोणताही विशेष दर्जा आता जम्मू आणि काश्मीरला राहिलेला नाही. त्यामुळे देशाची एकसंधता आणि सुरक्षा वाढली आहे, हे त्यांना सहन होणारे नाही. तसेच यांचे संबंध अन्य अनेक दहशतवादी संघटनांशी असल्यामुळे एकमेकांशी संधान साधून हल्ल्याचे नियोजन तशी योजना बनवली जाणे शक्य आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’ने आतापर्यंत
 
१. लाल किल्ल्यावर (डिसेंबर २०००)
२. संसदेवर (२००१)
३. दिल्लीत (२००५)
४. मुंबईवर (२००८)
 
 
या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांना घडवलेले असून ही अजून पूर्णपणे संपलेली नाही. अफगाणिस्तानच्या ‘हक्कानी नेटवर्क’चे ‘लष्कर-ए-तोयबा’सह ‘अल कायदा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ यांच्याशी विशेष सख्य आहे. (संदर्भ- व्होरा आंचल, ’इट्स क्रेझी टू ट्रस्ट द हक्कानीज्.’) सद्य:स्थिती पाहता, अफगाणिस्तान-पाकिस्तान-चीन यांची युती भारतापुढे मोठे आव्हान उभे करत आहे. भारताचे भौगोलिक स्थान या तिन्ही राष्ट्रांच्या शेजारी असून ते जगात सगळ्यात धोकादायक देश आहेत. आज दक्षिण आशिया हा दहशतवाद आणि इस्लामी मूलतत्त्ववाद याचा केंद्र बनलेला आहे. शिवाय भारतात ‘इसिस’ म्हणजेच ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया’ला जाऊन मिळणारे कितीतरी ‘मोड्यूल्स’ सापडलेले आहेत. म्हणून भारताला पुन्हा एकदा दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
दहशतवाद : पाकिस्तान ते भारत व्हाया अफगाणिस्तान
 
 
पाकिस्तानमध्ये मुंबई हल्ल्याचा कट शिजला होता. ‘लष्कर-ए-तोयबा’ने आधी मुंबईच्या ‘ताज’वर गोळीबार करण्यासाठी केवळ दोन जणांना बांगलादेश-नेपाळ सीमा येथून पाठवण्याचे ठरवले होते. पण, डेव्हिड कोलमन म्हणजेच दाऊद गिलानी याने केलेली ‘रेकी’, ‘व्हिडिओ शूटिंग’, ‘जीपीएस’चा वापर आणि त्याचा सल्ला यामुळे हल्ल्याची व्याप्ती वाढवली गेली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात याची भूमिका महत्त्वाची आहे. वास्तविक या हेडलीकडे दोन किलो ड्रग्ज सापडल्यामुळे १९८८ मध्ये ‘फ्रँकफर्ट’च्या विमानतळावर अमेरिकेने अटक केली होती. पण, नंतर पाकिस्तानातून ‘९/११’ची पाळेमुळे आणि ओसामा-बिन-लादेनला शोधण्यासाठी त्याला ‘ड्रग्ज एन्फोर्समेंट एजन्सी’ने आपला एजंट बनवले. मग त्याची भेट लाहोरला भारतद्वेष्ट्या आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा संस्थापक हाफिज सईदशी झाली. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांनी २००२ पर्यंत हेडलीला स्वतंत्रपणे प्रशिक्षण दिलेले होते. ‘आयएसआय’ची ‘एस’ विंग म्हणजेच ‘सिक्युरिटी’ ही वास्तविक दहशतवादी कारवायांना साहाय्य देते.
 
 
‘आयएसआय’च्या मेजर इकबालने त्याला अमेरिकन पासपोर्ट देऊन २००६ मध्ये ‘रेकी’साठी भारतात पाठवले. हेडली हा ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयएसआय’ आणि ‘अल कायदा’ या तिघांना जोडणारा दुवा आहे. हेडलीने अमेरिकेच्या न्यायालयात कबूल केले की, त्याला ‘आयएसआय’ने गोपनीय बातम्या गोळ्या करण्याचे प्रशिक्षण दिले. त्याला २९,५०० डॉलर पाकिस्तानने दिले. त्यापैकी २८,५०० त्याला ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्याने दिले होते. (संदर्भ- ‘इनडीक्टमेंट अगेन्स्ट हेडली फाईल इन युएस डिस्ट्रिक्टकोर्ट.’) आणखीन पैसा पुरवला होता तो ‘लष्कर-ए-तोयबा’चा साजिद माजीद म्हणजेच साजिद मीर याने. हा ‘लष्कर-ए-तोयबा’चा उपप्रमुख होता. यानेच युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील दहशतवादी कारवायांमध्ये मदत केलेली होती. याने २००५ साली ‘क्रिकेट फॅन’ असल्याचे भासवून भारतात प्रवेश मिळवला आणि देहरादूनच्या ‘इंडियन मिलिटरी अॅकॅडमी’ आणि दिल्लीच्या ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’ची ‘रेकी’ केली होती. त्याचे थेट संबंध अफगाणिस्तानच्या ‘अल कायदा’शी होते. ‘छाबडा हाऊस’मध्ये रबाय होल्त्सबर्ग दाम्पत्याला थेट डोक्यात गोळ्या घालायची सूचना त्यावेळी यानेच दिली होती. याला इमरान खान सरकारने ‘लेव्हल सेव्हन’ दर्जाची सुरक्षा दिलेली आहे. (संदर्भ- हिंदुस्थान टाईम्स, २९ जून, २०२०, इस्रायलच्या मोसादच्या ‘टार्गेट लिस्ट’वर हा असणारच यात शंका नाही.)
 
मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहा दहशतवाद्यांना ‘पाकिस्तान आर्मी स्पेशल फोर्स’च्या माजी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. म्हणजेच ‘लष्कर-ए-तोयबा’ला पाकिस्तानच्या लष्कराची मदत होती, हे सिद्ध झाले आहे. पण, या हेडलीवर आपण भारतात खटला चालवू शकलो नाही. तो अमेरिकेच्या तुरुंगात ३५ वर्षांची शिक्षा भोगत आहे. याने २००६ ते २००९ दरम्यान भारतात नऊ फेऱ्या करून महत्त्वाच्या ठिकाणांची ‘रेकी’ केली. त्याने हल्ल्यानंतर २००९ मध्येसुद्धा जयपूर, दिल्ली, गोवा आणि पुण्याच्या ‘छाबडा हाऊस’ची ‘रेकी’ केली होती. यात तहव्वूर राणा हासुद्धा सामील होता. दिल्लीच्या ‘नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी’वर हल्ला करण्याची योजना हेडलीने ‘जुंद-ऊल-फिदा’ या ‘लष्कर-ए-तोयबा’शी संलग्न गटासाठी तयार केली होती. युद्धात ठार करता येणार नाहीत, तेवढे लष्कराचे आणि प्रशासनाचे उच्चाधिकारी येथे त्यांना ठार करायचे होते.
 
 
पाकिस्तानच्या ‘फाटा’ भागात २००९ मध्ये हेडलीला इलियास काश्मिरी भेटला होता. हा ‘अल कायदा’शी संलग्न असणाऱ्या ‘३१३ ब्रिगेड’चा प्रमुख होता. त्याने हेडलीवर डेन्मार्कच्या कोपेनहॅगेनमधल्या ‘जिलंद पास्तेम’ या वर्तमानपत्राच्या ‘रेकी’ची जबाबदारी सोपवली. यात २००५ मध्ये मोहम्मद पैगंबरांचे कार्टून प्रसिद्ध झाले होते म्हणून तेथील पत्रकारांचे गळे कापून रस्त्यावर भिरकावण्याची योजना तयार होत होती. हाच एलियास काश्मिरी १. मुंबई हल्ला -२००८ २. पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट २०१०, तसेच ‘जैश-ए-मोहम्मद’च्या स्थापनेत सहभागी होता. म्हणजेच दहशतवादी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे सतत वावरत होते. त्यांना हवे असणारे मुक्त वातावरण मिळत होते. तसेच ‘जैश-ए-मोहम्मद’ने १. जम्मू -काश्मीर विधानसभेवर २००१, २. संसदेवर २००१, ३. पठाणकोटच्या विमानतळावर २०१६, ४. उरी येथे हल्ला २०१६, ५. पुलवामा २०१९ आदी ठिकाणी हल्ला चढवला होता. या सगळ्या विवेचनातून जाणवते की, दहशतवाद हा देशाच्या सीमा ओलांडून धर्माच्या आधारे विध्वंस घडवतो. आजही पुन्हा इस्लामिक मूलतत्त्ववादाने आंतरराष्ट्रीय स्तरावर तशीच परिस्थिती निर्माण केलेली आहे.
 
 
देशद्रोही धर्मांधांचा धोका कायम
 
 
देशात पाकिस्तानचे समर्थन करणारे देशद्रोही आजही आहेत. सौदी अरेबियातून मे २०१२ ला झबिऊद्दीन अन्सारी म्हणजेच अबू हमजा म्हणजेच अबू जुंदाल याला पाकडून भारतात आणले गेले. हा भारतातील जिहादी होता आणि २००६ पासून तो पाकिस्तानमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ला मिळालेला होता. तो साजिद मिरच्या विश्वासात होता. त्याने हिंदी शब्द या दहशतवाद्यांना शिकवले होते. तसेच नंतर पुण्याच्या २०१०च्या बॉम्बस्फोट कटातसुद्धा हा सामील होता. मुंबईवर हल्ला करायला निघालेल्या दहा दहशतवाद्यांना शेवटी सोडायला आलेल्या चार ‘लष्कर-ए-तोयबा’च्या माणसांपैकी तो एक होता. (संदर्भ-‘जुंदल डीपोर्टेड फ्रॉम सौदी अरेबिया’, अली. एस. अहमद, ‘टाईम्स ऑफ इंडिया) मुंबईवर हल्ला होताना हा कराचीच्या कंट्रोल रूममध्ये उपस्थित होता. त्याने कबूल केले की, तिथे हाफिज सईद हा त्या दहशतवाद्यांना सूचना देत होता. पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’ची माणसे या कटात सामील होती. (संदर्भ- ‘सौदीज् हेल्प इंडिया नॅब ‘२६/११’ हॅण्डलर अबू जुंदाल’, ‘टाईम्स ऑफ इंडिया) २५ जून, २०१२ हल्ल्यानंतर यश साजरे करून नंतर ‘आयएसआय’ने ही कंट्रोल रूम नष्ट करून टाकली.
 
 
तसेच दि. १३ फेब्रुवारी, २०१० रोजी पुण्याच्या जर्मन बेकरी येथे ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला. तेसुद्धा ‘लष्कर-ए-तोयबा’शी संलग्न होते. ‘अल कायदा’चा महत्त्वाच्या माणूस शेख अल मासरी म्हणजेच मुस्तफा अबू अल याझिद हा २०१०च्या मेमध्ये ड्रोन हल्ल्यात मारला गेला. त्याने रेकॉर्ड केलेली फीत नंतर मिळाली. त्यान त्याने म्हटले आहे की, “भारतातील ज्यू लोकांना ठार करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये पश्चिम भारतात ‘जर्मन बेकरी’ येथे ऑपरेशन घडवून आणले. त्यात इस्रायलचे २० ज्यू ठार झाले. ज्याने हे घडवून आणले, तो काश्मीरच्या ‘क्वादत अल जिहाद’चा माणूस असून त्याला एलियास काश्मिरीने मदत केली.” (संदर्भ - ‘गोईंग नेटिव्ह- दि पाकिस्तनायझेशन ऑफ अल कायदा’, स्टीफन टेनकेल, २२ ऑक्टोबर २०१३, कार्निज एन्डोमेंट फॉर पीस.)
 
 
एकूणच जगातील सगळ्या इस्लामिक दहशतवादी संघटना एकमेकांना पाठिंबा देत आहेत. त्यांच्या माहितीची देवाणघेवाण, परकीय आर्थिक मदत मिळवणे हे सगळे आहे. कारण, त्यांच्यासाठी त्यांचा धर्म हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. देशाची सुरक्षा ही सामान्य नागरिकांचीसुद्धा जबाबदारी आहे. ती केवळ सुरक्षा यंत्रणांची नाही. भारतीय सुरक्षाव्यवस्था उत्तम असल्यामुळे अजून या सगळ्यांवर नियंत्रण आहे; अन्यथा मुंबई दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती वेगळ्या प्रकारे व्हायला वेळ लागणार नाही.
 
 
- रुपाली कुळकर्णी-भुसारी
९९२२४२७५९६
 
 
@@AUTHORINFO_V1@@