सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

पक्ष खिळखिळा होताच शरद पवारांची मोर्चेबांधणी सुरू

    दिनांक  25-Nov-2021 13:20:35   
|
PAWAR SHARAD SV.jpg_1&nbs
 


सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकीनंतर पक्षातील नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येण्यास सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहेत. सातार्‍यातील पक्षाची ताकद खिळखिळी होत असल्याचे जाणवताच शरद पवार यांनी आता नव्याने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

 
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदेंचा महेश शिंदे यांनी केलेल्या पराभवामुळे चर्चेमध्ये आला. यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये सुरू होती. परंतु ‘सिंहा’ला सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा राजकीय आखाडा सज्ज असताना आ. शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निमित्त होते, ते सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे. नुकताच सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या व्जावळी मतदारसंघातून बंड केलेले ज्ञानदेव रांजणे हे एका मताने निवडून आले आणि बालेकिल्ल्यामध्ये पक्ष खिळखिळा होत असतानाच त्याच दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा गाठले. जावळी तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मर्जीतले समजले जाणारे ज्ञानदेव रांजणे यांंनी येत्या काळातील जावळी तालुक्यावर पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी असणार्‍या शशिकांत शिंदेंना नामोहरम केल्याचीसुद्धा चर्चा सातार्‍याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. जिल्हा बँकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सातार्‍यातील राष्ट्रवादीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्याचेही दिसून येत आहे.


उदयनराजे बिनविरोध आणि शिंदेचा पराभव

 
सातार्‍याच्या राजकारणामध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याचे राजकारण मोठ्या आघाड्यांवर ढवळून निघाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी फिरवलेली पाठ हीसुद्धा जिल्ह्यातील राजकारणामध्ये सुरू असलेल्या खदखदीचा पुरावाच होता. सातार्‍याच्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजेंचा झालेला पराभव हा शरद पवारांच्या पावसाच्या सभेचे यश असल्याचे बोलले गेलेच. परंतु, अतिशयोक्ती म्हणजे ‘त्या’ पावसाच्या सभेने राज्यातील सत्ता बदलल्याचेसुद्धा राष्ट्रवादी प्रवक्त्यांनी सांगितले. उदयनराजेंना दिलेले तिकीट ही आपली राजकीय चूक होती, असे स्पष्टीकरण खुद्द शरद पवारांनी जाहीर सभेमध्ये दिले. परंतु, जिल्हा बँकेवर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी उदयनराजेंना बिनविरोध निवडून आणणे यामागे कोणते संबंध होते? ही पक्षाची चूक की ठरविलेले राजकारण? शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंना वेळोवेळी दिलेले आव्हान आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांचा अंतर्गत संघर्षामुळे पक्षातील नेत्यांऩी शशिकांत शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसला नसेल ना? अशी दबक्या आवाजामध्ये सध्या राजकीय गटामध्ये चर्चा सुरू आहे. या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकारणामध्ये पुन्हा बालेकिल्ला असलेल्या पक्षातील नेत्यांच्या पराभवाला त्यांच्याच पक्षातील नेते जबाबदार असतील, असे चित्र सध्यातरी कार्यकर्त्यांच्या चर्चेमध्ये बोलले जात आहे.
रंगणार जावळीचे राजकारण; शिंदेच्या ‘सेंकड ऑप्शन’ला धक्का

आ. शालिनीताईंचा पराभव करून कोरेगाव मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले शशिकांत शिंदे जिल्हा बँकेचीसुद्धा ‘हॅट्ट्रिक’ करू शकले नाहीत. यामुळे जावळीतून पुढील विधानसभा मतदारसंघातून निवडणुका लढविण्याची शक्यता असलेले शिंदेंना जावळीच्याच ज्ञानदेव रांजणे यांच्यासारख्या भूमिपुत्राने पराभूत करणे, यामध्ये येत्या काळातील जावळीच्या राजकारणाची पाळेमुळे जोडलेली असणार आहेत. आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा जावळी मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीचेच, पण शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे यांनी शिंदेच्या ‘सेंकड ऑप्शन’ला दिलेला धक्का नक्कीच आगामी विधानसभेच्या दृष्टीने चुरशीचा ठरणार आहे. कोरेगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या महेश शिंदेचे आव्हान, तर दुसरीकडे स्वपक्षातील बंडखोरीमुळे कात्रीमध्ये सापडलेले शशिकांत शिंदे आगामी काळामध्ये पक्ष वाढविण्यासाठी कोणता मोहरा निवडतील, याचेच औत्सुक्य कार्यकर्ते आणि जाणकारांमध्ये सध्या दिसून येत आहे.
कोरेगावमध्येसुद्धा शशिकांत शिंदेना धक्का!

 
महेश शिंदे यांनी २०१९ मध्ये शशिकांत शिंदेंचा पराभव करुन ऐतिहासिक विजय मिळविला, असे मतदारसंघामध्ये बोलले गेले. शशिकांत शिंदे यांची तिसरी ‘टर्म’ असल्याने नागरिकांनी नव्या उमेदवाराला संधी दिल्याचेसुद्धा बोलले गेले. परंतु, शशिकांत शिंदेंच्या वर्चस्वाला जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये कृषी पतपुरवठा मतदारसंघामध्येसुद्धा पराभवाचा धक्का देत आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघामध्ये स्वतःची पुन्हा एकदा ताकद दाखवून दिलेली आहे. आ. महेश शिंदे पुरस्कृत सुनील खत्री यांची लढत राष्ट्रवादी क़ाँग्रेसचे शिवाजीराव महाडिक यांच्याबरोबर असताना खत्री यांना एकूण ९० मतांपैकी ४५ मते मिळणेसुद्धा राष्ट्रवादीच्या अंतर्गत संघर्षाचेच द्योतक आहे. कोरेगावमधून इच्छुक असणार्‍या सुनील मानेंना पक्षाने टाळल्याने खत्री यांना ४५ मते पडून शशिकांत शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का बसलेला आहे. एकूणच राष्ट्रवादी क़ाँग्रेसमधील अंतर्गत दुफळीमुळे आता कोरेगावसारखा मतदारसंघसुद्धा राष्ट्रवादीला सोडावा लागतो की काय, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच आ. महेश शिंदे यांनी दुसर्‍यावेळी शशिकांत शिंदेंवर जय मिळविल्याने येत्या काळामध्ये शशिकांत शिंदेंना कोरेगाव जिंकणे तितकेसे सोपे असणार नसल्याचीसुद्धा चर्चा आहे.


“ ...म्हणून त्यांनी माझे नाव घेतले   निवडणुकीच्या निकालानंतर ज्ञानदेव रांजणे यांनी आभार मानताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जाहीररित्या नाव घेतले आणि आभारही मानले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यासंदर्भात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला असता ते म्हणाले की, “मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना रांजणे यांच्या जिल्हा परिषदेच्या वेळी मी त्यांना वेळोवेळी मदत केली. त्यामुळेच त्यांना माझे नाव घेतले असावे,” असे त्यांनी सांगितले.”
काँग्रेसचा ‘भोपळा’
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ११ संचालकांसोबत आपले वर्चस्व सिद्ध केले. याबरोबरच भाजपनेसुद्धा आपले सात संचालक बँकेवर निवडून आणलेदेखील. शेखर गोरे यांच्या बँकेच्या संचालक मंडळातील प्रवेशामुळे शिवसेनेनेसुद्धा आपला एक संचालक संचालक मंडळावर पाठविला. परंतु, कराड सोसायटीमधून विलासकाका उंडाळकरांपासून सुरू असलेली सलग ११ वेळा काँग्रेस पक्षाची जिंकून येण्याची परंपरा अखेर अ‍ॅड. उदयसिंह उंडाळकर यांचा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पराभव करून खंडित केली. यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उतरती कळा सुरू असतानाच महत्त्वपूर्ण अशा जिल्हा बँकेमध्येसुद्धा काँग्रेसला एकही संचालक निवडून आणता आलेला नाही.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.