शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द

25 Nov 2021 23:40:19
 
shakti mill_1  
 
 
 
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील शक्ती मिल येथे ऑगस्ट २०१३ साली झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी रद्द केली. सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुरुवारी देण्यात आलेल्या निकालात न्यायालयाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी या ५ पैकी ३ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.
 
 
 
या प्रकरणी निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हंटले की, "या घटनेने समाजाला खूप मोठा धक्का दिला. बलात्काराची प्रत्येक घटना ही खूप मोठा गुन्हा आहे. यामुळे फक्त शारिरीक नाही तर मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. पीडितेच्या सन्मानावर हा हल्ला असतो. पण घटनेवर चालणारे न्यायालय लोकांच्या मतांच्या आधारे शिक्षा ठरवू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा असून, फाशी हा एक अपवाद आहे. त्यामुळे योग्य विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. अशा घटनांमध्ये प्रक्रिया विसरुन चालणार नाही. फाशीची शिक्षा रद्द करताना आम्ही प्रक्रियेचे पालन केले आहे. आरोपी जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत. महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत." असे न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले आहे.
 
 
 
 
संपूर्ण देशाला हादरवणारे मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण
२२ ऑगस्ट २०१३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला तिच्या सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तिथे गेली होती. त्यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे अन्य एका १९ वर्षीय तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील आरोपीदेखील तेच होते. मुंबई सत्र न्यायालयाने यातील आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला शिक्षा सुनावली होती. सिराज खानला जन्मठेप तर इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0