मराठी साहित्य संमेलनात २५० कलाकारांची ‘आनंदयात्रा’ ठरणार विशेष आकर्षण

    दिनांक  25-Nov-2021 14:16:19
|
abms 94.jpg_1  


नाशिक : नाशिक येथे आयोजित ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शहरातील तब्बल २५० ते ३०० कलाकारांचा सहभाग असलेली ‘आनंदयात्रा’ विशेष आकर्षण ठरणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिक, त्यांच्या साहित्याचे प्रातिनिधिक प्रतिबिंब यातून उमटणार असल्याचे सांस्कृतिक समितीप्रमुख, दिग्दर्शक सचिन शिंदे आणि विनोद राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषेत सांगितले.नाशिकच्या ‘भुजबळ नॉलेज सिटी’त दि. ३ ते ५ डिसेंबरदरम्यान होणार्‍या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर नाशिकच्या कलाकारांची ‘आनंदयात्रा’ विशेष आकर्षण ठरणार आहे. सदर कार्यक्रम शनिवार, दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संमेलनाच्या मुख्य सभामंडपात होणार आहे. या ‘आनंदयात्रे’त नाशिकचेच नाही, तर उत्तर महाराष्ट्रातील दिवंगत साहित्यिकांच्या साहित्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरुपात हे साहित्य कथा, कविता, नृत्य, नाट्य, माहितीपटाच्या माध्यमातून उलगडत जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन शिंदे, तर सहदिग्दर्शन आणि प्रकाशयोजना विनोद राठोड करणार आहेत. रंगभूषा मारिक कानडे, वेशभूषा अपूर्वा शौचे, संगीत संयोजन आनंद ओक, ध्वनिसंयोजन रोहित सरोदे, जयंत ठोमरे, चित्रफीत संकलन लक्ष्मण कोकणे आणि या कलाकारांचे समन्वयन अभय ओझरकर, श्रीराम वाघमारे हे करत आहेत. यातील सहभागासंदर्भात शहरातील सर्व सांस्कृतिक संस्थांशी संपर्क साधण्यात येऊन कार्यक्रम सर्व समावेशक कसा होईल, यावर भर असल्याचे विनोद राठोड यांनी यावेळी सांगितले. निवेदनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम पुढे सरकणार आहे. या कार्यक्रमाला नाशिककरांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि एका वेगळ्या कार्यक्रमाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात संत, कवी, शाहिरी, चित्रपट, नाट्य अशा परंपरा गुंफत आहोत. सादरीकरणाच्या दृष्टीने जे साहित्य आहे ते निवडले आहे. ज्याचे सादरीकरण होऊ शकत नाही ते निवेदनात किंवा माहितीपटातून दिसणार आहे. एक पर्यटक आणि एक गाईड यांच्या माध्यमातून ते निवेदन पुढे सरकत जाईल. साधारणत: ५२ ते ५५ साहित्यिकांचा विविध माध्यमातून समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा समावेश प्रातिनिधिक स्वरूपाचा असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
 
संमेलनात उलगडणार जिल्हा निर्मितीच्या १५० वर्षपूर्तीचा प्रवास
 
नाशिक जिल्हा निर्मितीची १५० वर्षपूर्ती आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नाशिकमध्ये आयोजन हा दुग्धशर्करा योग असून, या औचित्यावर संमेलनात परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात जिल्ह्याच्या १५० वर्षांतील प्रवासाची मांडणी साहित्यिक, अभ्यासकांकडून केली जाणार आहे. त्याची रचना कशी असावी यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे प्रत्येक सादरीकरणास साहित्याची जोड असावी, असे या परिसंवादाच्या रचना निश्चितीसाठी बैठकीत ठरल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. साहित्य संमेलनात नाशिक जिल्ह्याच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच्याच नियोजनासाठी साहित्यिक, अभ्यासकांची बुधवारी बैठक झाली. जिल्ह्याच्या प्रत्येक क्षेत्राला मोठा वारसा आहे. पण याची नाशिककरांना माहिती नाही. १५० वर्षात नाशिकने विकासाचा मोठा टप्पा गाठला. त्यात महत्त्वाची क्षेत्र, शक्तिस्थळ निवडून त्यांची प्रगती, सद्यस्थिती आणि भविष्य नेमके काय असेल? असे तीन टप्पे करत त्यानुसारच सादरीकरण केले जाईल. याचा उपयोग जगातील इतर शहरांना होऊ शकेल असे मांढरे यांनी सांगितले. आदिमकाळापासून ग्रंथालय चळवळीपर्यंतचा यात समावेश असेल. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा झालेला प्रवास मांडला जाईल. नाशिक एक मॉडेल ठरावं असंच नियोजन करण्यात येत आहे. हेच सारे साहित्य संमेलनात कसे मांडायचे, कोणी मांडायचे यावर बैठकीत चर्चा झाली. १५० वर्षांत नाशिकची झालेली प्रगती, यात प्रमुख क्षेत्रांचा मांडणी केली जाणार आहेत. यातून साहित्य, कला, संगित, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशी १२ क्षेत्र निवडण्यात आली आहे. 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.