आयसीस काश्मीरने गंभीरला दिली जीवे मारण्याची धमकी

24 Nov 2021 13:20:28

Gambhir_1  H x
नवी दिल्ली : भारतीय माजी क्रिकेटपटू आणि भाजप दिल्ली खासदार गौतम गंभीरला दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आयसीस काश्मीर या दहशतवादी संघटनेने ही धमकी दिली आहे. यानंतर गंभीरने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी आता चौकशी करण्यात येत असून ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली.
 
 
पोलिस उपायुक्त श्वेता त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीस काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ईमेल आणि फोनच्या माध्यमातून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर लगेच त्याने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबाला ही धमकी मिळाल्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
 
 
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने २०१८ पासून क्रिकेटमधून निर्वृत्ती स्वीकारली. त्याने २००७च्या टी २० विश्वचषक तसेच, २०११च्या विश्वचषक विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. निर्वृत्ती स्वीकारल्यानंतर त्याने २०१९मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि दिल्ली पूर्व विभागातून खासदार म्हणून निवडून आला. तो नेहमीचा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.
 
Powered By Sangraha 9.0