समाजसेवेची तपस्विनी

    दिनांक  24-Nov-2021 12:25:50
|

Swati Saraf_1  
 
त्यांच्या आडनावावरून जातीचा अंदाज बांधत, त्यांना नोकरीसाठी होकार आलाच नाही. त्याचवेळी शिक्षकी पेशाला रामराम करत सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या स्वाती सराफ यांच्याविषयी...
शिक्षिका म्हणून नोकरीसाठी त्यांनी मुलाखत दिली, तेव्हा त्यांच्या आडनावावरून जातीचा अंदाज बांधत त्यांना होकार आलाच नाही. त्यांनी ही बाब पतीला सांगितली आणि पती संजय सराफ यांनी त्यांना शिक्षिकेची नोकरी करण्यापेक्षा सामाजिक कार्य करण्याचा सल्ला दिला. मग सुरू झाला स्वाती संजय सराफ यांचा शिक्षिका ते सामाजिक कार्यकर्त्या असा प्रेरणादायी प्रवास...
स्वाती यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतचा. १९८१ साली विवाह झाल्यानंतर त्यांना पती संजय यांनी पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी एमए-बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि काही काळ नाशिकमधील ‘रुंग्टा हायस्कूल’ आणि ‘रवींद्र विद्यालया’त शिक्षिकेची नोकरी करत त्याचबरोबर ‘योगायोग वधू-वर संस्था’ही सुरू केली. दरम्यान, १९९२ साली पती संजय यांची रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे बदली झाली. परिणामी, त्यांनी नाशिकमधील शिक्षिकेची नोकरी सोडली आणि ‘राघव तेथे सीता’ या उक्तीप्रमाणे सराफ कुटुंबीय खोपोलीत स्थायिक झाले. त्यावेळी खोपोलीत त्या एका शिक्षण संस्थेत मुलाखतीसाठी गेल्या असता, त्यांच्या आडनावावरून जातीचा अंदाज बांधत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या संस्थेकडून पुढे नोकरीविषयी होकार आलाच नाही. यावेळी त्यांना पती संजय यांनी त्यांना नोकरीत न अडकता, समाजकार्याची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
 
सर्वप्रथम त्यांनी आपल्या घरापासूनच सुरुवात केली. त्यांच्या घरी घरकाम करणार्‍या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी ‘बीडीओं’ची भेट घेत पुढाकार घेतला. घरकाम करणार्‍या चंदाबाईंच्या पतीच्या निधनानंतर त्यांनाही त्यांनी आधार देत त्यांना आणखी काही घरांची कामेही मिळवून दिली. तसेच ‘संजय गांधी निराधार योजने’चे अनुदान सुरू करण्यासही मदत केली. दरम्यान, स्वाती यांची ‘महिला दक्षता कमिटी’वर निवड झाल्याने त्याचाही त्यांच्या सामाजिक कार्याला फार मोठा फायदा झाला. खोपोलीतील शांतिनगर भागात खराब रस्ता आणि ‘एक्सटेंशन वायर’ असल्या कारणाने घरगुती गॅस सिलिंडर घरपोच मिळत नव्हते. परिणामी, येथील रहिवाशांची मोठी अडचण होत होती. त्यावेळी स्वाती यांनी सर्वांच्या सह्या घेऊन पुढाकार घेत हा प्रश्न निकाली काढला. याच भागातील काही मुली, महिला पत्ते खेळत बसत. शिक्षण, खेळण्या-बागडण्याच्या वयात हे घडत असल्याने त्यावेळी स्वाती यांना वाईट वाटले. त्यांनी समजावल्यानंतरही बदल न झाल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी समजावल्यानंतर पत्ते खेळणे बंद झाले.
 
रायगड जिल्ह्यातील गरजू महिलांना पतपेढीचे कर्ज मिळवून देणे, घरगुती व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासह समुपदेशनही करत. त्यांचे सामाजिक कार्य पाहून भाजप पदाधिकार्‍यांनी त्यांना पक्षात येण्याचा आग्रह केला. मात्र, सुरूवातीस त्यांनी नकार दिला. मात्र, सर्वांच्या आग्रहानंतर त्यांनी खोपोलीच्या भाजप महिला मोर्चाचे अध्यक्षपद स्वीकारले. पुढे त्यांनी रायगड भाजप महिला मोर्चाचे उपाध्यक्षपद आणि त्यानंतर अध्यक्षपदही भूषविले. साहित्यिक रघुनाथ वामन दिघे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातही त्यांचा पुढाकार होता. यादरम्यान त्यांना मधु मंगेश कर्णिक, शांताबाई शेळके, दया पवार, माधव गडकरी या दिग्गजांचाही सहवास लाभला. ‘दक्षता कमिटी’वर पंच म्हणून काम करत असतानाही त्यांनी अनेक संसार वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. पुढे स्वाती यांनी ‘सखी महिला मंडळा’ची स्थापना करत अराजकीय सामाजिक कार्यक्रम राबविले. नाटके स्वत: लिहून ती दिग्दर्शितही केली. तसेच रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांचे सादरीकरणही केले. अनेक शाळा, महाविद्यालयांत युवकांना त्यांनी मार्गदर्शन आणि व्याख्याने दिली. तसेच पती संजय यांच्या कंपनीतही त्यांनी ‘कुटुंब कल्याण’ विषयावर कामगारांना मार्गदर्शन केले. ‘नारंगी’ संस्थेतही दर महिन्याला त्यांनी महिलांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. यावेळी जिल्हाधिकारीदेखील उपस्थित असत. अनेक स्पर्धा, परीक्षांसाठीही त्यांनी परीक्षकाची भूमिका पार पडली. स्वाती यांच्या दोन्ही मुली उच्चशिक्षित आहेत. अश्विनी या डॉक्टर, तर प्राजक्ता या परकीय भाषांचे क्लासेस घेतात.
 
दरम्यान, २००५ साली पती संजय यांची पुन्हा नाशिकला बदली झाली. त्यावेळी स्वाती यांनी सर्व राजकीय पदांपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. खोपोली सोडून जाताना तेथील महिला भावुक झाल्याचे स्वाती सांगतात. नाशिकला आल्यानंतर त्यांनी ‘संस्कार भारती’च्या सचिव पदाची जबाबदारीही काही काळ सांभाळली. नंतर यातूनही त्या मुक्त झाल्या. मात्र, वयाच्या साठीनंतरही त्यांनी कॉलनीत महिला मंडळ स्थापन करत सामाजिक कार्य सुरूच ठेवले आहे. दरम्यानच्या काळात वृत्तपत्रातूनही त्यांचे लिखाण सुरूच आहे. आतापर्यंत स्वाती यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 
प्रत्येकाला देवाने शक्ती दिलेली असते. त्यामुळे जीवनामध्ये कुठल्याही प्रसंगात घाबरू नये, सुशिक्षितांनी आपल्या ज्ञानाचा, पदाचा गरजूंसाठी वापर करावा. तसेच आपल्या सभोवती असलेल्या गरजू, वंचितांना मदत करण्याचे आवाहन स्वाती करतात. आडनावावरून जातीचा अंदाज बांधल्याने स्वाती यांनी शिक्षकी पेशा सोडून आपली सामाजिक कार्याची आवड जोपासली आणि त्या यशस्वीही झाल्या. त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
 
- पवन बोरस्ते
७०५८५८९७६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.