मर्यादांच्या क्षितिजापल्याड...

23 Nov 2021 13:10:43

sports.jpg_1  H



तुम्ही तयार असाल, तर जेव्हा खेळाडूंचे आयुष्य थंडावते, थोडे आळसावते, इच्छाशक्ती साथ देईनाशी होते, तेव्हा थोडे थांबा. आजुबाजूला पाहा. इतर काय करत आहेत, ते पाहा. थोडे आपल्या क्षितिजापलीकडे डोकावण्यास सुरुवात करा. तेव्हा खरंच मनातील ऊर्जा वर्धित होते. प्रश्नांना उत्तरं मिळतात. श्वासांना प्राणवायू मिळतो.




 
सनरायझर्स हैदराबाद’चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने ‘मुंबई इंडियन्स’वर मात करत २०२० मध्ये ‘सेमी फायनल’मध्ये प्रवेश करताना सुंदर भाष्य केले होते. तो म्हणाला होता की, “आमचा ‘नेव्हर से डाय’ दृष्टिकोन आम्हाला संपूर्ण खेळाचा आराखडा बदलायला मदतीचा ठरला.” ‘मुंबई इंडियन्स’ना पूर्ण दहा विकेट्स हातात ठेवून त्यावेळी हरवले होते. त्यांच्यावर जिंकण्याचे ‘प्रेशर’ असतानाही काही झाले, तरी हरणार नाही, या वृत्तीतून डेव्हिड वॉर्नर एक अचंबित खेळी खेळला होता. नुकतीच ‘टी-२० वर्ल्ड कप’ मॅच झाली तेव्हा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे सख्खे शेजारी ज्यांच्यातून क्रिकेट खेळताना विस्तवसुद्धा जात नाही, असे स्पर्धक खेळताना पाहिले. प्रेक्षकांनी तांत्रिकदृष्ट्या सकस खेळ तर पाहिलाच, पण अटीतटीची दोन उन्मत्त बैलांची मानसिक झुंजसुद्धा मनापासून उत्स्फूर्तपणे अनुभवली. त्यातली क्षणाक्षणाची पिसाट थरारी मोठ्या उत्साहाने झेलली. खरेतर डेव्हिड वॉर्नर जो मानसिक क्रिकेटच जास्त खेळतो, असे मानले जाते, तो काही विशेष ‘फीट’ नव्हता, असे या ‘सीझन’मध्ये ऐकिवात होते. ‘त्याचे करिअर आता संपले’, ‘ही वॉज डन’ असा प्रवाद सगळीकडे म्हणजे पूर्ण जगभर पसरला होता. असा हा जनतेच्या दृष्टीने ‘बाद’ झालेला भीडू डेव्हिड वॉर्नर अविश्वसनीयरित्या चक्क वेडेवाकडे फटकारे मारत खेळी खेळत होता. कधी चार, कधी सहा आणि मधूनमधून सहकार्‍यांच्या हातावर हात मारून त्यालाही प्रेरणा देत होता. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी प्रेरणादायी, चिथावणारा आणि मानसिक बळ देणारा नयनरम्य खेळ खेळला. पुन्हा एकदा समालोचकांनी डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या टीमचे भरभरून कौतुक केले. त्यांना त्यांचे शब्द अपुरे पडत होते. पण, डेव्हिड वॉर्नरच्या मैदानी खेळीत दम होता. त्यांच्या टीमने त्यांचा पहिलावहिला ‘टी-२०’ मिळवून इतिहास रचला होता. यावेळीही डेव्हिड वॉर्नरचे “मी खेळाकडे कधीच मृत्यू स्वीकारणार नाही, याच प्रवृत्तीने पाहतो,” हे मनोहरी शब्द प्रकर्षाने आठवले.






एखाद्याच्या आयुष्याकडे जर विपरित परिस्थितीशी सामना करत जवळजवळ महायुद्ध करत जिंकून येता येते. याविषयी बोलायचे म्हटले, तर मॅडम दीपा मलिक यांचे उदाहरण हे अगदी जीवंत उदाहरण. या बाईच्या खेळाची एकही फेरी मी चुकवत नाही. टीव्हीवर त्यांची प्रत्येक हालचाल त्या जरी ‘व्हिलचेअर’मध्ये असल्या, तरी संचारल्यासारख्या असतात. ऊर्जेने भारावलेल्या असतात. जिथे जिथे जीवनाचा श्वास आहे तिथे तिथे यशाची आस आहे, असे त्यांच्या प्रत्येक कृतीतून निनादत असते. त्यांना ‘प्रेसिडेंड रोल मॉडेल अवॉर्ड’ (२०१८) तर ‘अर्जुन अवॉर्ड’ (२०१२) मिळाले आहेत. दीपा मलिक यांनी मणक्याच्या ट्युमरवर ३१ शस्त्रक्रिया आणि १८३ टाक्यांवर मात करत रिओच्या ‘पॅरालिम्पिक’मध्ये रौप्यपदक मिळविले. त्या ‘पॅरालिम्पिक’मध्ये भारतातून पहिलेच पदक मिळविणार्‍या एकमेव महिला आहेत. ज्या वयात हे रौप्यपदक मिळविले, त्या वयात साधा खेळ शिकण्याचे धाडस सर्वसामान्य मंडळी करणारही नाहीत. त्यांची शिस्तप्रियता स्पर्धात्मक प्रवृत्ती, निष्ठा याबरोबरच आत्मसन्मानाने जतन केलेली लढाऊ प्रवृत्ती त्यांच्या विजयाचे अमूल्य कारण आहे. जिथे नशिबाने घात केला तिथे देवाने त्यांच्या ‘नेव्हर से डाय’ या प्रवृत्तीला आपल्या आशीर्वादाने बळ दिले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीने जिच्या जगण्याला अभिवादन करता येईल, अशा दीपा मलिक संपूर्ण जगात सन्मानाने गौरविल्या जातात. सुनील छेत्री हे जागतिक दर्जाचे ७० गोल केलेले आपल्या देशाचे खर्‍या सकारात्मक दृष्टीने ’मंजे हुए फुटबॉल प्लेअर’ आहेत. त्यांना प्रेरणा कुठून मिळते, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “मला प्रेरणा माझ्या अवतिभोवती मिळत गेली.” त्यातही त्यांचे प्रेरणास्थान आहे मेरी कोम. त्या सहावेळा जगज्जेत्या ठरल्या आहेत आणि दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यावरही त्या बॉक्सिंगमध्ये पुन्हा एकदा जगज्जेत्या ठरल्या आहेत, हे अविश्वसनीय नाही का? शिवाय त्यांच्याकडे एकूण १४ सुवर्णपदके आहेत, मग ती एशियन्स गेम्स असोत वा ‘कॉमनवेल्थ गेम्स’ असोत. या नाहीतर आणखी कोण या देशातील इच्छुक खेळाडूंना प्रेरणा देणार? त्यांच्यासाठी सुरुवात करायचीच म्हटलं तर कुठल्याच गोष्टीला कधीच उशीर झालेला नसतो. (Nothing is too late) काहीही शक्य आहे. तुम्ही तयार असाल, तर जेव्हा खेळाडूंचे आयुष्य थंडावते, थोडे आळसावते, इच्छाशक्ती साथ देईनाशी होते, तेव्हा थोडे थांबा. आजुबाजूला पाहा. इतर काय करत आहेत, ते पाहा. थोडे आपल्या क्षितिजापलीकडे डोकावण्यास सुरुवात करा. तेव्हा खरंच मनातील ऊर्जा वर्धित होते. प्रश्नांना उत्तरं मिळतात. श्वासांना प्राणवायू मिळतो. मेरी कोम म्हणतात, “आपल्या भिंतीपलीकडे पाहताना व्यक्तीला मनाची सीमा उलगडता येते.” समजून घ्यायची मर्यादा रुंदावते. प्रत्येकाच्या आयुष्यात आंतरिक ऊर्जाच माणसाला अपूर्णतेच्या क्षितिजापलीकडे घेऊन जाते. मानली तर मर्यादा आणि बंधन, नाही मानले तर फक्त आकाशाचीच मर्यादा असते. मृत्यू ही मर्यादा आहे शरीराची, पण मी मरणार नाही (Never say die) ही वृत्ती आहे मानवी भरारीची!!!



-डॉ. शुभांगी पारकर

Powered By Sangraha 9.0