आत्मविश्वासाने ‘कमबॅक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2021
Total Views |

rohit sharma.jpg_1 &

 
संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) धरतीवर पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ विश्वचषक करंडक क्रिकेट स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नसली, तरी स्वदेशी धरतीवर न्यूझीलंडविरूद्ध पार पडलेल्या ‘टी-२०’ मालिकेत निर्भेळ यश मिळवत भारतीय क्रिकेट पुरुष संघाने उत्तम प्रकारे ‘कमबॅक’ करण्यात यश मिळविले आहे. न्यूझीलंडसारख्या संघासोबत ‘३-०’च्या फरकाने मालिका जिंकत भारतीय संघाने क्रिकेट वर्तुळात आजही आपला दबदबा कायम असल्याचे भारतीय संघाने दाखवून दिले आहे.






भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि ‘टी-२०’ संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा तसेच संघ व्यवस्थापनाने केलेले विविध प्रयोगदेखील यशस्वी ठरल्याचे यावेळी पाहायला मिळाले. मात्र, या विविध प्रयोगांनंतरही भारतीय संघापुढे फलंदाजीचे मधल्या फळीचे आव्हान अद्याप कायम असल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे, तिसर्‍या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने सलामीला उत्कृष्ट खेळी करत मोठ्या धावसंख्येसाठी पाया रचल्यानंतरदेखील भारतीय संघ अपेक्षित मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. ज्या पद्धतीने रोहित शर्माने आक्रमक खेळी करत अर्धशतक ठोकले, त्यानुसार भारत २००हून अधिक धावसंख्येचे आव्हान प्रतिस्पर्धी संघापुढे ठेवेल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. भारताने १८५ धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले. १८५ धावसंख्येचे आव्हान काही कमी नाही. हेदेखील प्रतिस्पर्धी संघासमोर एक तगडे आव्हानच आहे. परंतु, ज्या पद्धतीने सुरुवातीला खेळ झाला, तसे काही अपेक्षित धावसंख्येचे आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवणे भारताला शक्य झाले नाही. त्यामुळे सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विजयाबद्दल सांगताना या यशात गोलंदाजाचा सर्वात मोठा वाटा असल्याचे विधान केले. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७३ धावांनी विजय मिळविला आणि मालिकेत ‘३-०’ असे निर्भेळ यशही मिळविले. खरेतर फलंदाजीही उत्तम झाली आहे. परंतु, मधल्या फळीत अपेक्षित खेळी होत नसल्याने भारत मोठी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यात कुठे तरी कमी पडतो आहे, हे यातून अधोरेखित होते. ‘टी-२०’ विश्वचषकातील पराभवातून खचून न जाता भारतीय संघाने आपली पुढील वाटचाल मालिकेतील निर्भेळ यशाने केली. यामुळे संघाचा आत्मविश्वास बळावणार, हे मात्र नक्की!


 
 
...तरच चिंता मिटेल


 
आॅस्ट्रेलियामध्ये २०२२ साली होणार्‍या आगामी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेसाठी एक उत्तम आणि भक्कम संघ उभारणे हे भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मुख्य आव्हान आहेत. यादृष्टीने तशी तयारीही करण्यात आली असून भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड आणि ‘टी-२०’ संघासाठी कर्णधार म्हणून रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताकडे सलामीचे फलंदाज, यष्टीरक्षक, तेज गोलंदाज, फिरकीपटू यांसाठी अनेक खेळाडूंचे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, चिंता आहे ती मधल्या फळीत फलंदाजांना उत्तम कामगिरी करण्यात येत असलेल्या अपयशाची. चिंतेचे कारणही साहजिक आहे. सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर खेळ सावरण्यासाठी मधल्या फळीतील फलंदाजांनी उत्तम कामगिरी करणे महत्त्वाचे असते. केवळ हेच नाही, तर मोठ्या धावसंख्येच्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी चांगले ‘फिनिशर’ खेळाडू संघात असायला हवेत. भारतीय संघाकडे एकेकाळी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, तडाखेबाज फलंदाज म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग यांसारखे खेळाडू संघात होते. आपल्या नावलौकिकाप्रमाणे आतापर्यंत अनेक सामने या खेळाडूंनी भारतीय संघाला जिंकून दिल्याचा इतिहास आहे. हे दोन्ही खेळाडू आता संघात नाहीत. तशा उत्तम खेळाडूंचे पर्याय जर उपलब्ध झाले, तर भारतीय संघ आणखीन मजबूत होईल, यात शंका नाही. यांसारख्या खेळाडूंना पर्याय शोधण्याचे प्रयत्नही भारताचे सुरू आहेत. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाने अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरला संघात स्थान दिले. व्यंकटेश अय्यर हा डावखुरा फलंदाज असून मध्यम गतीने गोलंदाजी करण्याचीही त्याची क्षमता आहे. व्यंकटेश अय्यरकडून येत्या काळात उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. याआधी भारताने हार्दिक पांड्या, विजय शंकर, शिवम दुबे यांसारख्या खेळाडूंना संधी दिली होती. या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. परंतु, याचे सातत्य त्यांना राखता आले नाही. त्यामुळे टप्प्याटप्पाने या खेळाडूंना संघाबाहेर व्हावे लागले. आता या जागी नव्या खेळाडूंना संधी मिळत आहे. या संधीचा खेळाडूंनी फायदा घेणे गरजेचे आहे. या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्यास भारतीय संघाचे नवे प्रयोग यशस्वी ठरतील आणि संघ व्यवस्थापनापुढील चिंता मिटेल, यात शंका नाही.






- रामचंद्र नाईक






@@AUTHORINFO_V1@@