होमियोपॅथीचा जागतिक प्रसार

    दिनांक  23-Nov-2021 13:16:48
|

homeopathy.jpg_1 &nb

होमियोपॅथीचा शोध लागून जरी २३० वर्षांचा कालावधी लोटला असला, तरी गेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये याविषयी विविध संशोधनात्मक प्रबंध मांडले गेले. हे वैज्ञानिक प्रबंध होमियोपॅथीच्या औषधांच्या उपयुक्ततेबद्दल मांडले गेले व या सर्वांमध्ये होमियोपॅथीची औषधे सरस असून परिणामकारक आहेत, असा निष्कर्षही काढण्यात आला. ‘आयआयटी मुंबई’च्या टीमनेही डॉ. बेल्लारेंच्या बरोबर संशोधन करून हे सिद्ध केली की, ‘होमियोपॅथी नॅनो टेक्नॉलॉजी’वर कार्यरत आहे.सध्या होमियोपॅथीचा समावेश अनेक देशांनी आपल्या राष्ट्रीय आरोग्य प्रणालीत केला आहे.
‘जागतिक आरोग्य संघटने’च्या माहितीनुसार, जेव्हा २००१ मध्ये चाचणी केली तेव्हा ७३ देशांनी आपल्या राष्ट्रीय आरोग्य प्रणालीत होमियोपॅथीला स्थान दिले.काही टीकाकारांच्या मते, होमियोपॅथी ही फक्त अशिक्षित माणसांकडून वापरली जाते, असे होते. परंतु, जेव्हा ‘वेस्टर्न जर्नल ऑफ मेडिसीन’ने जगभरात केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, होमियोपॅथीकडे वळलेली माणसे ही जास्त सुशिक्षित व प्रगल्भ असतात.
 
 
‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या मते, होमियोपॅथी वापरणार्‍या लोकांमध्ये वाढ होऊन इंग्लंडमध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोक होमियोपॅथी वापरतात. फ्रान्समध्ये झालेल्या सर्वेक्षणात असे लक्षात आले की, जवळजवळ २५ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक होमियोपॅथीची औषधे वापरतात व जवळजवळ २० हजारांपेक्षा जास्त फार्मसी होमियोपॅथीच्या औषधांची विक्री करतात.होमियोपॅथी युरोप व आशियामध्ये खूपच लोकप्रिय आहे. तसेच, आखाती देशात व काही मुस्लीमबहुल देशांमध्येही होमियोपॅथीचे महत्त्व तेथील लोकांना पटू लागले आहे.‘युएई’सारख्या देशातही होमियोपॅथिक औषध व ‘प्रॅक्टिस’ला सरकारने परवानगीदिली आहे. तसेच इराण, मलेशिया यांसारख्या देशांतही होमियोपॅथिक डॉक्टरांची संख्या वाढत आहे, असे निदर्शनास आले आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेनेसुद्धा आपल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात होमियोपॅथीला स्थान दिले आहे. भारतातही आयुष मंत्रालय स्थापन झाल्यापासून होमियोपॅथीसाठी काही प्रमाणात का होईना, परंतु स्वतंत्र व्यासपीठ तयार झालेलेआहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होमियोपॅथीसाठी दालने खुली केली आहे.


‘जागतिक आरोग्य संघटने’च्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, गावातील लोकांना जिथे पारंपरिक औषधे व सुविधा उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणी होमियोपॅथिक औषधांचा फार मोठा दिलासा व उपयोग या लोकांना होतो. अमेरिकेसारख्या देशात पूर्वी होमियोपॅथीला फार उत्तम प्रतिसाद होता. मध्यंतरीच्या काळात राजकारणी व ‘फार्मा लॉबी’ने होमियोपॅथीवर कडक निर्बंध घातले, तरीही होमियोपॅथी अमेरिकेत रुजलेली असल्याने आता हळूहळू अमेरिकेतही होमियोपॅथी वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण जगाला आता होमियोपॅथीचे महत्त्व पटायला लागले आहे व काही वर्षांतच होमियोपॅथी हा लोकांचा ‘फर्स्ट चॉईस’ असणार आहे.


- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.