पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेशनीतीचे लोकशाहीकरण केले : डॉ. चौथाईवाले

सा. ‘विवेक’च्या ‘राष्ट्रजागरण व्याख्यानमाला भाग-२’चा समारोप

    दिनांक  20-Nov-2021 15:06:18
|
Pravin Darekar _1 &n
 
 
 
मुंबई : “विदेशनीती ही केवळ विदेश मंत्रालयाची नीती नसून संपूर्ण सरकारची व सामान्य जनतेचीही नीती आहे, हे सूत्र पंतप्रधान मोदी यांनी मांडले. त्यामुळे विदेशनीतीचे लोकशाहीकरण झाले असून हे मोदींच्या विदेशनीतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे,” असे प्रतिपादन भाजपचे परराष्ट्र विभाग प्रमुख डॉ. विजय चौथाईवाले यांनी केले. सा. ‘विवेक’च्या ‘राष्ट्रजागरण व्याख्यानमाला भाग-2’च्या समारोप सत्रात ते बोलत होते.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीवर आधारित ‘लोकनेता ते विश्वनेता’ हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत असून यानिमित्त राष्ट्रजागरण व्याख्यानमाला या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन ‘विवेक’च्या ‘फेसबुक पेज’ व ‘युट्यूब’ चॅनेलवर करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या दुसर्‍या भागात स्वामी गोविंददेवगिरी, नितीन गोखले, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, आशिष चौहान आदींची व्याख्याने संपन्न आली व समारोप डॉ. विजय चौथाईवाले यांच्या व्याख्यानाने झाला. या संपूर्ण व्याख्यानमालेचे सर्व व्हिडिओ ‘विवेक’च्या ‘फेसबुक’ पेज व ‘युट्यूब चॅनेल’वर उपलब्ध आहेत. आपल्या समारोप सत्रात डॉ. चौथाईवाले म्हणाले की, “भारताचे हित जिथे आहे अशा सर्व व्यासपीठांशी, संस्था-संघटनांशी भले त्या परस्परविरोधी असल्या तरीही संबंध निर्माण करण्याला मोदी यांनी महत्त्व दिले आहे.
 
 
 
“विदेशनीती ही केवळ विदेश मंत्रालयाची नीती नसून संपूर्ण सरकारची व सामान्य जनतेचीही नीती आहे, हे सूत्र पंतप्रधान मोदी यांनी मांडले. त्यामुळे विदेशनीतीचे लोकशाहीकरण झाले असून हे मोदींच्या विदेशनीतीचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे डॉ. चौथाईवाले म्हणाले. आजवर जागतिक राजकारणात भारताला एकतर गृहीत धरले जाई अथवा दुर्लक्षित केले जाई. मोदींच्या कार्यकाळात जगाचा भारताबद्दलचा दृष्टिकोन बदलला असून आज भारत काय निर्णय घेतो, याकडे जगाचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
 
आज जगात भारताची भूमिका निर्णायक!
 
 
आज अनेक मुद्द्यांवर भारत जगाचे नेतृत्व करत असून जगाचा अजेंडा निश्चित करत असल्याचे डॉ. चौथाईवाले यांनी सांगितले. यामध्ये काळा पैसा, दहशतवाद, तापमानवाढ आदी समस्या असतील किंवा सौरऊर्जेसारखे विषय असतील. प्रत्येक बाबतीत भारताची भूमिका निर्णायक ठरत असून यामुळे अनेक देश आज भारताकडे एक विश्वसनीय सहकारी म्हणून पाहू लागले असल्याचे ते म्हणाले.
 
 
 
मोदींच्या कार्यकाळात भारताची विदेशनीती व देशांतर्गत धोरणे यांमध्ये सुसूत्रता निर्माण झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, “मोदींच्या काळात भारतीय विदेशनीतीला मानवतावादी रूप प्राप्त झाले आहे. यामध्ये योग दिन, आयुर्वेद इत्यादीसोबत ठिकठिकाणी संकटात सापडलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठीही भारताने बरेच मोठे काम केले आहे,” असे डॉ. विजय चौथाईवाले यांनी विविध उदाहरणांसह ठळकपणे नमूद केले.
 
 
 
केवळ 3 वर्षांत कसर भरून काढली!
 
डॉ. चौथाईवाले म्हणाले की, “2014 पूर्वी भारताच्या विदेशनीतीतील मोठी उणीव होती ती म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी अनेक वर्षे अनेक देशांना भेटच दिली नव्हती. उदाहरणार्थ नेपाळमध्ये 17 वर्षे, श्रीलंकेमध्ये 28 वर्षे, ऑस्ट्रेलियामध्ये 28 वर्षे, युएईमध्ये 34 वर्षे व कॅनडामध्ये 42 वर्षे भारतीय पंतप्रधानांनी भेट दिली नव्हती. इस्रायल, मंगोलिया आदी देशांत तर आजवर एकदाही आपले पंतप्रधान गेले नव्हते. ही सर्व कसर मोदींनी पहिल्या तीन वर्षांतच भरून काढली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
 
 
 
‘लोकनेता ते विश्वनेता’ ग्रंथास वाढता प्रतिसाद
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशनीतीचे विविध पैलू उलगडणारा ‘लोकनेता ते विश्वनेता’ हा ग्रंथ प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळवत आहे. महाराष्ट्र राज्यासह देशभरातील विविध ठिकाणांहून या ग्रंथासाठी नोंदणी होत असून सर्व राष्ट्रप्रेमी वाचक, कार्यकर्त्यांनी सा. ‘विवेक’च्या https://www.evivek.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन या ग्रंथाची नोंदणी करण्याचे आवाहन ‘विवेक’द्वारा करण्यात आले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.