श्रीविष्णुसहस्रनाम आणि दिवाळी (भाग-१)

02 Nov 2021 12:41:23

srikrishna_1  H

सोमवारी वसुबारसपासून दीपोत्सवाला प्रारंभ झाला. आज धनत्रयोदशी. तेव्हा दिवाळी आणि सहस्रनामातल्या काही नामांच्या भावार्थाची सांगड घालून परमेश्वराच्या सर्वव्यापक स्वरूपाला शब्दांच्या कोंदणात बसविण्याचा भावपूर्ण प्रयत्न या लेखात केला आहे. आजच्या पहिल्या भागात गोवत्स द्वादशी, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती आणि नरक चतुर्दशी या दिवसांचा समावेश केला आहे. गुरुवार, दि. ४ नोव्हेंबरच्या दुसर्‍या भागात लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजा(अन्नकूट) आणि यमद्वितीया यांचा श्रीविष्णुसहस्रनामातील संदर्भ-संबंध लक्षात घेऊ.

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास आपले रहस्यमय विश्वरूपदर्शन प्रकट करतेवेळी गीतेमध्ये ‘वक्ष्यामि हितकामया (१०:१)’ अशी प्रारंभी ग्वाही देत, “हे माझे विराट स्वरूप कसे हितकारक नि सर्व पापैः प्रमुच्यते असे असून, माझा भक्त समस्त पातकांपासून मुक्त होऊन जातो,” असे आश्वस्त करतात. त्याच प्रकारची प्रस्तावना विष्णुसहस्रनामाचा उपदेश करताना भीष्माचार्यांनी राजा युधिष्ठीरांस निवेदिली. विष्णोनामसहस्रं मे श्रुणु पापभयापहम्। अर्थात, पापांचे भय दूर करणारे सहस्रनाम माझ्याकडून ऐक, अशी सहस्रनामाची सुरुवात झाली आहे.


पापरहित, कल्याणकारक गोष्ट कोणती असा जर सामान्य मनुष्यासाठी विचार केला, तर ऐहिक सुख ही पहिली पायरी आहे. त्यात सण-उत्सव हे सांसारिक जीवनातले स्व, तसेच जनहिताचे अनमोल क्षण मानावयास का नको! कारण, त्यामध्ये भावना भरपूर असून संस्कृती, स्वभाषा, स्वधर्म याचे संस्कार घडत जाऊन राष्ट्रनिर्मितीच्या उभारणीस मोलाची भर पडते.श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र हे परमात्मा परमेश्वराच्या दिव्य ऐश्वर्याची, अपरिमित शक्तीची, अमोघ सामर्थ्याची आणि भक्तांच्या निरंतर कल्याणाची परम मंगल अशी विभूती दर्शन घडवणारी गाथा आहे. सहस्रनामाची महती प्रथम भीष्माचार्यांनी वर्णन करून श्रीवेदव्यासांच्या माध्यमातून महाभारतात समाविष्ट झाली. त्याचे महात्म्य पुढे आद्य श्रीशंकराचार्यांनी ओळखून त्यावर भाष्य लिहिले नि तद्नंतर अनेक आचार्यांनी तसेच आता आतापर्यंत सत्पुरुषांनी त्यावर अनेक पद्धतीने भाष्य रचून ते शिरोधार्य केले.


या सहस्रनामाचा अभ्यास करताना मला हे स्तोत्र वा त्यातील नामांचा आणि भारतीय संस्कृतीचा संबंध नेहमी जाणवत आला. यातील नामे भगवंताच्या गुणैश्वर्याचे प्रकटीकरण असणारे आहेतच. तथापि, ते एक संस्कृती दर्शन घडवणारे आहे.दिवाळी हा सण असाच बहुमोल आशयाने भरलेला. पाच-सहा निरनिराळ्या दिनविशेषांची सांगड या दीपोत्सवात असून त्यात एक सूत्रबद्धता आढळते. विष्णुसहस्रनामाची व्याप्ती इतकी प्रचंड आणि सुंदर आहे की, भगवंताच्या अगाध महिमेचा अंश जिथे तिथे कोंदून भरलेला आहे की, त्याचे दर्शन पाहू तिथे होऊ शकते. आध्यात्मिकाच्या उच्च पातळीवरून शक्य नसले तरी निदान व्यवहारात काही टक्के शक्य तरी आहे.तेव्हा दिवाळी आणि सहस्रनामातल्या काही नामांच्या भावार्थाची सांगड घालून परमेश्वराचे सर्वव्यापक स्वरूपाला शब्दांच्या कोंदणात बसविण्याचा भावपूर्ण प्रयत्न.


अश्विन वद्य द्वादशी अर्थात वसुवारस अथवा गोवत्स द्वादशी. दिवाळसणाची चाहूल या दिवशी लागते. या दिवशी नंदा नामक कामधेनूच्या प्रीत्यर्थ व्रत, पूजन केले जाते. गोवत्स आणि वसू या दोन पदांच्या सहस्रनामाशी निगडित भावार्थांची व्यापकता पाहू.‘गो’ या पदाचा सर्वपरिचित अर्थ गाय. तरी शरीर, पृथ्वी, आकाश, वाणी असेही अर्थ ‘गो’ या पदाचे होतात. भगवान गोपाळकृष्ण आणि गाईंचे नाते किती अतूट आहे, हे भारतीयांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. भारतात गोधनाची महती तर वेदकाळापासून ते आतापर्यंत अविच्छिन्न आहे. गाय हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते, तसेच ती केवळ ऐहिक गोष्ट न राहता एक महत्त्वाची पूजनीय वस्तू म्हणून गौरविले गेले. सुदैवाने ते आजही शिल्लक आहे.अशा गोवत्सल भगवंताचे सहस्रनामांत पहिले नाम येते ते गोविंद (नाम क्र.१८७ ) याचा भावार्थ गाईंचे रक्षण करणारा!



पुढे ५३९ वे नामही गोविंद आले आहे. पण, त्याचे श्रीशंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटले, गोभिर्वाणीभिर्विन्दते की, अर्थात जो वाणीद्वारे जाणला जातो असा! ‘गोविंदा पति’ (१८८ ) या नामाचेही विवरण उत्कृष्ट वाणी ज्यांना प्राप्त झाली आहे, त्यांचाही अधिपती असलेला. सामवेद जो ‘गेय’ प्रकारात धरला जातो, त्यातही भगवंताची विभूती असल्याचे गीतेत वचन आहेच, वेदांना सामवेदोऽस्मि (१०:२२)गोपति (४९५,५९२) गाय, धरणी आणि शरीर यांचा स्वामीही भगवंतच आहे.गोप्ता (४९३,५९३) सगळ्यांचे रक्षण करणारा, तसेच स्वतःच्या मायेने स्वतःस झाकून टाकणारा असाही गुढार्थ प्रकट केला आहे.



गोहित (५९१) गाईंच्या रक्षणार्थ ज्याने गोवर्धन धारण केले तो गो-हितकारीच होय किंवा पृथ्वीची धारणा करणारा तो गोहित. या नामांत वराह अवताराची महती दिसते. प्रजेचा पालनहार हेही रूप पाहायला मिळते. असे हे परमेश्वराचे गो-वत्स प्रजेचे, गाईचे, वासरांचे, पृथ्वीचे भरण पोषण करणारा जड-चैतन्य रूपांत आपले दिव्यलक्षण प्रकट करतो. याच गोवत्स द्वादशीला ‘वसुबारस’ म्हणतात. या ‘वसू’ शब्दाचाही अनेक अर्थाने सहस्रनामावलीत समावेश झाला आहे. ‘वसू’ हे पूर्वपद धरले तर त्याचे अनेकविध अर्थ संस्कृतमध्ये सापडतात. धनसंबंधी, अष्टवसू, कुबेर, सूर्य, इत्यादी बरीच यादी आहे. ‘वसू’ याचा मुख्य अर्थ धन, ऐश्वर्य, संपत्तीस्वरूपात घेतला आहे. ‘वसू’ हे नाम १०४ आणि ६९६ असे दोनदा आले असून, सर्व भूते ज्याच्या ठिकाणी राहतात वा जो सर्वभूतमात्रांमध्ये वसतो, असा अर्थ आहे.



भगवद्गीतेमध्ये भगवान ‘मी वसूना पावकश्चास्मि।’ असे म्हणतात. अष्टवसूंमध्ये अग्नीत आपली विभूती असल्याचे निदर्शन करतात. अग्निशिवाय कुठल्याही प्रकारचा व्यवहार अशक्य आहे हे आपण जाणतोच.त्याला संलग्न असे हे नाम होय.
२७०वे वसू हे नाम जो मायेने झाकून टाकतो म्हणजे जो अंतरिक्षामध्ये वायुरूपात आहे असा. अन्तरिक्षसत् (कठो.उ)
याशिवाय वसुमना (१०५) दिव्य संपत्तीयुक्त, मायाळू, वसुद (२६९) धन देणारा, वसुरेता (६९२) ज्याची शक्ती, वीर्य सुवर्णमय किंवा ऐश्वर्यच ज्याच्यापासून उत्पन्न झाले तो, वसुप्रद (६९३,६९४) विपुल धन देणारा तथा मोक्षरूपी फल देणारा आणि दुष्टांचे हनन करणारा, वसुमनस् (६९७) ज्याचे मन ऐश्वर्ययुक्त की समभावाने राहणारा असा. असे भगवंताचे ‘वसू’ या नामाने विवरण किती कराल तेवढे कमीच होय. आपल्या बुद्धीची मर्यादा आड येईल. पण, तुकोबा म्हणतात तसे, ‘तुझिया पार नाही गुणा’ असेच म्हणावे लागेल.



या तिथीला अजून एक महत्त्व आहे ते भगवान दत्तात्रेयामुळे. दत्तप्रभूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमन दिवस. त्यास ‘गुरुद्वादशी’ म्हणतात. त्या गुरुपदाचाही समावेश सहस्रनामात केला आहे. परमेश्वर हाच अंतिम गुरू तेव्हा शिष्यत्वाचा लाभ त्याच्या लेकरांना का न व्हावा. २०९वे नाम गुरू आहे. आद्य श्रीशंकराचार्यांनी नेमके नि यथार्थ भाष्य केले ते- सर्वविद्यानामुपदेष्टृत्वात्सर्वेषांजनकत्वाद्वा - गुरुः।


म्हणजे, सर्व विद्यांचा जो उपदेशक नि जो सर्व जीवांना ज्ञान देतो तो गुरू होय.


गुरुतम (२१०) जो विद्वानांचाही विद्या शिकवतो, जो ब्रह्मादिक देवांपेक्षाही ज्ञानसंपन्न तो गुरुतम. असे परमेश्वराचे जगद्गुरुस्वरुपात या दिव्य गुणांचे महात्म्य वर्णिले आहे. अतः या गोवत्स, वसुबारसच्या निमित्ताने केवळ गाय-वासरू एवढाच संदर्भ न घेता सहस्रनामाच्या आधारे भगवंताच्या विश्वात्मक लीलेचे नित्य दर्शन होय.आश्विन वद्य त्रयोदशीला, धनत्रयोदशी म्हणून धनाची पूजा करण्याची पद्धत आहे. धनाची पूजा केवळ पैसा किंवा सोनं या स्वरूपात मर्यादित आहे का, तर नाही. ‘धन’ या वस्तूची व्यापकता समजून घ्यायची झाली तर ऋग्वेदातील श्रीसूक्त या प्रसादिक स्तोत्राच्या अभ्यासाला पर्याय नाही. त्यात धन हे लक्ष्मीस्वरूप तर आहेच. तथापि पशुधन, अग्निधन, गोधन, सूर्योधन, तपोधन, विद्याधन, अन्नधन अशा जगातल्या वस्तुमात्रांचा ‘संपत्ती’ या अर्थाने गौरव आणि सहेतुक समृद्धीची मागणी केली आहे. पण, ते केवळ भोगवादी याचना नसून, भगवद्कृपेची अभिलाषा आहे. हिंदू धर्म हा केवळ भोगवादी नसून, विषयांचा उपभोग घेऊनही त्यातच गुरफटून न जाता मानवी आयुष्याचे उदात्त ध्येय गाठण्यासाठी त्याग वृत्तीचीही जोपासना करीत आला आहे.


श्रीविष्णुसहस्रनामात धनसंबंधी जे सूक्ष्म विचार केले आहेत आणि भगवंताच्या दैवी ऐश्वर्याच्या प्रकटीकरणास्तव जे नेमके विशेषणे योजले ते संक्षिप्तरीत्या अवलोकन करण्याचा प्रयत्न करू. खरे पाहता, ईश्वराची प्रत्येक कृती ही त्याची अवर्णनीय संपत्तीच होय. तथापि, सहस्रनामातील काही विवक्षित नामे घेऊन त्याचा अर्थ पाहू.हा धनत्रयोदशीचा दिवस व्यापार्‍यांचा व्यवसाय सुरू करण्याची तिथी. सहस्रनामांत भगवंताचे एक नाम ‘व्यवसायो (३८४)’ असे आहे ते सामान्य कुठल्या व्यापाराशी जोडलेले नसून, अखिल जगताचा जो व्याप सांभाळण्यात जो गढून गेला आहे नि शुद्ध ज्ञानाच्या क्रियेतच ज्याचे स्वरूप आहे तो व्यवसायः.धनसंबंधी पहिले नाम माधव आले असून, पुढे अजून दोनदा पुनरुक्ती झाली असली, तरी अर्थात अर्थभेद आहे. (ना.क्र :७२,१६७, ७३५) वेगवेगळे नामार्थ असले तरी ‘माधव’ या नामाचा मुख्य अर्थ ‘लक्ष्मीचा पती तो माधव’ असाच केला आहे.‘श्रीमत्’ (२२,१७८,२२०,६१३) हेही नाम चार वेळा आले आहे. श्री म्हणजे संपत्ती, सौंदर्य, धन हे ज्याच्या जवळ नित्य असते तो ‘श्रीमत्.’ हे ऐश्वर्य साधेसुधे नाही परमेश्वराचे होय, तेव्हा ते दिव्य आहे. अनेक दिव्याभरणम्। (गीता ११:१०) ज्यांचे वैभव प्रचंड तो महर्द्धिः (३५०) श्रीशंकराचार्य म्हणतात - महती ऋद्धिर्विभूतिरस्येति।



दिव्या ऐश्वर्याचा उपभोग घेणारा भगवंत हा ‘महाभाग’ (३७०) म्हणून आकळला जातो. ‘महाधन’ (४३४)  असल्याने धनाची कमतरता असणार का! अंतरिक्षातल्या ग्रह, तारे नि भूमीवरच्या वाळूच्या कणापर्यंत ज्यांची अगणित धन, ते महान हून महान होय. ‘धनानामीश्वर’ असे आचार्य धनेश्वर (४७४)चे वर्णन करतात.सोन्याचे सुंदर बाहुभूषण ज्याने धारण केले आहे तो ‘कनकाङ्गदी’ (५४१) याच अर्थाचे ‘रुचिराङ्गद’ (९४५) हे नाम भक्तांना इच्छित धन देणारा असा ‘द्रविणप्रद’ (५७०) होय. तसेच धन, संपत्ती जिंकणारा तो ‘धनंजयः’ (६६०). ज्याचा वर्ण सोन्यासारखी दिव्य तो ‘सुवर्णवर्ण’ (७३७) होय. तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम्। (गीता ११:१७) ज्याची अंगकांती सुवर्णसमान तो ‘हेमाङ्ग’ (७३८). तसाच तो सुवर्णबिंदू (८००).भगवंताच्या ऐश्वर्याला मोजमाप नाहीच अतः अनन्तश्री (९३३)संपत्ती सौंदर्य याची अधिष्ठात्री देवी लक्ष्मी (९४३) हीसुद्धा परमेश्वरी स्वरूप. तीच आत्मविद्या.परमेश्वराच्या या सगळ्या दिव्य वैभवाचे दर्शन आपल्याच भोवती दिसणार्‍या वस्तुमात्रात पाहू शकलो तरी आपण धन्य धन्य होऊन जाऊ. त्यासाठी भगवंताशी नित्य अनुसंधानाची आवश्यकता आहे नि त्याचीच उणीव असल्याने निदान त्याच्या महतीचा विचार करून काही अंशी त्या तेजाची आरती तरी गाऊ शकतो.


या आश्विन वद्य त्रयोदशीला भगवंताचा १२वा अवतार धन्वंतरी जयंती असते. आयुर्वेदाचा प्रवर्तक. समुद्र मंथनातून या भगवान धन्वंतरीची उत्पत्ती मानतात. परमेश्वराची विभूती असल्याने सहस्रनामात त्याच्या नामाचा, गुणाचा उल्लेख अनिवार्यच. प्रत्यक्ष धन्वंतरी असे नाम नसले तरी गुणवाचक विशेषण आले आहेत.आयुर्वेदाचा महत्त्वपूर्ण प्राचीन चरकसंहिता यात महर्षी चरक यांनी या विष्णुसहस्रनामाच्या महत्तेचे वर्णन करताना म्हटले आहे,


विष्णुं सहस्रमूर्धानं चराचरपतिं विभूम्।
स्तुवन्ननामसहस्रेण ज्वरान् सर्वान् व्यपोहति॥


की, सगळ्या रोग व्याधींसाठी विष्णुसहस्रनाम हे उत्तम औषध होय. एका अर्थाने ‘भयनाशनः’ (८३४).त्या धन्वंतरी स्वरूपात भगवंताचे नाम ‘वैद्य’ (१६४) जो सर्व काही जाणणारा आणि चिकित्सा करणारा, योग्य निदान करणारा नि त्यावर उपाय देणारा तो ‘औषधम्’ (२८७). धन्वंतरी याचे सगळे गुण या एका नामातच येतात. प्रत्यक्ष स्थूलरूपातले औषध म्हणा किंवा परमेश्वराचे नाम-रूप हे रोगांवर रामबाण औषधच आहे.हा भगवंत कसा आहे तर रोगविरहित आणि अर्थातच जो त्रिगुणातीत आहे त्याला रोग किंवा अन्य कुठलीच चांगली किंवा वाईट भावना चिटकू शकतच नाही, म्हणून ‘अनामय’ (६८९) असे नामाभिधान आहे.



धन्वंतरी भगवान त्याच्या विद्येद्वारे जनांचे हित करण्यासाठी हाती अमृत कुंभ घेऊन आहे, यास्तव ‘सत्कृतिः’ (७००) होय.


श्रीतुकाराम महाराज म्हणतात - रोगाऐशा द्याव्या वल्ली। जाणे जाली बाधा ते॥


भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून बंदीत ठेवलेल्या गंधर्वसहित १६ हजार स्त्रिया यांची मुक्तता केली तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. देवांचा हा परमङ्गल (ना. क्र. ६३) विजय (१४७) सगळ्यांनी दिव्यांची शोषणाई करून साजरा केला. जेव्हा धरणीला दुष्ट वृत्तीचा भार सहन करणे अशक्य होते, तेव्हा त्याचा समूळ नाश करणे हे ईश्वराने त्याचे कार्य मानून तो अग्रणी (२१८) नेता (२२१) आपला अवतार प्रकट करत प्रजापति (६९) होत्साता सुष्टांचे रक्षण करतो.


नरक याचा लक्षणार्थ पाहायचा झाला, तर भगवद्गीतेमध्ये आसुरी वृत्तीची संपदा विशद करताना भगवंत म्हणतात,


त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्॥ (१६:२१)


काम, क्रोध व लोभ असे हे तीन प्रकाराचे नरकाचे द्वार असून, ते आत्मविघातक आहे म्हणून या तिहींचा त्याग करावा, अशी स्पष्ट आज्ञा दिली आहे.श्रीविष्णुसहस्रनामात ईश्वरी शक्ती आणि पराक्रमेशी निगडित ५०हून अधिक नामे योजिली आहेत. नरक चतुर्दशीच्या निमित्ताने त्या नामांशी असलेला भगवंताच्या शौर्याची, शस्त्रसज्जतेच्या महतीचे अवलोकन करू.परमेश्वराच्या शूरतेची साक्ष देताना सुरुवातीचे नाम खुद्द ‘विक्रमी’ (ना.क्र ७५) आणि त्याला जोडून ‘विक्रमः’ (७८) असे की, जो पराक्रमी, शौर्ययुक्त नि पराक्रम हेच ज्याचे रूप म्हणून ‘सत्यपराक्रमः’ (२१३) किंवा गरुडावर आरूढ होऊन जो संचार करतो असा. हाच गरुडध्वज (२५४) असून, त्यायोगे असुरांशी युद्ध करताना अत्यंत वेगवान (३७१) होय.आपली सगळी दैवते शस्त्रयुक्त आहेत. त्याचे वर्णन करताना धनुष्याचा उल्लेख वारंवार आला आहे. धन्वी (७६) महेष्वासा (१८१), सुधन्वा (५६७), धनुर्धर (८५७), शार्ङ्गधन्वा (९९६). असा हा विष्णु रणसिद्ध महावीर्य (१७४) महाबल (१७२) आपल्या संपूर्ण महाशक्तिः (१७५) सहित शत्रूपुढे येताच ते घाबरून जात म्हणून भगवंताचे विष्वक्सेन (१२५) हे स्वरूप मानतात नि दुष्टांचा नाश करतो, यास्तव जनार्दन (१२६) ठरतो. सुरारिहा (२०८) हा देवांच्या शत्रूंना जिंकणारा, सहस्रजित (३०६) अनन्तजित (३०७), जितामित्र (५२४), शत्रुघ्न (४१२), शत्रुजित् (८२०), शत्रुतापनः (८१२) असा हा भगवान असुरांचा निःपात करणारा वीरबाहू (४६३) होय.




भगवान विष्णुचे मुख्य शस्त्र गदा आणि चक्र याविषयींही नामांची योजना केली आहे.



चक्रगदाधर (५४६), चक्री (९९५) रथाङ्गपाणि (९९८) गदाधर (९९७) तसेच, परशूचाही उपयोग भगवंतानी केला आहे, त्यासंबंधी खण्डपरशू (५६८) आणि नंदक नावाचे खङ्ग ज्याच्याजवळ आहे तो नन्दकी (९९४) असा महाविष्णु सर्व योद्धांमध्ये श्रेष्ठ सर्वशस्त्रभृतां वरः (७५८) खलनिर्दालनास्तव (गीतेतले वचन) भीमपराक्रम (९४९) करतो. त्या रणप्रियः (६८४) परमेश्वराला शत्रूंचा निंपात करण्यासाठी सर्व तर्‍हेची आयुधे धारण करावी लागतात. म्हणून सहस्रनामातले शेवटचे नाम सर्वप्रहलणायुधः (१०००) असे यथार्थ योजले आहे.भगवंत दुष्टांना भयकृत् (८३३) असला तरी भयापहः (९३५) भय नाहीसे करणारा होऊन स्वस्तिदः स्वस्तिकृत्स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्तिदक्षिणः (श्लो.९६) असे सगळे मांगल्य प्रदान करणारा होय.संपूर्ण सहस्रनाम हेचमुळी भगवंताच्या अतुल (३५५) पराक्रमाची गाथा आहे. परमेश्वराची अगाध लीला, माया, प्रेम, याला एका विषयात साचेबंद करणारे आपण कोणीही नाही. कारण, ते आपल्या शक्ती नि बुद्धीच्या पार आहे. त्याच्या असीम कृपेचा वर्षाव आपण न कुरकुरता अखंड घेत जाऊन त्याची आठवण मात्र सदैव अंतःकरणात जागृत ठेवू, एवढेच आणि तेच भरपूर आहे.




Powered By Sangraha 9.0