अत्त दीप भव...!

02 Nov 2021 13:00:24

lankesh_1  H x



प्रचंड नकारात्मक परिस्थितीमध्येही समाजाची एकता आणि परस्पर संबंध यांची जाण असलेले माधवराव लंकेश्वर यांचे जगणे म्हणजे ‘अत्त दीप भव’ समाजाची एक चुणूक आहे, त्याची केलेली मांडणी...



१९९२ साली महाराष्ट्रात दंगल पेटली. जेजे रुग्णालयात सर्व अधिकारी, कर्मचारी आणि रुग्ण मिळून जवळजवळ २० हजार लोक अडकले. या काळात जेजे रुग्णालयाचे ‘वैद्यकीय अधीक्षक’ म्हणून माधवराव लंकेश्वर यांनी मोठी हिमतीची भूमिका घेतली. त्यांनी कर्मचार्‍यांना सांगितले की, “काहीही झाले तरी आपले कार्य आपण थांबवायचे नाही. रुग्णांची सेवा-उपचार करायचेच. त्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते करण्याची जबाबदारी माझी!” माधव यांनी ही जबाबदारी पार पाडली. या कार्यामुळे माधव यांचा तत्कालीन राज्यपाल सुब्रमण्यम यांनी सत्कारही केला होता. तसेच भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते त्यांना ‘भीमरत्न पुरस्कार’ही मिळाला होता.‘एमबीबीएस’पर्यंत शिक्षण घेतलेले माधवराव हे २९ वर्षे महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. पुढे दहा वर्षे ते मुंबईच्या जेजे रुग्णालयात अधिकारी म्हणून काम करू लागले. ९० च्या दशकात ‘वैद्यकीय अधीक्षक’ म्हणून ते निवृत्त झाले. या पूर्ण काळात त्यांनी केवळ सरकारी सेवा एके सेवा केली नाही, तर समाजाचे संघटनही केले. हे संघटन करत असताना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते समाजाने प्राशन करायलाच हवे, हा बाबासाहेबांचा विचार त्यांनी समाजात रुजवायचा प्रयत्न केला. शैक्षणिक सवलती, आरोग्य सुविधा समाजाला कशा मिळतील, यासाठी माधवरावांनी अहोरात्र मेहनत घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आयुष्य मार्गक्रमण करत समाजासाठी चिंता करणारे आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून माधवरावांना समाजात खूप मान आहे. नवबौद्ध समाज, त्यातही घरची गरिबी त्यातच अकाली हरवलेले पितृछत्रामुळे माधवरावांचे बालपण, किशोरवय आणि तारुण्यही हलाखीतच गेले. पण, माधवरावांच्या आयुष्याचे महत्त्व यातच की, त्यांनी आयुष्याच्या त्रासाचे सगळे हलाहल पचवले आणि समाजसेवेचे समर्पित अमृतच केवळ समाजासमोर मांडले. आज ते ८१ वर्षांचे आहेत. त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेऊया.





काळ होता १९५७ चा. त्यावेळी देशात फ्लूचा प्रभाव होता. सोलापूर-बार्शीच्या श्रीपत पिंपरी गावात तर गोरगरिबांची अन्नान दशा झाली. त्या काळात लालासाहेब लंकेश्वर आणि त्यांची पत्नी साखरबाई मोलमजुरी करत. अखंड प्रामाणिक कष्टामुळे त्यांच्याकडे धान्याची कणगी भरलेली असे. या दुष्काळाच्या आणि रोगराईच्या काळात लालासाहेबांनीही धान्याची कणगी समाजबांधवांसाठी खुली केली. या दाम्पत्यांचा सुपुत्र म्हणजे माधवराव. त्यांचा दहा-बारा वर्षांचा मुलगा माधव याला प्रश्न पडला की, हे धान्य असे वाटत राहिले तर उद्या आपल्या शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये द्यायला धान्य राहणार नाही. तळाला जाणार्‍या कणगीला पाहून माधवने शेवटी लालासाहेबांना प्रश्न विचारला, “अहो दादा, आपण या लोकांना ज्वारी दिली, तर उद्या बोर्डिंगमध्ये काय देणार?” यावर लालासाहेब म्हणाले, “उद्या ना? आज आपले समाजबांधव भुकेने तडफडतात, त्यांना असं तडफडून देऊन आपण जेवायचं का? त्यांना गरज आहे. आज त्यांना देऊया. उद्या पुन्हा सुगी आली तर ते आपल्याला परत देतील आणि जरी नाही दिले तरी मी काय मेलो का?” छोट्या माधवच्या आयुष्यात हा प्रसंग कायम कोरला गेला. माधव वसतिगृहात दाखल झाले आणि आठच दिवसांत बातमी आली की, धनुर्वात होऊन लालासाहेबांचा मृत्यू झाला. मोठे होऊन शिकण्यापेक्षा शिक्षण सोडून मोलमजुरी करावा, असा निर्णय माधव यांनी घेतला. पण, श्रीपती मांजरे सरांनी वसतिगृहातल्या मुलांना पाठवून बळेबळे पुन्हा माधव यांना वसतिगृहात आणले. “संस्थेतर्फे तुझा सगळा खर्च केला जाणार. पण, तू शिक,” हे सांगितले. कोण कुठले मराठा समाजाचे श्रीपती मांजरे गुरुजी. पण, माधव यांनी शिकावे म्हणून त्यांनी आग्रहच धरला. पुढच्या काळातही समाजाच्या स्नेहाचे आणि एकतेचे अनेक अनुभव माधव यांना येतच गेले.





शोषित-वंचित समाजासमोर असलेले अनेक प्रश्न माधव यांनाही भेडसावत होतेच. माधव यांनी संघर्षापेक्षा समन्वय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सविनय कायदेशीर मार्गाने आयुष्यातले हक्क, यश आणि सन्मान मिळवला.वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांना महिन्याला ४० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे. पहिल्या वर्षी त्यांनी ठरवले की, कसेही करून शिक्षण पूर्ण करायचे. शिक्षणाशिवाय मान नाही आणि दादाचे स्वप्न होते की, आपण शिकावे. पण, डोळ्यांसमोर मोलमजुरी करणारी आई उभी राही. मग माधवही दिवसभर चणे-फुटाणे आणि केळी खाऊन राहत. उरलेल्या पैशातून घरी ज्वारीचे पोते भरून देत. पहिल्यांदा त्यांनी जेव्हा ज्वारीचे पोते दिले, तेव्हा त्यांच्या आईच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. कारण, माधव यांच्या वडिलांनी दुष्काळात धान्याची कणगी समाजासाठी खुली केली होती. त्यांच्या मृत्युपश्चात घरी धान्याची कणगी कधी तळातही भरली गेली नाही. या अशा प्रचंड नकारात्मक परिस्थितीमध्ये माधव यांनी ‘एमबीबीएस’पर्यंत शिक्षण घेतले. पुढे त्यांचा विवाह सुमन यांच्याशी झाला. पेशाने नर्स असलेल्या सुमन यांच्या अखंड साथीने माधवरावांनी समाजकार्य आणि आरोग्यक्षेत्रातील सेवाकार्य सुरूच ठेवले. वयोमानाप्रमाणे सध्या घरातूनच ते समाजकार्य समाजजागृती करतात. त्यात काहीही खंड पडला नाही. आपल्या लंकेश्वर आडनावाबद्दल ते सांगतात की, “लंकेश्वर हे गावाचे नाव आहे बरं. आम्ही काही मुद्दाम हे नाव ठेवलेले नाही. समाजात तेढ किंवा अस्वस्थता निर्माण होण्याऐवजी समाजात सुपंथाचा मार्ग प्रशस्त होणे गरजेचे आहे. यासाठी तथागत गौतम बुद्धाच्या शांतीचा आणि करुणेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका संघटित व्हा’चा मूलमंत्र गरजेचा आहे. त्यासाठी काम करणे महत्त्वाचे!” वयाच्या ८१ व्या वर्षी समाजहित चिंतन करणारे असे हे माधवराव लंकेश्वर हे समाजाचे दीपस्तंभच आहेत.





Powered By Sangraha 9.0