तणावाला तोंड देताना...

02 Nov 2021 12:31:13

brain_1  H x W:



तणावाचा पूर्ण अभ्यास, त्याची उत्पत्ती, आपले असलेले स्रोत, नियंत्रणाची योजना आणि मानसिक सक्षमता ही खेळाडूंसारखीच प्रत्येक व्यक्तीस आवश्यक आहे. शेवटी प्रश्न असतो तो आपण तणावाशी झुंजण्यासाठी किती प्रगल्भ आहोत, तयार आहोत.




जेव्हा शरीराला एखाद्या तणावजन्य परिस्थितीत दबावाखाली ठेवलं जातं, तेव्हा शरीरातला हार्मोन्सचा समतोल बिघडतो. केवळ अ‍ॅड्रीनॅलीन नव्हे, तर टेस्टोस्टेरोन, शरीराच्या वाढीचे हार्मोन, ग्लुकोकॉर्टीकॉईड याची पातळी बिघडते. त्यांची निर्मिती कमी होते आणि ते जास्त प्रमाणात बाहेर फेकले जातात. तणाव कुठल्याही प्रकारचा असो, घर बदलण्याचा असो, परीक्षेच्या तयारीचा असो, खूप जास्त प्रमाणात फुटबॉल वा क्रिकेट खेळण्याचा असो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल चिंता वाटण्याचा असो, हार्मोन्सचा समतोल बिघडतोच! मर्यादित पातळीपर्यंत तणाव उपयुक्त आहे, विधायक आहे. त्यामुळे माणूस जागृत होत उत्कट ऊर्जेने तणावाविरुद्ध सामना करतो.खेळाडूसुद्धा उत्तम तयारी करतात. पण, या लक्ष्मणरेषेच्या पलीकडे तणाव वाढला, तर तणाव प्रतिरोधक हार्मोन्स प्रत्यक्षात कमी व्हायला सुरुवात होते. याचा परिणाम माणसाच्या चयापचय क्रियेवर होतो. पेशींच्या वाढीवर, उत्पादनावर व त्यांच्या पुनर्बांधणीवरही याचा परिणाम होतो. यामुळे शेवटी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यासाठी आपल्याला संपूर्ण तणावाचा भार otal stress load) पाहावयास लागतो. खेळाडूंसाठी संपूर्ण तणावाचे सूत्र हे खालीलप्रमाणे आहे.





जीवनशैलीजन्य तणाव + भावनिक तणाव + प्रशिक्षणजन्य तणाव + स्पर्धेचा तणाव = संपूर्ण तणाव जो खेळाडू पूर्णत: निरोगी आणि सक्षम आहे, तो सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक प्रमाणात असलेला तणाव सहन करू शकला पाहिजे. कारण, त्याला वा तिला त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित केले जाते. सचिन तेंडुलकर त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर १९९९ मध्ये केवळ चार दिवसांत विश्वचषक खेळण्यासाठी केनियात परतला होता आणि त्याने आपली विकेट न गमावता वडिलांच्या निधनाचे दु:ख मनात पचवत एक विलक्षण असा भावनिक शतकी खेळ खेळून ‘नॉट आऊट’ राहिला होता. ते भावनामय शतक त्याने आपल्या पित्याला अर्पण केले होते. सगळे जग त्याच्या या पितृप्रेमाने आणि निष्ठेने भारावले होते. त्या निष्ठेत खूप महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे त्यात देशप्रेम आणि देशनिष्ठाही ओतप्रोत भरली होती. पण, शास्त्रीयदृष्ट्या त्याचा संपूर्ण तणावाशी सामोरे जाण्याचा निश्चय जबरदस्त होता. दीपा मलीकने व्हीलचेअरमध्ये आयुष्य घालवत असताना अनेक पदके तर मिळवलीच आणि ‘अर्जुन पुरस्कार’ही मिळवला व पुढे जाऊन सगळ्या भयभीत करणार्‍या आणि नैतिक खच्चीकरण करणार्‍या आव्हानांना भेदत आयुष्यात ज्याक्षणी कोणी काही नवीन करण्याचे आव्हान स्वीकारत नाही, त्यावेळी आपले वय आणि आपली शारीरिक कमतरता विचारात न घेता, केवळ मानसिक ऊर्जेच्या आणि खंबीरपणाच्या जोरावर तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तिने रिओच्या ‘पॅरालिम्पिक’मध्ये उतरून रौप्यपदक मिळवले होते. किंबहुना, ते भारतीय महिलेने मिळवलेले ‘पॅरालिम्पिक’मधील पहिले रौप्यपदक होते. मानसिक क्षमतेच्या बळावर त्यांनी इतिहास रचला. ताणतणाव आहेत म्हणून मागे वळून माघार घ्यायची गरज नाही, हा अत्यंत मौल्यवान संदेश त्यांनी क्रीडाजगताच्या नव्हे, तर ताणतणावाच्या ओझ्याखाली आपली सक्षमता आणि ऊर्जा गमावणार्‍या प्रत्येक माणसाला दिला. त्यांंचे शब्द अनमोल आणि ऊर्जेने भारावलेले आहेत. त्या म्हणाल्या, “मैनें हार नही मानी, मुझे ‘ऑलिम्पिक’ जाना था और मैने थान लिया था की, शॉर्टपूट करना शुरू करुंगी।” आणि नंतर ऐतिहासिक किमया घडली.




संपूर्ण तणावाचे सूत्र खेळाडूंनी अभ्यासणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना तणावाच्या ओझ्याखाली समतोलपणा राखणे जमू शकते. आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की, मध्यम पातळीचा तणाव आपली ऊर्जा आणि तत्परता राखण्यासाठी आवश्यक असतो. एका क्षेत्रात जर अधिक तणाव जाणवत असेल, तर दुसर्‍या क्षेत्रातील कमी तणावाबरोबर आपण योग्य समतोल राखायला शिकलं पाहिजे. घर आणि कार्यालयात अनेक माणसं याचा विधायक अनुभव घेतात.काही लोकांना त्यांचे कार्यालय आरामदायी आणि स्वस्थ जागा वाटते, अगदी काम खूप असले तरीही! उच्चदर्जाच्या खेळाडूंना आपले वैयक्तिक आणि भावनिक तणाव या विशेष दृष्टिकोनातून सांभाळता आले पाहिजेत. तणावात वाहून जाणे सहज शक्य आहे एखाद्या व्यक्तीला. कारण, तणावाचा मनोरा रचण्याची त्यांची प्रवृत्ती असते. तणावाचा उदो उदो करणार्‍या अनेकांची अवस्था बिकट होते, त्यांची परिस्थिती चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूसारखी असते, जेव्हा व्यक्तीने पूर्ण परिस्थितीचा आढावा व्यवस्थित घेतलेला नसतो, त्यांचा अभ्यास, ज्ञान आणि कौशल्य त्या तणावजन्य परिस्थितीशी लढण्यासाठी कमी पडते, तेव्हा ते त्यात अडकतात. म्हणूनच तणावाचा पूर्ण अभ्यास, त्याची उत्पत्ती, आपले असलेले स्रोत, नियंत्रणाची योजना आणि मानसिक सक्षमता ही खेळाडूंसारखीच प्रत्येक व्यक्तीस आवश्यक आहे. शेवटी प्रश्न असतो तो आपण तणावाशी झुंजण्यासाठी किती प्रगल्भ आहोत, तयार आहोत आणि परिवर्तनशील आहोत याचा!


- डॉ. शुभांगी पारकर



 
Powered By Sangraha 9.0