मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, अभिनेत्री कंगना रणौतला हा निर्णय फारसा पटलेला दिसत नाही. 'भीक मागून मिळालेले स्वातंत्र्य' या विधानामुळे विरोधकांच्या टीकेला सामोरे जाणाऱ्या कंगनाने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे कंगना रणौत म्हणाली. तिने इंस्टाग्रामवर लिहिले की, “दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अयोग्य. संसदेत निवडून आलेल्या सरकारऐवजी लोक रस्त्यावर कायदे करू लागल, तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्यांचे अभिनंदन." दुसरीकडे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०४ व्या जंयतीनिमित्त त्यांचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, "जेव्हा देशाची सद्सद्विवेकबुद्धी गाढ झोपेत असते, तेव्हा लाठीमार हाच एकमेव उपाय असतो आणि हुकूमशाही हाच एकमेव उपाय असतो. पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा."
विशेष म्हणजे कंगनाने कृषी कायदा आणण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले होते. तिचे अनेकदा सोशल मीडियावर दिलजीत दोसांझसारख्या इतर विरोधक व्यक्तींसोबत वाद झाले होते . शेतकर्यांना पाठिंबा दर्शवणारी पॉप स्टार रिहानाबद्दलही तिने ट्विट केले. कंगना म्हणाली होती की, “रिहाना एक पोर्न सिंगर आहे, ती मोझार्ट नाही आणि तिला शास्त्रीय ज्ञानही नाही. तिला विशेष आवाज नाही. १० प्रसिद्ध शास्त्रीय गायक एकत्र बसले तर ते म्हणतील की तिला गाणे देखील माहित नाही. अमेरिकन संस्कृतीत, किम कार्दशियन सारखे लोक, ज्यांन करियर नाही, ते तिचे प्रतीक आहेत. ते काय करतात हे कोणालाच माहीत नाही. हे भांडवलशाहीचे रॅकेट आहे जे तरुणांची दिशाभूल करत आहे. त्याचप्रमाणे रिहाना ही खरी कलाकार नसून ती पॉर्न सिंगर आहे. जेव्हा तुमच्यात प्रतिभा असते, तेव्हा तुम्हाला दुसरे काही करण्याची गरज नसते." हे टि्वच केल्यानंतर लगेचच कंगनावर ट्विटरवरून बंदी घालण्यात आली.