आज जगात भारत व मोदी हे दोन ‘ब्रॅण्ड’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2021
Total Views |

Ashish Chauhan _1 &n

 
 
 
मुंबई : सा. ‘विवेक’च्या या ग्रंथात नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले ’लोकनेता ते विश्वनेता’ हे बिरुद अतिशय योग्य व स्वाभाविक आहे. आज भारत व नरेंद्र मोदी हे दोन ब्रॅण्ड जगात पोहोचले असून ते एकमेकांना पूरक, पोषक असल्याचे प्रतिपादन ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनी केले. सा. ‘विवेक’च्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत ते बोलत होते.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीवर आधारित सा. ‘विवेक’च्या ’लोकनेता ते विश्वनेता’ या ग्रंथानिमित्त आयोजित ‘राष्ट्रजागरण व्याख्यानमाले’च्या चौथ्या सत्रात आशिष चौहान यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थनीतीबाबत आपले विचार मांडले. यावेळी ते म्हणाले, “गेल्या सात वर्षांत भारतात अभूतपूर्व असे परिवर्तन झाले आहे. मोदी पंतप्रधानपदी आले तेव्हा त्यांच्याबाबत तीन शंका घेतल्या गेल्या. त्या म्हणजे, अर्थकारण, विदेशनीती आणि संरक्षण या तीन विषयांचा अनुभव मोदींना नाही. मात्र, मोदींनी या कार्यकाळात या तीनही शंका खोट्या ठरवत उत्तम कामगिरी करून दाखवली,” अशा शब्दांत त्यांनी मोदी यांची प्रशंसा केली.
 
 
 
चौहान पुढे म्हणाले की, “गेल्या ७५ वर्षांत आपण चुकीचे मित्र बनवले. चुकीच्या बाजूला गेलो. त्यातून आपला विकास खुंटला. मात्र, मागील सात वर्षांत भारताने आत्मविश्वास प्राप्त केला आहे व जगात भारताबद्दल विश्वास निर्माण केला आहे. आज भारत ’विश्वगुरू’ म्हणून उदयास येत आहे. गेल्या दोन वर्षांत ‘कोविड’ काळात भारताने पुढे येत जगाला मदत केली आहे. जग हतबद्ध, निराश झालेले असताना भारताने जबाबदारी घेत जगाला वैद्यकीय साहाय्य पुरवले. एकीकडे शेजारी देश चीन बेजबाबदार वर्तन करत असताना भारताने जबाबदारी घेऊन जगाला केलेल्या मदतीमुळे भारताची प्रतिमा उंचावली आहे,” असे आशिष चौहान यांनी नमूद केले.
 
 
 
धोरणाच्या अंमलबजावणीस प्राधान्य
 
 
मोदींनी आपल्या कार्यकाळात करून दाखवलेल्या गोष्टी, घेतलेले निर्णय हे अभूतपूर्व असून खूप कमी नेत्यांमध्ये अशी हिंमत आढळत असल्याचे चौहान यावेळी म्हणाले. मोदी सरकारने केवळ धोरण आखून स्वस्थ न बसता त्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले, त्यामुळेच हे सरकार यशस्वी ठरल्याचेही मत त्यांनी नोंदवले. आज भारतात प्रचंड वाढलेली ‘मोबाईल बँकिंग’मुळे भारत ’फिनटेक’मधील विश्वगुरू बनला आहे. आज शेतकरी, मजूर, मनरेगा मजूर, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आदी सर्वांना थेट बँक खात्यात पैसे पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
आज भारत जगातील सर्वात ’युवा’ देश असून तो तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती करतो आहे. त्यामुळे आज भारत आज तिसर्‍या देशातील देश राहिलेला नाही. आज भारताची तुलना सुदान वा अंगोलाशी होत नसून अमेरिकेशी होते असल्याचे चौहान म्हणाले. मोदींच्या कार्यकाळात भारत व भारतीयांच्या अपेक्षा अशाप्रकारे उंचावल्या आहेत. भारताला कुणीही रोखू शकत नाही. हे भारत व संपूर्ण जगाने आज मान्य केले असल्याची भावना आशिष चौहान यांनी यावेळी व्यक्त केली.



 


 
@@AUTHORINFO_V1@@