पुणे लोहगाव विमानतळावर १ डिसेंबर पासून २४ तास विमानसेवा

    दिनांक  19-Nov-2021 23:35:19
|

Pune airport_1  
 
 
 

पुणे : पुणे लोहगाव विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीचे काम आता पूर्ण झाल्यामुळे १ डिसेंबर पासून पुणे लोहगाव विमानतळावरून २४ तास विमानवाहतूक सेवा सुरु राहणार आहे. पुणे विमानतळावरून १ डिसेंबर पासून २४ तास सेवा सुरु होणार असल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय देखील दूर होण्यास मदत होणार आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी पुणे विमानतळ प्रशासनाने २६ ऑक्टोबर २०२० पासून रात्रीची उड्डाण बंद केली होती. सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासातच पुणे विमानतळावरून वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. रात्री ८ ते सकाळी ८ पुणे विमानतळावरची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यानंतर पुणे विमानतळ प्रशासनाने १६ ते २९ ऑक्टोबर २०२१ दरम्यान विमानतळ दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. या ऑक्टोबर मधील १४ दिवसात विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले होते. त्यानंतर लगेच रन वे लायटिंगचे काम सुरू करण्यात आले. आता हेही काम पूर्ण झाल्यामुळे पुणे विमानतळ पूर्वी प्रमाणे २४ तास कार्यरत राहणार आहे. सध्या पुणे विमानतळावरून रोज ६३ विमान उड्डाण घेतात मात्र आता पुणे विमानतळाचे 'विंटर शेड्युल' सुरु होणार आहे . त्यामुळे पुणे विमानतळावरून रोज उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या दुप्पट होणार आहे. तसेच १ डिसेंबर पासून पुणे विमानतळावरून अमृतसर, कोयम्बबत्तुर आणि तिरुवनंतपूरम येथे नव्याने विमान उड्डाण सेवेस सुरुवात होणार आहे. या बाबत पुणे लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले कि, '' सध्या रोज ६३ विमान पुणे विमानतळावरून उड्डाण घेत आहेत मात्र १ डिसेंबर पासून २४ तास विमान सेवा सुरु होणार असल्याने आणि पुणे विमानतळाचे विंटर श्येड्युल पण सुरु होणार असल्याने विमान प्रवासी संख्येत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे''.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.