राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकासह, ३२ जणांना अटक

17 Nov 2021 13:20:18

News _1  H x W:
 
 
नाशिक, दि. १६ (प्रतिनिधी): त्रिपुरात घडलेल्या कथित घटनांच्या निषेधार्थ मालेगाव येथे पुकारलेल्या ‘बंद’दरम्यान झालेल्या दंगलप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३२ वर गेली असून सात संशयित आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले मात्र आता जनता दलात असलेले नगरसेवक यांच्यावरदेखील अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अजूनही अटकसत्र सुरूच असून त्यामुळे संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 
 
‘रझा अकादमी’ आणि ‘ऑल इंडिया सुन्नी-जमेतुल-उलेमा-वा’सह विविध संघटनांनी शुक्रवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी मालेगाव येथे बंद पाळला होता. यादरम्यान, सायंकाळी नवीन बसस्थानक ते दूधबाजारादरम्यान दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर दंगल आटोक्यात आणत तत्काळ गुन्हे नोंदवित तपासाला गती दिली. ‘सीसीटीव्ही’ फुटेज, ‘मोबाईल व्हिडिओ क्लिप’ आदी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांची ओळख पटवत धरपकड सुरू केली होती. प्रारंभी पाच गुन्हे नोंदविण्यात आले होते. ती संख्या आता वाढत आहे.
 
 
चित्रफीत बनवून धार्मिक भावना भडविल्याप्रकरणी नगरसेवक अन्सारी अयाज अहमद मोहम्मद सुलतान उर्फ हलचल (४४) याच्यासह चौघांविरोधात आझादनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवित अटकेची कारवाई केली आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. ती चित्रफीत प्रसारित करून चिथावणी देणार्‍या तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक रत्नपारखी यांनी सांगितले. दरम्यान, विविध गुन्ह्यांखाली ज्ञात-अज्ञात शेकडो दंगलखोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील २२ जणांना रविवारी अटक होऊन संबंधितांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
 
 
 
अटक झालेल्यांमध्ये काही आजी-माजी नगरसेवकांसह काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांचा समावेश असल्याचे समजते. सहा पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत. शहर पोलीस अधीक्षक लता दोंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यांच्या फिर्यादीवरून अज्जू लसणवाला, फारुख काल्या, तौसिफ शेख मुसा, नाविद शेख, जाहीद कच्छी याच्यासह इतर दंगेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे जखमी झालेले पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 
 
 
आयोजकांसह राजकीय पदाधिकारी रडारवर ‘मालेगाव बंद’ची हाक देणाच्या संघटनांशी निगडित आणि ‘बंद’मध्ये मोर्चा काढणार्‍यांविरोधातही कारवाईचा फास टाकण्यात आला आहे. यामुळे आयोजकांसह राजकीय पदाधिकारी चौकशीच्या रडारवर आल्याने अनेक जण भूमिगत झाले आहेत. जनता दलाचे नगरसेवक मुस्तकीम डिग्रीटी, ‘रझा अकादमी’चे अध्यक्ष डॉ. रईस रिझवी, सलीम रिझवी, ‘पॉवरलूम अ‍ॅक्शन कमिटी’चे युसूफ इलियास यांच्यावरही खुनाचा प्रयत्न, दंगल, दुखापत आणि सरकारी नोकरावर हल्ले या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.
 
 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आजवर एकूण ३२ जणांना अटक झाली असून सात संशयित आहेत. या सात संशयितांमध्ये चार नगरसेवक असून त्यापैकी एकाला अटक केलेली असून तीन नगरसेवक फरार असल्याचे समजले. सामाजिक कार्यकर्त्यांवरही हल्ला दंगल सुरू असताना घटनास्थळ परिसरात सामाजिक कार्यकर्ते अन्वर खान इस्माईल खान यांच्यावरही जमावाने हल्ला केला होता. पोलीस मित्र असल्याच्या रागातून फारुख काल्या उर्फ फारुख मेंबर, तौसिफ शेख मुसा, नवीन शेख, इब्राहिम शेख मोडवाला, दानिशसह इतरांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
 
 
‘बंद’चे आवाहन करणाराही गुन्हेगार ‘मालेगाव बंद’ची दवंडी पिटणार्‍या रहिम अब्दुल रशिद उर्फ पुकारेवाला जहीर शेख (रा. गांधी मार्केट) याच्यावरही आझादनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. घटनेच्या एकदिवस आधी अब्दुलने गांधी मार्केट परिसरातील दुकानदारांना त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने सामाजिक एकोप्याला बाधा पोहोचविणारे वक्तव्य केले होते. त्यासंबंधीचा ‘व्हिडिओ व्हायरल’ झाला होता.
 
 

काश्मीरसारखीच अस्वस्थता मालेगावात!
काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द होऊन तेथील परिस्थिती सामान्य झालेली आहे. मात्र, तरीही मालेगावच्या आमदारांना काश्मीरसारखीच अस्वस्थता मालेगावात असल्याचा भास होत आहे का, असा सवाल त्यांच्या भूमिकेमुळे उपस्थित करण्यात येत आहे. शहराचे ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले, “मालेगाव काय काश्मीर आहे काय? इथे मध्यरात्री येऊन पोलीस दार ठोठावतात. लोकांना अटक करून नेतात.”



Powered By Sangraha 9.0