‘शिवकल्याण राजा’मधल्या दोन ओळी बाबासाहेबांचे जीवनच विषद करणार्या आहेत. ‘हृदयस्थ झाला नारायण... प्रेरणा केली...’ लता मंगेशकरांनी गायलेले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताने समृद्ध झालेले हे शिवकल्याण राजा पद. शिवछत्रपती नावाचा नारायण बाबासाहेबांच्या ठायी हृदयस्थ झाला होता. तहहयात तो त्यांना प्रेरणा देत राहिला.
वह कैसा था भक्त स्वयं भगवान बन गया।
कुंभकार की कृती होकर निर्माण बन गया॥
अटल बिहारी वाजपेयी यांची ही कविताच कदाचित शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या योगदानाला न्याय देऊ शकेल. वयाची शंभरी पूर्ण करून ज्या समाजाने त्यांना इतके भरभरून दिले, त्या समाजातच वावरत, लोकांना भेटत, बोलत आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दिवस आजारात काढून बाबासाहेब वैकुंठाच्या यात्रेला निघून गेले. शब्द, वाक्य, लय त्याला अभ्यास आणि सातत्याची जोड देऊन बाबासाहेबांनी जे केले, त्याला शाहिरीच्या इतिहासात तोड नाही. शाहिराचे काम प्रेरणा देण्याचे आणि बाबासाहेबांनी ते पुरेपूर केले. छत्रपती शिवाजी महाराज हा त्यांचा देव. त्यांच्याच काव्यमय नादात सांगायचे तर हा देव मस्तकी धरून त्यांनी हलकल्लोळ माजविला. किती वर्ष? कुणालाच आठवत नाही. छत्रपतींचे संपूर्ण आयुष्य, त्यातला संघर्ष, त्यातले नाट्य आणि त्यातले सार्वभौमत्व शिवशाहिरांनी नुसते मांडले नाही, तर ते जगून दाखविले. खरेतर कलाकार हा अर्थोअर्थी परावलंबी. तो समाजावर आणि अन्य व्यवस्थांवर अवलंबून असतो. मात्र, बाबासाहेबांनी हे अवलंबित्व आपल्या दैवताप्रमाणेच झुगारून दिले आणि ‘जाणता राजा’सारख्या कलाकृतीतून एक शाश्वत ‘शिवसृष्टी’ उभी केली. बाबासाहेब स्वत:ला ‘शाहीर’ म्हणायचे. पुलंच्या शब्दात सांगायचे, तर ते ‘खेळिया’ होते!
‘जाणता राजा’सारखे महानाट्य असू शकते आणि ते खरोखरच वास्तवात उतरू शकते, याची कल्पना कुणीही करू शकले नाही. ‘जाणता राजा’च्या यशानंतर तसे अन्य अनेक प्रयोग झाले, पण ते जमले नाहीत. याचे कारण त्यातल्या कुणाकडेही बाबासाहेब पुरंदरेंसारखी प्रेरणा आणि झपाटलेपण नव्हते. वयाच्या शंभराव्या वर्षीही बाबासाहेब लोकांना भेटत होते. इतिहास सांगत होते. नव्यांना प्रेरणा देत होते, तर जुन्यांना चेतवत होते. बाबासाहेबांच्या आधी शिवचरित्र कुणी सांगितले नाही, असे मुळीच नाही. विचार करणार्या, इतिहास लिहिणार्या, कितीतरी लोकांना छत्रपतींच्या जीवनाने वेड लावले. पण, हे चरित्र इतक्या चैतन्याने महाराष्ट्राच्या गावागावांत नेण्याचे काम बाबासाहेबांनी केले. गांधींचा चरखा आणि संघाची शाखा यात जशी समाजाला स्वत:मध्ये जोडण्याची एक विलक्षण हातोटी होती, ते सत्त्व बाबासाहेबांच्या ‘शिवचरित्र’ कथनात होते. बाबासाहेब कलावंत होते, तशीच त्यांची स्वत:विषयीची कल्पना होती. लोकांनी त्यांच्यात नाना रूपे शोधली, बिरूदावल्या लावल्या, पण ते शेवटपर्यंत स्वत:ला ‘शाहीर’च मानत होते. आपल्या दैवताचे चरित्र सांगण्याकरिता त्या काळात उपलब्ध असलेले सगळे माध्यम प्रकार त्यांनी ताकदीने हाताळले. प्रकाशन, व्याख्याने, मुलाखती, दौरे, मोहिमा, त्यांनी काहीच वर्ज्य मानले नाही. ‘जाणता राजा’चा नाट्यप्रयोग हा या सगळ्याचा कळसाध्याय होता. हिंदूपदपातशाहीची निर्मिती करणारा शिवराज्याभिषेकाचा क्षण ‘जाणता राजा’ या नाट्यातला सर्वोच्च बिंदू. तो भव्य सोहळा पाहताना आणि ‘श्री शिव छत्रपती झाले...’ या मंगलमयी गाण्याचे सूर कानावर पडतात. आनंदाश्रूंशिवाय कुठलाही अन्य भाव प्रकट होत नाही. उर अभिमानाने भरून येतो.
बाबासाहेबांनी लेखनही विपुल केले. प्रकाशनही केले. सूर्य-चंद्राच्या साक्षीने उभा असलेला सात सोंडेचा अलंकारित ऐरावत ‘पुरंदरे प्रकाशना’चे बोधचिन्ह. ‘शिवचरित्र’ सांगण्याचे काम करत असताना या वाटेत काटे आलेच नाहीत, असे मुळीच नाही. केवळ शिवरायांच्या जातीत जन्मल्यामुळे ‘शिवरायांचे पाईक’ म्हणविणार्यांनी बाबासाहेबांवर घाणेरडे आरोपही तितकेच केले. मात्र, ‘शिवचरित्र’ सांगण्याच्या मोहिमेवर निघालेला हा ऐरावत या मंडळींच्या भुंकण्याने थबकला नाही, थांबला तर मुळीच नाही! बाबासाहेब आपले कार्य करीतच राहिले, ‘शिवचरित्र’ मांडतच राहिले. या सगळ्यामागे छत्रपतींचे अधिष्ठान तर होतेच, पण एका कृतिशील कार्यकर्त्याचा पिंडही त्यांनी जोपासला होता. बाबासाहेब बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यातूनच त्यांच्यातील कार्यकर्ता घडला आणि दादरा-नगर हवेलीच्या मुक्तीलढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेत इतिहास घडवला. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरी दादरा-नगर हवेलीवर पोर्तुगीजांचाच अंमल होता. पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा-नगर हवेली मुक्तीसाठी लढणार्या बहुतांश संघ स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या तुकडीचा बाबासाहेब भाग झाले. बाबासाहेबांनी संघ सहकार्यांच्या बरोबरीने आधुनिक आणि पारंपरिक शस्त्रास्त्रांसह पोर्तुगीज सत्तेवर हल्ला केलाच, पण १५ दिवसांपर्यंत चाललेल्या दादरा-नगर हवेलीच्या स्वातंत्र्यसंग्रामात उतरलेल्या सव्वाशेहून अधिक तरुणांना एकत्र ठेवण्याचे कार्यही त्यांच्या शिवचरित्र कथनानेच केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कथन करतानाच बाबासाहेबांनी ‘शिवसृष्टी’ साकारण्यासाठी अखंड परिश्रम घेतले. तत्पूर्वी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या त्रिशताब्दीनिमित्त १९७४ साली मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांनी अस्थायी स्वरुपाची शिवसृष्टी साकारली होती. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात स्थायी ‘शिवसृष्टी’ साकारण्याची सूचना केली आणि बाबासाहेबांनी महाराष्ट्रासह देशातील तमाम जनतेला शिवकार्य व शिवकाळाचा अनुभव करुन देण्याचा ध्यास घेतला. ‘जाणता राजा’ महानाट्याच्या प्रयोगातून येणारा निधी ‘शिवसृष्टी’साठी जमा होऊ लागला. पुणे जिल्ह्यातील नर्हे-आंबेगावमध्ये ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ने सशुल्क २१ एकर जागा घेतली व शिवकार्य आणि शिवकाळ साकारणे सुरू झाले. ‘शिवसृष्टी’त ३५० वर्षांपूर्वी शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेले विविध प्रसंग शिल्प, प्रतिकृतींच्या रुपात साकारण्याबरोबरच महाराजांच्या जीवनातील अनेक घटना-घडामोडी ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’च्या माध्यमातून रंगमंचावर अवतरणार आहेत. ‘शिवसृष्टी’ केवळ पर्यटन केंद्र न होता प्रेरणा केंद्र, संस्कार केंद्र व्हावे, ही बाबासाहेबांची संकल्पना होती आणि लवकरच ती प्रत्यक्षातही येईल. पण, त्याआधीच शिवरायांच्या गडकोटांचे वारकरी बाबासाहेब शिवछत्रपतीरुपी विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाले.
‘शिवकल्याण राजा’मधल्या दोन ओळी बाबासाहेबांचे जीवनच विशद करणार्या आहेत. ‘हृदयस्थ झाला नारायण... प्रेरणा केली,’ लता मंगेशकरांनी गायलेले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताने समृद्ध झालेले हे शिवकल्याण राजा पद. शिवछत्रपती नावाचा नारायण बाबासाहेबांच्या ठायी हृदयस्थ झाला होता. तहहयात तो त्यांना प्रेरणा देत राहिला. भारतमातेच्या या सुपुत्राला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.