
पुणे : पुणे-मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. पुण्यात याची तयारी महानगरपालिका प्रशासनाने सुरु केली असून; पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून सुरु आहे. या नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यन्त कच्चा आराखडा पूर्ण करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग राहणार आहे. म्हणजेच एका प्रभागातून ३ नगरसेवक निवडून येणार आहेत.कोरोना महामारीमुळे जनगणना होऊ शकलेली नाही.
त्यामुळे या मनपाच्या निवडणुकीसाठी २०११ चीच लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. राज्य सरकारने या १० वर्षांत लोकसंख्या वाढल्याने कायद्यात बदल करून सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे महापालिकेची सदस्यसंख्या १६१ वरून १७३ इतकी निश्चित केली गेली आहे. नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने वॉर्डांचा आकार कमी करून वॉर्डांची संख्या ४२ वरून ५५ करण्यात येणार आहे.
२०२२ च्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी होणार याची नगरसेवक, इच्छुक उमेदवार, राजकीय कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक तसेच नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने नेमका कोणता प्रभाग कसा तोडणार, नवा प्रभाग कसा तयार होणार, त्याला कोणता भाग जोडणार, हे सर्वच गुलदस्त्यात आहे. निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत पुणे महानगरपालिकेला प्रारूप प्रभाग रचना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांनी काही निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सध्या कामाची स्थिती काय आहे, अडचणी काय येत आहेत यावर चर्चा झाली. प्रभाग रचनेचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून ३० नोव्हेंबरपर्यंत प्रारूप आराखडा तयार होईल, असे बैठकीत सांगण्यात आले. अशी माहिती पुणे महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.