आताच्या काळात बहुतांशी प्रगत देशात शिक्षणात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर खुबीने केला जात आहे आणि तो आपल्याकडेही करणे गरजेचे आहे, ही काळाचीच एक गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
कोरोनाचे सावट एकंदरच आता वर्षभरानंतर जरा कमी होताना दिसते. बहुतांश लोकांनी एव्हाना लसीकरणही करून घेतले आहे. त्यामुळे एकंदरच या आजाराविषयीची भीती ओसरू लागली आहे. सामान्य जीवन हळूहळू सुरळीत होत असून पूर्वपदावर येत आहे. या वर्षभराच्या लाटेने आपल्या सर्वांच्याच जीवनात अनेक चांगले-वाईट बदल घडवून आणले. बरं होणारे बदल स्वीकारून पुढे जाण्याव्यतिरिक्त तसा दुसरा कुठला पर्यायदेखील आपल्याकडे उरला नव्हता म्हणा! त्यामुळे गेले वर्षभर होणारे बदल निमूटपणे स्वीकारून आपण पुढे जात राहिलो. या अनेक बदलांपैकी मागच्या दीड वर्षांमधील बदल म्हणजे शिक्षण क्षेत्रामधला बदल. अजूनही सामान्य जनजीवन जरी सुरळीत होत असलं तरी, विद्यार्थ्यांनी ओस पडलेले भकास वर्ग जवळपास सगळ्यांच्याच चिंतेचा विषय ठरत आहे. रबर अधिक ताणल्यामुळे ज्याप्रमाणे तुटू शकतो, अगदी त्याचप्रमाणे पालकांचाही संयम संपायची वेळ आली आहे. शाळांनी शिक्षण जरी ‘ऑनलाईन’ स्वरूपात खुले करून दिले तरी हे शिक्षण घेताना खरेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली की नाही, हा संशोधनाचाच विषय आहे.कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा आता कदाचित सुरूही झाल्या असतील, पण शहरांमध्ये अजूनही सर्व मुलांना एकत्रितरीत्या सहअध्ययन करण्याची संधी कधी चालून येणार, हे सांगणेही अवघड झालंय. मग अशा परिस्थितीत आहे त्याच ‘ऑनलाईन’ व्यवस्थेला मजबूत करून मुलांना शिक्षण देण्याचा आपण विचार करू शकत नाही का?
स्वीडनमध्ये शाळांच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासूनच सरकार शाळा सुरू ठेवण्याबाबत आग्रही राहिले. पण, अगदी थोडा काळ का होईना, शाळांनी ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा पर्यायही खुला ठेवला. तेव्हा कळले की ‘ऑनलाईन’ शिक्षणसुद्धा आहे की सृजनात्मक! यातही अनेक सकारात्मक पद्धतींनी मुलांना शिकवता येऊ शकते, त्याचबरोबर हे ‘व्हर्च्युअल लर्निंग’ मुलांसाठी मनोरंजकेीघीप ठरू शकते ; फक्त गरज आहे ती ही पद्धत नीट समजून घेण्याची. सगळ्याच पालकांनी या विषयांमध्ये शिक्षण घेणं ही एक काळाची गरज होऊन बसली आहे. कारण, तुमच्या थोड्याशादेखील दुर्लक्षामुळे स्मार्टफोनच्या आधाराने नको ते विषय, नको त्या वयात कळण्यासाठी फक्त एका ‘क्लिक’च्या अंतरावर तुमच्या मुलांसामोर उभे आहेत. मग हे सगळं टाळण्यासाठीची एक खबरदारी म्हणून नेमकं काय करता येईल? मुलांनी इंटरनेट वापरताना यासाठी एक उदाहरण बघूया. जर सगळ्यात आधी आपल्या मुलाचे वेगळे ‘जिमेल’ अकाऊंट आपण तयार केले, तर त्या अकाऊंटवर आपल्याला ‘पेरेंटल कंट्रोल’चे ‘फीचर’ उपलब्ध असेल. ज्यात आपण मुलांनी इंटरनेट वापरताना आपण काही साईट्स ‘ब्लॉक’ करू शकतो, तसेच तिथे ‘सेटिंग्स’मध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात आपण ‘ब्राऊझिंग हिस्ट्री’ तपासू शकतो. थोडक्यात, स्मार्टफोन मुलांच्या हातात देण्याआधी आपण ही काळजी घेतली, तर त्याचा वापर फक्त आणि फक्त शिक्षणाकरिताच होऊ शकेल. ‘युट्यूब किड्स’सारख्या अॅप्सची मदत घेऊन मुलांच्या वयानुसार बघता येतील, अशाच कार्यक्रमांची सूची तिथे उपलब्ध करून देता येईल. पालक म्हणून तर यात सजगता हवीच आहे, पण आता ‘ऑनलाईन’ शिक्षण देताना शाळांनी हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की, ‘स्टडी मटेरियल’ तयार करताना केवळ पाठ्यपुस्तकांचाच आधार न घेता, त्या विषयासंदर्भात तुम्हाला ‘ऑनलाईन असाईन्मेंट’ वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जसे गणितात जर बेरीज आणि वजाबाकी शिकवायची असेल, तर ‘सापशिडी’सारखे खेळ मुलांना घरी पालकांबरोबर खेळण्याचा पर्याय तर देताच येईल, पण त्याचबरोबर बेरीज-वजाबाकीचे अनेक रंजक खेळ ‘ऑनलाईन’देखील उपलब्ध आहेत. त्यांचे ‘प्रिंट आऊट’ काढूनदेखील हे खेळ मुलांबरोबर घरी खेळता येतील. याचा फायदा असा होईल की, पालकांचादेखील शिक्षणात सहभाग वाढून त्यांचे आणि मुलांचे नातेदेखील अजून घट्ट करण्यासाठी असे खेळ नक्कीच मदत करू शकतील. त्यासाठी शाळेचे ‘ऑनलाईन’ शैक्षणिक स्रोत व्यापक आणि भरभक्कम असणे जरूरी आहे.
थोड्या मोठ्या वयोगटासाठी मुलांना काही ‘ग्रुप असाईन्मेंट्स’ देता येतील, ज्यात त्या गटाच्या मुलांनी स्वतंत्रपणे त्याविषयांची माहिती गोळा करून ती जेव्हा वर्गासामोर ‘ऑनलाईन प्रेझेंट’ करणे अपेक्षित असेल. यात दोन फायदे होतील, पहिला म्हणजे ग्रुप ‘असाईन्मेंट्स’मुळे मुलांचे परस्परांमध्ये सकारात्मक संबंध तर निर्माण होतीलच, त्याचप्रमाणे मुलांचा शिक्षणामधील सक्रिय सहभागदेखील वाढेल आणि गट मानसिकतेचा सकारात्मक उपयोग शिक्षणात करता येईल. जेव्हा एखाद्या विषयावर चार किंवा त्यापेक्षा अधिक गट माहिती संपूर्ण वर्गासमोर ‘प्रेझेंट’ करतील तेव्हा मुलांना मिळणार्या माहितीचा आवाका तर वाढला असेलच, त्याचबरोबर मुलांचे ‘प्रेझेंटेशन स्कील’देखील आपसूकच वृद्धिंगत होतील. तेव्हा या उपलब्ध संधीचा शिक्षकांनी अधिकाधिक सकारात्मक विचार करून मुलांच्या विविध क्षमता, कौशल्ये विकास करणार्या विविध ‘ऑनलाईन असाईन्मेंट्स’ तयार करून मुलांसाठी नवनवीन आव्हाने शिक्षणात देऊन त्यांचा शिक्षणामधला रस कसा वाढेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. फक्त मुलं इंटरनेटवर माहिती शोधत असताना त्यांना योग्य तेच माहितीस्रोत वापरून माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण सर्वात आधी दिले पाहिजे, त्याचबरोबर इंटरनेटवरील सगळंच ज्ञान हे खरं असते असे नसते, हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे.‘ऑनलाईन गेम्स’ हा मुलांच्या आवडीचा विषय. मग या गेम्सद्वारेच मुलांना शिकवता येईल काय? यात आवर्जून सांगावसं की, मुलांचा शिक्षणात सक्रिय सहभाग असावा त्यासाठी 'Kahoot' सारख्या अनेक अॅप्लिकेशन्सचा शिक्षणात छान वापर करून घेता येईल, ज्यात गेम्स खेळता आपोआप मुलांना सहजपणे शिकतादेखील येईल. अशा अॅप्समध्ये शिक्षकांनादेखील प्रत्येक पाठानुसार वेगवेगळे गेम्स तयार करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असेल.
आज काळ झपाट्याने बदलत आणि पुढे जात आहे. इंटरनेटने सगळं जग एक नव्हे तर लाखो धाग्यांद्वारे जोडले गेले आहे. याच इंटरनेटद्वारे प्रगत देशांमधील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून, त्यात प्रसंगी आपल्या गरजेनुसार बदल करून आपल्याकडे त्यातल्या चांगल्या गोष्टी राबवून बघण्याची संधी दवडली नाही पाहिजे. आताच्या काळात बहुतांशी प्रगत देशात शिक्षणात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर खुबीने केला जात आहे आणि तो आपल्याकडेही करणे गरजेचे आहे, ही काळाचीच एक गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण, आजच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले ज्ञान हे पुस्तकांच्या चौकटीतलंच नव्हे, तर त्याबाहेर ज्ञानाच्या कक्षा आता रुंदावल्या पाहिजेत. याचेच उदाहरण म्हणजे स्वीडनसारख्या प्रगत देशातदेखील अगदीच पूर्व प्राथमिक विभागापासूनच मुलांना ‘डिजिटलायझेशन’ची ओळख करून दिली जाते. त्याचप्रमाणे मोठ्या वर्गांमध्येदेखील मुले स्वतंत्रपणे ‘कॉम्प्युटर’वरच ‘असाईन्मेंट्स’ लिहितात, त्यांना त्यांचे स्वतंत्र ‘लॅपटॉप्स’ देखील शाळेमध्ये मिळतात.एकंदरच येणारा काळ झपाट्याने बदलणार आहे. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात ते वापरण्याच्या तोट्यांवर योग्य मात करत मुलांना स्मार्टफोन अथवा संगणकाद्वारे ‘स्मार्ट’ शिक्षण देऊन त्यांच्या भवितव्यासाठी तयार करणे, हे शाळा आणि पालकांचे येणार्या काळातले एक आव्हानच असणार आहे. त्यामुळे इंटरनेट या विषयाचा बाऊ न करता त्याचा स्वीकार करून शिक्षणात त्याचा वापर करणे हेच योग्य!