लोककलावंत ते माध्यमकर्मी

14 Nov 2021 00:43:41


ramilia_1  H x

संजीव केरणी यांनी जम्मूतील ‘डोगरा’ समाजातील श्रीसनातन धर्मसभा, देवान मंदिर या प्रसिद्ध आणि नावलौकिकप्राप्त संस्थेच्या १९८७ साली ‘रामलीला’मध्ये ‘द्वारपाला’पासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दीडशे वर्षांहून जास्त काळ जम्मूमध्ये ‘रामलीले’चे प्रयोग आजतागायत निरंतर सुरु आहेत. केरणे यांनी ‘कामदेवा’ची भूमिका केली. त्यानंतर १९९२ पासून २७ वर्षे ‘रामलीला’मध्ये ‘लक्ष्मणा’ची भूमिकाही त्यांनी केली आणि त्यांच्या भूमिकेला रसिकप्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.



 
१९९१ ते १९९३ दरम्यान आपले नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईला आले आणि त्यानंतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी कामही केले. सर्वसामान्य आई-वडिलांनाप्रमाणे आपल्या मुलाने चांगला कामधंदा करावा, हीच अपेक्षा संजीव यांच्या घरच्यांनीही व्यक्त केली. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना जबरदस्तीने काकांकडे कामासाठी लडाख येथे पाठवले. परंतु, काहीही अडचण आली, तरी न चुकता दरवर्षी नवरात्रीमध्ये जम्मू येथील श्रीसनातन धर्मसभा, देवान मंदिर यांच्या ‘रामलीला’साठी ते हजर असायचे आणि ‘रामलीला’मध्ये आपली कला सादर करायचे. कलेची हीच आवड त्यांना ‘रामलीला’साठी खेचून आणत असे, असेच म्हणावे लागेल.२०१७ पासून त्यांना ‘रामलीला’मध्ये रावणाची भूमिका सादर करण्याची संधी मिळाली. गेल्या पाच वर्षांपासून जम्मू येथील प्रसिद्ध अशा श्रीसनातन धर्मसभा, देवान मंदिर संस्थेचे ‘रामलीला’मध्ये रावणाची भूमिका ते साकारत आहेत. ही भूमिका सादर करताना अनेक अशा विद्वान लोकांशी त्यांची ओळख, परिचय झाला.




ज्यावेळी इमारतीचा पाया भक्कम असतो, त्यावेळी त्यावर अनेक मजले बांधता येतात, यावर संजीव केरणी यांचा ठाम विश्वास आहे. त्याचप्रमाणे लहानपणापासून ‘रामलीला’मध्ये काम केल्यामुळे त्यांच्या बालमनावर त्याचे खूप सकारात्मक परिणाम झाल्याचेही ते आवर्जून नमूद करतात.संजीव यांचे शिक्षण ‘श्री रघुनाथ संस्कृत महाविद्यालय, जम्मू’ येथे झाल्याने इतर ठिकाणी जसे शिक्षकांना ‘मॅडम’, ‘सर’ असे संबोधले जात असे, तर इथे ‘गुरुजी’ असेच संबोधले जाई. सुरुवातीपासून ते आपल्या कामाच्या प्रति प्रामाणिकपणे प्रयत्न करत असत.






‘श्री सनातन धर्मसभा, दिवान मंदिर’ या संस्थेच्या रंगमंचावर गेल्या दीडशे वर्षांपासून ‘रामलीला’ सादर होत असल्यामुळे तेथे जणू श्रीरामांचा सहवास आहे, असेच वाटायचे. हिंदू संस्कृतीमध्ये मंदिरात मूर्तीची पूजा केली जाते. मंदिरातील पूजा, आरती, मंत्र, जप यामुळे त्या मूर्तीमध्ये एका दैवीशक्तीची प्रचिती येते. मंदिरात गेल्याने आपोआप सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये रुंजी घालतात. त्याचप्रमाणे या रंगमंचावर दीडशे वर्षांपासून ‘रामलीला’ सादर होत असल्याने या रंगमंचाच्या प्रत्येक विटेमध्ये प्रभू राम असल्यासारखे वाटते, असे संजीव केरणी सांगतात. या रंगमंचावर पडदे लावताना नेहमी सापांचे दर्शन व्हायचे, पण आजपर्यंत या सापांनी कोणालाही दंश केला नाही. त्यामुळे या रंगमंचावर साक्षात प्रभू श्रीरामांचा वास आहे, असे केरणी म्हणतात.





लडाखहून परत आल्यावर १९९९ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि त्यांनी खासगी नोकरी पत्करली. त्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीर येथील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘काश्मीर टाईम्स’मध्ये ‘वितरण व्यवस्थापक’ म्हणून नोकरी स्वीकारली आणि आता ते ‘मुख्य व्यवस्थापक’ या पदावर कार्यरत आहेत. ज्यावेळी त्यांनी ‘वितरण व्यवस्थापक’ म्हणून काम सुरू केले, त्यावेळी त्यांनी बघितले की, वृतपत्र विक्रेते सकाळी 4 वाजता वृत्तपत्र घ्यायला यायचे. त्यावेळी पेपरवाल्यांना पेपर देत असताना वितरक नेहमी हिशोबावरून शिवीगाळ करायचे, अपमानास्पद वागणूक द्यायचे. त्यावेळी त्यांच्या मनात आले, या विक्रेत्यांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे आणि त्यांनी जम्मू वृत्तपत्र विक्रेत्यांची एक सामाजिक संघटना स्थापन केली. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. आज ते ‘ऑल इंडिया न्यूजपेपर डिस्ट्रीब्युटर असोसिएशन’ या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि लडाख ते कन्याकुमारीमधील दोन कोटींपेक्षा जास्त वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी ते काम करत आहेत.






स्वातंत्र्यपूर्व काळापासून वृत्तपत्र विक्रेते त्याच पद्धतीने व्यवसाय करत आहेत, त्यांना शासनाकडून सुखसोई दिल्या गेल्या पाहिजेत, यासाठी केरणी आग्रही आहेत.एका वृत्तपत्रामध्ये एक ‘जनरल मॅनेजर’ म्हणून काम करताना काश्मिरी लोकांची विचारधारा ओळखण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे आणि त्याचा फायदा देशासाठी कसा होऊ शकतो, याविषयी ते नेहमी विचार करत असतात. “भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जम्मू-काश्मीरची पुनर्निर्मिती करण्यासाठी आपले योगदान देण्यास मी नेहमी सज्ज आहे,” असे संजीव केरणी विशेषत्वाने अधोरेखित करतात.

 
 


- दत्ता घाडगे
(लेखक ‘ऑल इंडिया न्यूजपेपर डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन’चे सरचिटणीस आहेत.)












Powered By Sangraha 9.0