तणावमुक्त सौंदर्य बहाल करणारी उद्योजिका

12 Nov 2021 13:43:38

rupali _1  H x


गेल्याच वर्षी रुपालीने ठाण्यातील घोडबंदरच्या हावरे सिटी येथे ‘ग्लॅम व्होग सलोन बाय रुपाली’ सुरू केले. या ठिकाणी निव्वळ ठाण्यातल्याच नव्हे, तर बोरिवली, दहिसर, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, मुलुंड अशा दूरदूरच्या महिलादेखील येतात. ‘ब्युटी’ आणि ‘मेकअप’ सोबतच ‘हेअर स्पा’, ‘नेल आर्ट’, ‘मेकअप थ्रीडी’, ‘एचडी’, ‘बॉडी मसाज’, ‘पॉलिशिंग’, ‘बॉडी स्पा’, ‘फ्रेंच पॅडिक्युअर’, मॅनिक्युअर या सेवा ग्लॅम व्होग देते. नववधूचा ‘मेकअप’ हे ‘ग्लॅम व्होग’चे वैशिष्ट्य आहे. नववधू ही त्या दिवशी ‘सेलिब्रिटी’ म्हणून वावरते, यामध्ये ‘ग्लॅम व्होग’चा मोठाच हातभार असतो.




ब्युटीपार्लर म्हणजे तात्पुरतं सुंदर दिसण्याची प्रक्रिया करणारं ठिकाण ही संकल्पना मला दूर करायची आहे. आजची स्त्री ही सर्वाधिक तणावात असते. घर आणि ऑफिस अशा दोन्ही आघाड्या सांभाळताना तिची प्रचंड दमछाक होते. तिला कुठेतरी मानसिक व शारीरिक शांततेची अनुभूती मिळावी. ती शांतता तिला मिळाली की, तिचं नैसर्गिक सौंदर्य खुलून येतं. हेच माझं काम आहे,” ‘ग्लॅम व्होग सलोन बाय रुपाली’च्या संचालिका रुपाली वंजीवाले नेमक्या शब्दांत आपल्या व्यवसायाची गुपिते उलगडत जातात. अवघ्या ५०० रुपये पगाराची नोकरी ते काही लाख रुपयांची उलाढाल असणारा सौंदर्यक्षेत्रातील स्वत:चा उद्योग ही ठाण्यातील तरुणी मोठ्या दिमाखात विस्तारत आहे.




ऐंशीच्या दशकात ‘मेकअप म्हणजे सिनेमातील नट्यांची कामे’ असाच काहीसा सर्वसामान्य समज होता. मात्र, नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस भारताने जागतिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि एकूणच समाजात आमूलाग्र बदल घडू लागला. रुपालीचे वडील रामचंद्र शिंदे हे एका सिमेंट कंपनीत नोकरीस होते, तर आई सुनीता शिंदे या गृहिणी. रुपालीला एक बहीण आणि एक भाऊ. शिंदे दाम्पत्याने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. त्यांना शिकवलं. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती न करता त्यांना त्यांचे आवडते क्षेत्र निवडू दिले. रुपालीचं शालेय शिक्षण मुलुंड विद्यामंदिर येथे झाले, तर कला शाखेतील पदवी तिने सोमय्या महाविद्यालयातून मिळवली. पुढे मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषय घेऊन तिने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.



बारावी झाल्यावर खरंतर रुपालीला ‘फॅशन डिझायनिंग’चा अभ्यासक्रमाकडे वळायचं होतं. मात्र, ‘फॅशन डिझायनिंग’चे भरमसाठ शुल्क भरणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. काळजावर मोठा दगड ठेवत रुपालीने आपली दुसरी आवड जपण्याचा निर्णय घेतला. एक हरहुन्नरी तरुणी सौंदर्यशास्त्राकडे वळली. बारावी झाल्यावर ती एका ब्युटीपार्लरमध्ये नोकरीस लागली. सकाळी ८ ते रात्री ९ असे १३ तास राबावे लागत असे. नऊ तास राबूनदेखील पगार मिळायचा फक्त ५०० रुपये. पगार नगण्य असला, तरी आपलं आवडीचं काम करायला मिळतं याचाच रुपालीला आनंद होता.




एक वर्ष नोकरी केल्यानंतर स्वत:च काम करण्याचा तिने निर्णय घेतला. ब्युटीपार्लरचा सेटअप उभारणे खर्चिक होते. त्यामुळे ‘फ्रिलान्सर’ म्हणून काम करण्याचे तिने निश्चित केले. तब्बळ १६ वर्षे तिने ‘फ्रिलान्सर’ म्हणून सौंदर्य खुलवण्याचे काम केले. ‘ब्युटी’ आणि ‘मेकअप’ यामध्ये तिचा हातखंडा निर्माण झाला. कोणे एकेकाळी ५०० रुपयांची नोकरी केलेल्या रुपालीने एका ‘मेकअप’चे १२ हजार रुपये आकारले होते. नोकरी आणि स्वयंरोजगार यातली तफावत तिला प्रकर्षाने दिसून आली. आपण योग्य वळणावर आहोत, याची तिला खात्री पटली. या 16 वर्षांत हजारो स्त्रियांचे सौंदर्य खुलवण्यास तिने मदत केली.


दरम्यान, तिचा विवाह स्वार्थन वंजीवाले या तरुणासोबत झाले. रंग तयार करणार्‍या एका बहुराष्ट्रीय कंपनीत उप-व्यवस्थापक म्हणून तो कार्यरत आहे. स्वार्थन आणि त्याच्या घरच्यांनी रुपालीला पाठिंबा दिला. टिटवाळ्याहून रुपाली मुंबई, नवी मुंबई, ठाणे, बदलापूर अशा ठिकाणी जाई. इतकंच नव्हे तर रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर अशा जिल्ह्यांमध्येसुद्धा ती जाई. ‘ब्युटी’, ‘मेकअप’, नववधूचा ‘मेकअप’ यांत रुपाली तरबेज झाली. लग्नानंतर सासरच्यांनी तिला घरुन काम करण्याविषयी सुचवले. रुपालीने घरच्या ‘बेडरूम’मध्ये ‘ब्युटीपार्लर’ सुरू केले. त्यालादेखील उदंड प्रतिसाद मिळाला. कोरोना काळात कोरोनाचे सर्व नियम पाळून ती सेवा देऊ लागली. आपण सौंदर्य खुलविलेल्या 99 टक्के महिला समाधानी आहेत, असा रुपालीचा दावा आहे. आपण ज्यापद्धतीने ‘मेकअप’ करता, त्यामुळे एकदम ’रिलॅक्स’ वाटते... महिलांच्या या प्रतिक्रियाच रुपालीच्या कामाचा दर्जा दर्शवते.



गेल्याच वर्षी रुपालीने ठाण्यातील घोडबंदरच्या हावरे सिटी येथे ‘ग्लॅम व्होग सलोन बाय रुपाली’ सुरू केले. या ठिकाणी निव्वळ ठाण्यातल्याच नव्हे, तर बोरिवली, दहिसर, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, मुलुंड अशा दूरदूरच्या महिलादेखील येतात. ‘ब्युटी’ आणि ‘मेकअप’ सोबतच ‘हेअर स्पा’, ‘नेल आर्ट’, ‘मेकअप थ्रीडी’, ‘एचडी’, ‘बॉडी मसाज’, ‘पॉलिशिंग’, ‘बॉडी स्पा’, ‘फ्रेंच पॅडिक्युअर’, मॅनिक्युअर या सेवा ग्लॅम व्होग देते. नववधूचा ‘मेकअप’ हे ‘ग्लॅम व्होग’चे वैशिष्ट्य आहे. नववधू ही त्या दिवशी ‘सेलिब्रिटी’ म्हणून वावरते, यामध्ये ‘ग्लॅम व्होग’चा मोठाच हातभार असतो.



भविष्यात स्वत:ची सौंदर्य उत्पादने बाजारात आणण्याचा रुपालीचा मानस आहे. त्याचप्रमाणे ‘ग्लॅम व्होग’ सलोनच्या शाखा विस्तारावर तिला भर द्यायचा आहे. “माझा हा व्यावसायिक प्रवास आता खर्‍या अर्थाने सुरु झाला आहे. माझे पती स्वार्थन वंजीवाले, मुलगा स्वरांश, अर्चना सोंडे, शैला कांबळे यांची मोलाची साथ मिळाली म्हणून मी ही झेप घेऊ शकले.  माझ्याकडे येणार्‍या प्रत्येक स्त्रिला मग ती गृहिणी असो की, नोकरदार तिला तणावमुक्त करण्याचा माझा प्रयत्न असेल,” असे रुपाली म्हणते.  कोणताही व्यवसाय नैतिक अधिष्ठानावर उभारलेला असेल तर तो निश्चितच समृद्ध होतो. रुपाली वंजीवाले याचं उत्तम उदाहरण आहे.



8108105232
Powered By Sangraha 9.0