‘पूर्वांचल एक्सप्रेस वे’ उत्तर प्रदेशसाठी ठरणार गेमचेंजर; मंगळवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

12 Nov 2021 19:00:55
yogi_1  H x W:

योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेनुसार महामार्ग औद्योगिक केंद्रांचा विकास
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील ९ जिल्ह्यांना जोडणाऱ्या आणि राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या ‘पूर्वांचल एक्सप्रेस वे’चे लोकार्पण येत्या मंगळवारी, १६ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गावर भारतीय हवाईदलासाठी धावपट्टी तयार करण्यात आली असून लोकार्पणप्रसंगी भारतीय हवाईदलातर्फे एअर शोचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
 
उत्तर प्रदेशातील पुर्वांचलमधील जिल्ह्यांना राज्याची राजधानी लखनऊ आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली यांना जोडणाऱ्या ‘पूर्वांचल एक्सप्रेस वे’चे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा सहापदरी असलेला आणि आठपदरी करण्याची क्षमता असलेला महामार्ग ३४१ किमीचा असून लखनऊ, बाराबंकी, अयोध्या, आंबेडकर नगर, अमेठी, सुल्तानपुर, आझमगढ, मऊ आणि गाझीपूर अशा ९ जिल्ह्यांना जोडणार आहे. त्याचप्रमाणे गाझीपूर ते दिल्ली ते अंतर अवघ्या दहा तासांमध्ये कापता येणार आहे. त्याचप्रमाणे हा महामार्ग गाझीपूरपासून पुढे बिहारपर्यंत जोडण्याविषयीदेखील विचार सुरू आहे. प्रकल्पास २२ हजार ४९४ कोटी रूपये खर्च आला आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पाचे भूमीपुजन १४ जुलै, २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते आणि आता अवघ्या ३ वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन त्यांच्याच हस्ते लोकार्पणही होत आहे.
 
 
PE_1  H x W: 0
 
 
पूर्वांचलच्या विकासाला मिळणार चालना, महामार्गाच्या दोन्ही बाजुंना 'कमर्शियल हब'
 
 
राज्यात रस्त्यांचा विकास करून त्याद्वारे अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे योगी आदित्यनाथ सरकारचे धोरण आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेश एक्सप्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणाद्वारे ‘पूर्वांचल एक्सप्रेस वे’ विकसित करण्यात येत आहे. हा महामार्ग केवळ दळणवळणासाठी नव्हे तर राज्याच्या औद्योगिक विकासासाठीही नवे मार्ग खुले करणार आहे. हा महामार्ग ज्या जिल्ह्यांमधून जाणार आहे, तेथे दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर कमर्शियल हब, औद्योगित पट्ट्यांचा विकास होणार आहे.
 
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशांनुसार या महामार्गालगत पाच औद्योगिक क्लस्टर विकसीत केले जाणार आहेत. त्यासाठी ९ हजार हेक्टर भूमी चिन्हीत करण्यात आली आहे. पूर्वांचल एक्सप्रेसच्या अखत्याररित येणारे जिल्हे हे कृषिप्रधान आहेत, त्यामुळे औद्योगिक क्लस्टरमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याशिवाय वस्त्रोद्योग, तेलशुद्धीकरण, रसायने, वैद्यकीय उपकरणे आदी कारखाने स्थापन केले जाणार आहेत. यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षण केंद्रांचीही स्थापना करण्यात येत आहे.
 
 
AS _1  H x W: 0 
 
हवाईदलासाठी विशेष धावपट्टी, लढाऊ विमान उतरविण्याची सोय
 
 
‘पूर्वांचल एक्सप्रेस वे’ केवळ उत्तर प्रदेशच्या आर्थिक विकासासाठी नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही महत्वाचा ठरणार आहे. महामार्गावरील सुलतानपूर येथील पट्ट्यात ३.३ किमी लांबीची विशेष धावपट्टी भारतीय हवाईदलासाठी बांधण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्यावर राफेल, सुखोई, मिराज आदी लढाऊ विमाने उतरविणेदेखील शक्य होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महामार्गाच्या लोकार्पणप्रसंगी हवाईदलातर्फे विशेष हवाई कसरतींचे आयोजन केले जाणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0