काँग्रेस हिंदूविरोधाची प्रयोगशाळा, त्याचे हेडमास्तर राहुल गांधी – डॉ. संबित पात्रा

हिंदूत्व म्हणजे शीख आणि मुस्लिमांना मारणे – राहुल गांधी बरळले

    दिनांक  12-Nov-2021 17:32:28
|
sambit_1  H x W

गांधी कुटुंब हिंदूद्वेष्टे, हिंदूविरोध हे काँग्रेसी षडयंत्र
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे सर्व नेते सोनिया आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हिंदूविरोधी वक्तव्ये करीत असतात. संपूर्ण गांधी कुटुंब हे हिंदूद्वेष्टे असून काँग्रेस पक्ष हिंदूविरोधाची प्रयोगशाळा आहे आणि त्याचे हेडमास्तर राहुल गांधी आहेत, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत लगाविला.
 
 
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये एका परिषदेत हिंदूत्व म्हणजे शीख आणि मुस्लिमांना मारणे, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा भाजपतर्फे जोरदार समाचार घेण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा म्हणाले, गेल्या २४ तासात काँग्रेसकडून तीनवेळी हिंदूंविषयीचा द्वेष व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गांधी कुटुंब हे हिंदूद्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे डॉ. पात्रा यांनी म्हटले.
 
 
 
 
 
सलमान खुर्शिद, राशिद अल्वी आणि राहुल गांधी यांची एकापाठोपाठ आलेली हिंदूविरोधी वक्तव्ये हा योगायोग नसल्याचे डॉ. पात्रा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा हिंदूविरोधाची प्रयोगशाळा असून त्याचे हेडमास्तर राहुल गांधी आहेत. त्यांच्याच इशाऱ्यावर काँग्रेस नेते हिंदूविरोध व्यक्त करीत असतात. भारतास दहशतवादापेक्षा हिंदूंपासून जास्त धोका आहे हे राहुल गांधी यांचे जुने वक्तव्य, त्यानंतर शशी थरूर यांनी हिंदू तालिबान असे संबोधणे, पी. चिदंबरम यांना भगवा दहशतवाद शब्द जन्मास घालणे हे सर्व गांधी कुटुंबाकडून करण्यात आलेले षडयंत्र आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांनी आता लंडनमध्ये “हिंदूत्व म्हणजे शीख आणि मुस्लिमांना मारणे” असे म्हटले आहे. एकीकडे राहुल गांधी म्हणतात की हिंदू धर्मात मंदिरात जाणारे हे लफंगे असतात आणि ते स्वत:च निवडणुकीच्या काळात मंदिरात जात असतात, यावरून काँग्रेसचे खरे धोरण लक्षात येते, असा टोला पात्रा यांनी लगाविला.
 
 
राहुल गांधी यांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे धोरण स्विकारले असून अकारण गांधी विरुद्ध सावरकर असा वाद निर्माण केला जात आहे. मात्र, काँग्रेस ज्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात घटक आहे, त्यामध्ये मराठी माणसाची बाजू मांडणारा पक्षही आहे. त्यामुळे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तेजस्वी मराठी माणसाचा करीत असलेला अपमान तो पक्ष कसा सहन करतो, असा सवालही संबित पात्रा यांनी विचारला.
 
राहुलजी, कपिल सिब्बल यांच्याशी प्रेमाने बोला
 
 
काँग्रेस द्वेषाची नव्हे, तर प्रेमाची भाषा बोलत असल्याचा दावा राहुल गांधी करतात. त्यामुळे आता त्यांनी ‘जी २३’ मधील नेत्यांशी प्रेमाने संवाद करावा. ज्या कपिल सिब्बल यांच्या घरावर टमाटे फेकून मारले, त्यांना प्रेम द्यावे. त्याचप्रमाणे गेहलोत – पायलट, बघेल – सिंहदेव, सिद्धू – चन्नी हे वाद प्रथम प्रेमाने सोडवावेत, असा सल्ला संबित पात्रा यांनी यावेळी दिला.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.