मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला आता भाजपनेही जाहीर पाठींबा दिला आहे. आझाद मैदान येथे जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संबोधित केले. ते म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी राज्य सरकारने खेळू नये. सरकारने काढलेला जीआर तात्काळ रद्द करून एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाचा दोन ओळीचा नवीन जीआर काढावा व विलीनीकरणाच्या निर्णयाला तत्वतः मान्यता द्यावी. यात चालढकलपणा करण्यात अर्थ नाही."
"आंदोलन दडपण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. जेवढे कर्मचाऱ्यांना दाबाल, तेवढे ते उसळून उठतील. कर्मचारी आझाद मैदानाताच नाही तर मंत्रालयात ही घुसायला मागेपुढे पाहणार नाहीत. राज्य सरकारने विलीनीकरणाची आधी घोषणा करावी, त्यानंतर त्याचे आर्थिक गणित मांडावे. आपण कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत की विरोधात, हे राज्य सरकारने स्पष्ट करावे.", असेही ते म्हणाले.